यावर पंतजी म्हणाले, की
'चव्हाण मुख्यमंत्री आहेत व ते आपले अनुभव सांगत आहेत.'
यामुळे एकंदर रागरंग मोरारजीभाईंच्याही लक्षात आला.
मग पंतजींना विचारण्यात आले,
'पुढे काय?'
ते म्हणाले,
'चव्हाण यांना जर या प्रकारे वाटत असेल, तर आपल्याला काही करावे लागेल.'
मग मोरारजीभाईंना त्यांचे मत देण्यास सांगण्यात आले. मोरारजीभाई म्हणाले, 'द्वैभाषिक राज्य मोडण्याची कल्पना मला मान्य नाही. माझ्या तत्त्वाच्या ती विरुद्ध आहे. तेव्हा पक्षाने द्वैभाषिक मोडावे, असे मी सांगणार नाही; पण चव्हाणांचे मत वेगळे आहे आणि आपल्याला याचा विचार करावा लागेल.' एवढे बोलून त्यांनी जगाच्या इतिहासातील द्वैभाषिक राज्यांची उदाहरणे दिली.
मी मग म्हणालो,
'द्वैभाषिक राज्याचा प्रयोग चांगला आहे. मोरारजीभाई म्हणतात, यात काही चूकही नाही. परंतु द्वैभाषिकाचा प्रयोग करण्यासाठी आमचीच का निवड केली, असे लोक विचारतात आणि त्यांच्या मनाला ते डाचते. इतरांचा हक्क आपण मान्य केला आहे, मग आमचा का नाही, असा त्यांचा प्रश्न. निदान मराठी लोकांना हे फार बोचते. त्यांच्याशी यासंबंधात तर्कसंगत चर्चा करणे शक्य नाही.'
मोरारजीभाई म्हणाले,
'इतर राज्यांबाबतही हा प्रयोग करण्याची कल्पना होती, पण कोणी मानली नाही. तामिळनाडू व केरळ यांचे एक राज्य करण्याची सूचना झाली होती, पण कामराज यांनी ती मानली नाही.'
हा प्रश्न निघाला, तेव्हा कामराज कसे बसले होते व ते 'नाही, नाही, नाही' एवढेच कसे म्हणाले, याची नक्कलच मोरारजीभाईंनी केली.
मी पुन्हा सांगितले, की
'द्वैभाषिकाच्या मी विरुद्ध नाही, पण हा प्रयोग केला आणि तो फसला.'
यानंतर बैठक संपली. ती बैठक निर्णायक होती.
सकाळी मी मुंबईला परतलो.
त्या दिवशी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद वगैरे ठिकाणच्या वृत्तपत्रांत या बैठकीची बातमी ठळकपणे आली. पंडितजींनी घेतलेल्या बैठकीचा हा वृत्तान्त कदाचित त्यांच्या वर्तुळातून प्रसिद्धीला दिला गेला असेल.