यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७६

यशवंतरावांना सामान्य माणसांना महत्त्व देणारी व विचारात घेणारी व त्यांच्या कल्याणाच्या विकासाचा कार्यक्रम राबविणारी लोकशाही अभिप्रेत होती. त्याचबरोबर ते समाजवादाला अधिक महत्त्व देत असत, कारण समाजवाद म्हणजे सर्व क्षेत्रांतील विषमता नष्ट करून सर्वांना समान संधी व संपत्तीचे समान वाटप हे समाजवादी विचारसरणीचे महत्त्वाचे अंग आहे. शोषणरहित समाजाची निर्मिती हे समाजवादी विचारसरणीचे अंतिम ध्येय आहे. एकता, लोकशाही व समाजवाद याची पूजा म्हणजे मानवतेची सेवा असल्याचे ते स्पष्ट करतात. "समाजातील सर्व वर्गांना एकाच प्रकारची, एकसारखी आणि समान त-हेची संधी मिळेल अशा प्रकारची, परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. समाजवादी जीवनाकडे घेऊन जाणारे हे दोन मार्ग आहेत. कोठलीही एक व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह अथवा गट अगर वर्ग दुस-यांची पिळवणूक करीत नाही अशा प्रकारचे समाजवादाचे चित्र मी पाहत असतो. घोडेस्वारासारखा, एका दुस-याच्या पाठीवर बसला आहे, अशी परिस्थिती ज्यात नाही, अशा त-हेचे आर्थिक समतेवर आधारलेले समाजवादाचे चित्र माझ्यासमोर आहे." याचबरोबर अपेक्षित समाजवादाचे चित्र साकार करण्यासाठी इतिहासावर विश्वास ठेवण्यास ते सांगतात. कारण इतिहासाची स्वतंत्र अशी प्रक्रिया असते. म्हणून आमचा समाजवाद भारताच्या विशिष्ट अनुभूतीतून निर्माण झाला असून ऐतिहासिक परिस्थितीतून घेतलेला आहे. त्यामुळे तो लोकशाही मूल्यांवर आधारलेला आहे, असे ते सांगतात. शिवाय समाजवादाच्या नावावर जनतेची कुणी दिशाभूल न करण्याची सूचनाही देतात. महाराष्ट्रात समाजवादाची रचना स्वतंत्रपणे करावयाची आहे. तो आमचा निर्धार आहे, ध्येय आहे, उद्देश आहे असे ते सांगतात. हे काम सहज शक्य नाही. त्यासाठी लक्षावधी लोकांच्या प्रयत्नांतून हळूहळू ते सहज शक्य होईल. "विणकर जेव्हा महावस्त्र विणण्यासाठी बसतो तेव्हा ते महावस्त्र ताबडतोब तयार होत नाही. सुरुवातीला जेव्हा तो आपल्यासमोर गुंतागुंतीचे सगळे लांब धागे टाकून बसतो तेव्हा आपल्याला सगळा गोंधळ दिसतो. एका धाग्याशी दुसरा धागा समांतर अशा पद्धतीने टाकलेले अनेक धागे आपल्याला दिसतात त्यावरून हा कसले महावस्त्र निर्माण करणार अशी आपल्याला शंका येते. परंतु तो जेव्हा त्या समांतर धाग्यामधून आडवे धागे टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून हळूहळू सुंदर महावस्त्र तयार होत चालल्याचा प्रत्यय आपणास येतो.

समाजवाद आणण्यासाठी अशाच त-हेचा प्रयत्न हिंदुस्थानमध्ये करावा लागेल."  असे विचार त्यांनी विधानसभा व विधानपरिषदेच्या समोर मांडले. थोडक्यात शोषणरहित समाज निर्माण व्हावा. व्यावहारिकदृष्ट्या जे योग्य आहे त्याचा स्वीकार करावा. केवळ काल्पनिक तत्त्वावर अथवा तत्त्वज्ञानावर अवलंबून राहू नये.  असा सल्ला ते देतात. राजकारण हे समाजकारणाचा एक भाग समजून त्याच्या आधारे समाजकारण करावे. खेड्यातील गोरगरीब जनतेच्या विकासाचा विचार व्हावा. एवढेच नव्हे तर महात्मा गांधीजींच्या रामराज्याची कल्पना मूर्त रूपात करण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. त्यासाठी ते म्हणतात, "ज्या समाजामध्ये प्रत्येक मनुष्य स्वाभिमानाने आपली मान उंच करून निर्भयपणे वावरू शकेल त्याला पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र मिळेल. त्याला आपल्या बुद्धीचा आणि शीलाचा विकास करण्याची संधी मिळेल. अशा प्रकारचा समाज आपणास निर्माण करावयाचा आहे." या विचारावरून यशवंतरावांचे भविष्यकालीन भारतीय समाज कसा असावा, याबाबतचे स्पष्ट मत व्यक्त होते. शिवाय प्रत्येक माणसाने जात-पात धर्म भेदभाव विसरून विकासाचा ध्यास घेतला पाहिजे. लोकशाही आण स्वातंत्र्याच्या मदतीने समानता निर्माण झाली पाहिजे. गोर-गरीबांची गरिबी हटवून लहान व मोठे हा भेद नाहीसा करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक माणसाच्या मनात जागृती निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाने स्वाभिमानी बनले पाहिजे,"मी गरीब राहणार नाही, मी उपाशी राहणार नाही, मी कोणाचा लाचार राहणार नाही. मी या देशाचा मालक आहे. मी स्वतंत्र देशाचा मालक आहे, मी लोकशाहीचा मालक आहे. मला या देशामध्ये लोकशाही टिकवली पाहिजे, स्वातंत्र्याची शक्ती मोठी केली पाहिजे, माझे स्वत:चे जे व्यक्तिमत्त्व आहे, माझे स्वत:चे जे सामर्थ्य आहे. ते मी देशाच्या कामाला लावले पाहिजे. त्यासाठी मला जो जो मार्ग मोकळा दिसेल तो तो मार्ग मी अंगीकारला पाहिजे." अशा प्रकारचे त्यांचे सामाजिक विचार अतिशय प्रगतिशील व आधुनिक मानायला हवेत. सामाजिक क्रांती साधण्याचे राजकारण हे सान मानून सार्वजनिक जीवनातील काही मूल्ये, ध्येय समाजपरिवर्तनासाठी समाजासमोर ठेवतात.