ऋणानुबंध (45)

दडपशाही वाढू लागली तशी लोकांच्या मनातील चीडही वाढीला लागली. एक प्रकारची बेडरपणाची वृत्ती जनतेत निर्माण होऊ लागली. ब्रिटिश सत्तेबद्दलचे प्रेम तर राहिलेच नव्हते, पण जी थोडी-फार भीती होती, तीही नष्ट झाली. शासनाबद्दल प्रेम किंवा भीती वाटणे हेच कुठल्याही सत्तेचे दोन आधारस्तंभ असतात. ते दोन्ही डळमळले होते.

केवळ गोळीबार, लाठीहल्ला एवढ्यापुरतीच ही दडपशाही मर्यादित नव्हती, तर भूमिगतांच्या नातेवाइकांना त्रास देणे, त्यांचा छळ करणे हे प्रकार सुरू झाले. माझी परिस्थिती थोडीशी अवघड होती. २ जून, १९४२ रोजी माझे लग्न झाले आणि ९ ऑगस्टपासून मी भूमिगत झालो. हा रामदासाचा तर सुधारलेला अवतार नाही? अशी शंका माझ्या पत्नीच्या मनात आलीही असेल ! कारण तिचे पूर्वायुष्य अत्यंत शांत वातावरणात गेले होते. असले वादळी जीवन पहिल्यानेच ती अनुभवत होती. पण तिने या प्रसंगाला मोठ्या धीराने तोंड दिले. पण तेवढ्यावरच भागले नाही. माझा ठावठिकाणा शोधण्यासाठी सरकारने तिला त्रास दिला. इतकेच नव्हे, तर माझ्या मधल्या बंधूंना व माझ्या पत्नीला अटकेत ठेवण्यात आले. नव्या संसाराची स्वप्ने रंगवण्याच्या वयात तिला तुरुंगाची हवा चाखावी लागली. तीही, तिने माझ्याशी लग्न केले, या एकाच अपराधाबद्दल ! मला जास्त वाईट वाटले, ते तिच्या लग्नानंतरच्या पहिल्याच कौतुकाच्या संक्रांतीवर तुरुंगाची संक्रांत आली म्हणून. पण तिने ह्या निराशेचा कडवटपणा कधीही जिभेवर येऊ दिला नाही. आम्ही भूमिगत कार्यकर्ते मात्र सण-वार विसरून किर्लोस्करवाडी, औंध, ओगलेवाडी, कुंडल यांसारख्या संस्थानी हद्दीतील गावांतून आमच्या बैठकी घेत होतो, कार्यक्रम आखत होतो. जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन सभा घेत होतो. त्या मंतरलेल्या काळात सभेची पूर्वतयारी वगैरे काही भानगड नव्हती. जनतेच्या मनात स्वातंत्र्याचा अग्नी धगधगत होता. फक्त पंधरा मिनिटे आधी एखाद्या गावात सूचना जायची. पंधरा मिनिटांत हजारो लोक सभेला जमायचे. मला अशीच एक शिराळ्याची सभा आठवते. अक्षरश: पंधरा मिनिटांत प्रचंड जनसमुदाय हजर झाला होता. मी सभेत भाषण केले. पोलीसही हजर होते. पण एवढ्या जनसमुदायादेखत अटक करण्याचे अविचारी धाडस पोलिसांनी केले नाही. अशा वेळी सभा संपली रे संपली, की पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन त्या गावातून पोबारा करण्याची खबरदारी घ्यावी लागे. त्या काळात, जनतेचे प्रेम म्हणजे काय असते, याचा जो अनुभव आला, तो लाखमोलाचा होता. सामान्य लोक फार आपुलकीने वागवीत. अहमहमिकेने खाण्यापिण्याची सोय करीत. एखाद्या गावात आम्ही मुक्कामाला असलो आणि एखादा अनोळखी चेहरा गावात दिसला, की ताबडतोब आम्हाला संदेश मिळत असे. लोक आमच्या रक्षणासाठी अत्यंत जागरूक असत. शक्यतो एका रात्रीपेक्षा अधिक काळ एका गावात वस्तीला राहावयाचे नाही, असा आमचा अलिखित नियम होता. पण काही वेळा हा नियम पाळणे अशक्य असे. माझ्यावर असा विलक्षण प्रसंग आला होता. माझे सर्वांत मोठे बंधू वारले. ही बातमी मला समजली तेव्हा मीच स्वत: भूमिगत अवस्थेत अतिसाराने अंथरुणाला खिळून होतो. घोडनदीला एका लोणा-याच्या घरात मी पंधरा दिवस रुग्णावस्थेत काढले. गावात आजारपणाची चर्चा नको म्हणून पुण्याच्या डॉक्टरांकडून औषध आणले जात असे. बंधूंच्या मृत्यूचे दु:ख अगतिकतेमुळे फार फार जाणवले.