काँग्रेसचे अधिवेशन जानेवारीत नागपूरला झाले. अधिवेशनाचे यजमानपद माझ्याकडे होते. त्यामुळे मोकळा वेळ थोडा मिळत होता. पंडितजी राजभवनावर राहत होते. आमची गाठ पडे, तेव्हा ते त्या मुक्कामात नागपूर व नागपूरच्या लोकांचे प्रश्न यांविषयी विचारणा करीत. नागपूर सोडण्यापूर्वी आदल्या संध्याकाळी त्यांनी मला बोलावणे धाडले आणि द्वैभाषिक तोडल्यावर काँग्रेसला बहुमत मिळेल, की नाही, याचा हिशेब केला की नाही, असे त्यांनी विचारले. मी होकार देऊन, बहुमत मिळेल, असे म्हटले. हे कसे शक्य आहे? असे त्यांनी विचारल्यावर मी सांगितले, की तांत्रिक दृष्ट्या आम्ही अल्पमतात आहोत, पण विरोधकांतले निदान पंधरा सदस्य केवळ महाराष्ट्राच्या प्रश्नावरच विरोधी पक्षात आहेत. पण द्वैभाषिक तोडले जात असून, महाराष्ट्र स्थापन होत आहे, हे जर त्यांना कळले, तर हे पंधराजण तरी काँग्रेसला पाठिंबा देतील, ते काँग्रेसमध्ये येतील की नाही, हे सांगता येणार नाही, पण तेही शक्य आहे.
पंडितजी म्हणाले,
'मला त्यांची नावे कळण्याची गरज नाही, पण हे सर्व शक्य आहे, असे तुझे निश्चित मत आहे काय?'
मी म्हणालो,
'होय'
यावर मे मध्ये किंवा मार्च वा एप्रिलच्या प्रारंभी मोरारजीभाईंच्या बरोबर एक बैठक करावी लागेल आणि त्यांच्याशी बोलून, चर्चा करूनच जे काही ठरवावयाचे ते ठरवावे लागेल, असे ते म्हणाले. मी अर्थातच हे मान्य केले आणि मग मार्चअखेरीस व एप्रिलच्या प्रारंभी ही बैठक घेण्याचा बेत ठरला.
पुढे मार्चच्या मध्यावर माझी प्रकृती बिघडली, मला किडनीचा विकार झाला होता आणि शस्त्रक्रिया करणे भाग पडले. ती होऊन मला बरे वाटेपर्यंत जून-जुलैत मी मुंबईस कामावर परतलो. नेहरू माझ्यापाशी बोलले व आजारामुळे द्वैभाषिकाचा प्रश्न मागे पडला व आता त्याबद्दल केव्हा चर्चा करावयाची, याची त्यांनी चौकशी केली. ऑगस्टमध्ये ती करणे बरे, असे मी सांगितले. ते त्यांना मान्य झाले. मी एकोणीस वा वीस ऑगस्टला दिल्लीत यावे, असे त्यांनी सुचविले. तत्पूर्वी निदान काही प्रमुख व्यक्तींशी चर्चा करणे बरे, असे मत मी बोलून दाखविले. तेव्हा दुस-या दिवशी सकाळी याबद्दल काय ते ठरवू, असे त्यांनी उत्तर दिले व मला दिल्लीला बोलावले.
दिल्लीला निघण्यापूर्वी मी मोरारजीभाईंकडे फोन केला. नेहरूंनी मला बोलाविले असून, द्वैभाषिक राज्याचा आढावा त्यांना घ्यावयाचा आहे व तुमची हजेरी अपेक्षित आहे, असे मी कळविले. मी मोरारजीभाईंशी बोललो की नाही, हे आठवत नाही; पण त्यांच्याकडेच मी उतरत आलो होतो व याही वेळी त्यांच्याकडे उतरावयाचे होते. मी त्यांच्या कुटुंबातल्यासारखाच होतो. मोरारजीभाईंशी बोलून मी निरोप दिला की नाही, हे आठवत नसले, तरी त्यांचे चिटणीस श्री. टोणपे यांच्याशी बोललो, हे निश्चित. टोणपे हे माझे दिल्लीतील मित्रच होते. दुस-या दिवशी मी दिल्लीत आलो, तेव्हा विमानतळावर मला घेण्यासाठी टोणपे आले होते. त्यांनी सांगितले, की मोरारजीभाई संसदेत गेले आहेत आणि पंडितजींना भेटण्यापूर्वी मी त्यांना भेटावे. मोरारजीभाईंच्या सवडीने मी त्यांना भेटेन, असे मी टोणपे यांना सांगितले. त्याप्रमाणे चारच्या सुमारास मला त्यांच्याकडून बोलावणे आले.