ऋणानुबंध (62)

मोरारजीभाई रागावले नव्हते, पण अस्वस्थ होते. त्यांनी मला एकंदर परिस्थितीचा आढावा काय, असा प्रश्न केला. मी माझे मत दिले. मोरारजीभाईंनी ते ऐकून घेतले. त्यांनी राग वा विरोध व्यक्त केला नाही. त्यांना वाईट मात्र वाटले होते. मी त्या वेळच्या त्यांच्या वृत्तीचे जरूर कौतुक करतो. अर्थात आपल्याला वाईट वाटले, हेही त्यांनी मला सांगितले नाहीच. दुस-या काही मित्रांना सांगितले. तसे ते अतिशय संयमी वृत्तीचे आहेत.

माझे मत ऐकून घेतल्यावर मोरारजीभाई म्हणाले,
'हे तुमचे प्रामाणिक मत असेल, तर मी याबद्दल काही बोलू शकत नाही; परंतु हे सर्व दु:खद व दुर्दैवी आहे, हे मात्र खरे !'

यानंतर आम्ही उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी उपचारार्थ केल्या. रात्री आम्ही दोघेही मोरारजीभाईंच्या घरी एकत्र जेवलो व एकाच मोटारीतून पं. गोविंद वल्लभपंत यांच्याकडे गेलो.

पंडितजी तेथे आले होते व याप्रकारे आम्ही चौघेच जमलो होतो. आम्ही बसताच पंडितजी म्हणाले,
'चव्हाण, तुमचा काय आढावा असेल, तो सांगा पाहू.'

त्यावर मी माझ्या दृष्टिकोनातून परिस्थितीचे विश्लेषण केले. मी सांगितले, की 'गुजराती समाजाबरोबर आमचे संबंध चांगले आहेत. कारभारयंत्रणाही ठीक रीतीने चालू आहे. मराठी व गुजराती समाजांतील तणावही बराच नियंत्रणाखाली आहे. पण दोन्ही समाज सध्याच्या व्यवस्थेबाबत समाधानी नाहीत. द्वैभाषिकाचा प्रयोग चालू ठेवण्याचीही माझी तयारी आहे, पण लोक खूश नाहीत.'

यावर
'गुजरातीही समाधानी नाहीत, हे कसे मी म्हणतो?' असे मला विचारण्यात आले.

मी उत्तर दिले,
'मी मुख्यमंत्री आहे आणि रोजच्या अनुभवावरून मी हे सांगतो. मुख्यमंत्री या नात्याने ५७ साली मी अहमदाबादला गेलो, तेव्हा अत्यंत उग्र निदर्शने झाली आणि गोळीबार करावा लागला. त्यानंतर मी न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला. न्यायमूर्ती कोतवाल यांना चौकशीसाठी नेमण्यात आले. या आयोगापुढे जाऊन मी लेखी कैफियत दिली व सर्व जबाबदारी माझ्याकडे घेतली. नंतर या आयोगाचा अहवाल आला, तेव्हा त्याने माझी प्रशंसा केली.'

गुजरात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगले सहकार्य देतात, हेही खरे असल्याचे मी स्पष्ट केले; पण लोक समाधानी नाहीत, याची जाणीव करून दिली.