परिशिष्ट उ
जल व भूमी व्यवस्थापन आणि संशोधन संस्था औरंगाबाद
सु. य. कुलकर्णी
संचालक, 'वाल्मी', औरंगाबाद
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जमीन, पीक, पाणी व हवामान ह्यांचे संशोधन महाराष्ट्राला उपकारक आहे. महत्त्वाचे कार्य करणारी वाल्मी ही अग्रेसर संस्था आहे. तिचा अल्प परिचय
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रास्ताविक :
सामान्यतः पाण्याचा जो बाष्पीभवनाने किंवा अन्य रीतीच्या गळतीमुळे नाश होतो, ती नाश टाळण्याच्या उद्देशाने पाणी वापराची विविध तंत्रे पुढे आली आहेत. हा नाश नेमका किती होतो. त्याची आपल्याजवळ निश्चित मोजणी नाही. ज्या वेळेला आपण एखाद्या पर्यायांचीसुद्धा, पाणी नाशाची मोजणी केली आहे का ? व त्यांची आपापसात तुलना केली आहे का ? हे पाहिले पाहिजे. विदर्भामध्ये, कोकणामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात जी हवामानाची विशेषतः उष्णतेची, सूर्यप्रकाशाची, वार्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा बाष्पीभवनावर काय परिणाम होतात हे शोधणे आवश्यक आहे.
हवामानाबरोबरच जमिनीच्या प्राथमिक तयारीचाही प्रश्न आहे. कुठल्याही पाणी वापर तंत्रासाठी जमिनीची नेमकी तयारी असावी हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या विषयी अजूनही एकमत झालेले नाही. जमिनीच्या तयारीवर नेमका किती खर्च व्हावा, अमुक एक पाणी वापर तंत्रासाठी कोणत्या गुणधर्माची माती उपयुक्त ठरेल का हे ही पाहिले पाहिजे. सिंचित शेतीसाठी तर जमिनीच्या तयारीला विशेष महत्त्व आहे.
कोकणात जांभा नावाचा अतिशय सछिद्र व पाणी झिरपून घेणारा दगड आहे. त्यावर प्रवाही सिंचनाची व्यवस्था कशी बसवायची हे मोठे कोडे आहे. ठिकठिकाणी काळ्या मातीवर आपण तुषार सिंचनाची आखणी करतो. या दोन्ही पद्धतींचा व वेगवेगळ्या गुणधर्माच्या मातीचा अभ्यास करावा लागेल.
जलव्यवस्थापनेच्या क्षेत्रात जे नवे प्रयोग केले जात आहेत. त्या सगळ्या व्यवहारामध्ये जी भिन्नता एकंदर शेती व्यवस्थेमध्ये आहे ती, भिन्नता या क्षेत्रातही जाणवते. भिन्नता या अर्थाने की वेगवेगळ्या अनुभवांच्या कार्यक्षमतेच्या व ज्ञानाच्या पातळीवर आपण सर्वजण उभे आहोत. आपला शेतकरी या कार्यक्रमातील एक प्रमुख घटक आहे. आणि या भूमी जलव्यवस्थापन संशोधनामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू असला पाहिजे. एवढेच नव्हे तर शेतकर्यांना सहभागी करून हे संशोधन असावे असेही वाटते. तर असा हा शेतकरी एका बाजूला व दुसर्या बाजूला पाणी वापर तंत्राच्या कोणत्याही चांगल्या कार्यक्रमामध्ये अद्ययावत संघटनाचा लाभ मिळणारे आपण काही संशोधक आहोत. थोडक्यात संशोधकांचे ज्ञान, अनुभव शेतकर्यांपर्यंत पोचले पाहिजे.
पाटबंधारे व्यवस्थापनामध्ये संशोधनाची गरज :
पाणी वापराच्या विविध तंत्रांचा अभ्यास करताना हवामान व जमीन (माती) यावरील संशोधनाचे महत्त्व आहे. उदा. - तुषार सिंचनाची पद्धत सर्वच पिकांना सारखीच लाभदायक ठरेल की निवडक पीक रचनेतच जास्त फायदे मिळतील याचे संशोधन होणे आवश्यक आहे. मराठवाडा परिसरात काळ्या मातीच्या जमिनी विपुल प्रमाणात आहेत. काळ्या मातीवर करावयाचे सिंचन ही एक मोठी समस्या अजूनही शिल्लक राहिलेली आहे. यू एन डी पी तर्फे पूर्णा प्रकल्पात यावर संशोधन चालू आहे. कोकणासारख्या चढ-उतारणीच्या अवघड पाण्याचे साठवण केल्यानंतर ते शेतापर्यंत कसे न्यायचे. शेतीवर त्याचा वापर कसा करावयाचा हाही एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे.
इलेक्ट्रॉनिक्सचे शास्त्र व जलव्यवस्थापनेचे शास्त्र हे सारखे नाही. इलेक्ट्रॉनिक्सचे गुणधर्म अमेरिकेत जे आहेत तेच भारतात आहेत पण जलव्यवस्थापनेचे शास्त्र तेथील हवामान, पीकपाणी, जमीन (माती) शेतकरी. त्यांची स्वतःची विचारधारा या अनेक गोष्टींशी निगडीत असल्यामुळे संशोधन-स्थळ काल विशिष्ट असणे आवश्यक आहे. इतर ठिकाणची विचारसूत्रे जरी घेतली तरी त्याचा अवलंब करताना आपल्या भूमीत ते रुजू शकेल ह्या दृष्टीने त्यात आवश्यक ते बदल करणे आवश्यक आहे.