यशवंतरावा मुळातच सामाजिक कार्यकर्ते असल्याने एखादा मुद्दा समाजाला समजावून सांगण्याची त्यांची हातोटी अजब होती. सोप्या सोप्या उदाहरणाने व छोट्या छोट्या अर्थगर्भ वाक्यांनी समजावून देण्याची कला त्यांच्याकडे होती. तसेच त्यांची भाषेवर व शब्दावर हुकूमत होती. त्यामुळे जे शब्द बोलायचे त्यातून भरपूर आशय कसा व्यक्त होईल याकडे त्यांचे अधिक लक्ष असे. त्यांनी शब्दाचे सामर्थ्य, सौंदर्य, लालित्य ओळखले होते. त्यामुळे अभिव्यक्तीपेक्षा शब्दांच्या आशयावर त्यांचे स्वाभाविकच जास्त लक्ष दिसते. छोट्या प्रसंगातून व सहजबोलीतील सुंदर अन्वयार्थ शब्द योजनेतून त्यांची ही भाषणशैली नटली आहे. त्यांच्या या बोलण्यात साजशृंगार नाही की नखरेलपणा नाही. जे विचार त्यांनी मांडले ते सर्वसामान्यांच्या उद्बोधनासाठी व हितासाठीच. मनातली तळमळ व त्या विषयाची अगतिकता सामान्य माणसांच्या भाषेत मांडण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे.
निबंधशैलीतील सामाजिक भाषणे :
यशवंतरावांची भाषणे ज्याप्रमाणे साहित्य, संस्कृती व शिक्षण या विषयांवर आहेत त्याचप्रमाणे सामाजिक विषयांवरही त्यांची अनेक भाषणे उपलब्ध आहेत. या भाषणांत त्यांनी अनेक बाबींचा परामर्श घेतलेला आहे. या भाषणांमध्ये विविधता खूप आहे. पण या सर्व भाषणांमधून एक धागा सलगपणे सर्वत्र गेलेला दिसतो तो म्हणजे यशवंतरावांच्या सामाजिक प्रेमाचा. हे प्रेम संकुचित नाही, विशिष्ट गोष्टींनाच अधिक महत्त्व देणारे नाही. त्यात व्यापकता आहे तशीच सर्वसमावेशकता आहे. त्यांच्या सामाजिक प्रेमाची पाळेमुळे ही तत्कालीन हिंदुस्थानातील खेड्यापाड्यातील भूमीत रुजली होती. त्या काळात त्यांच्या मनाला हुरहुर लावणारे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले होते. त्या प्रश्नांचा तळ शोधण्याचा त्यांनी त्यांच्या काळात सदैव प्रयत्न केला. यशवंतराव वयाने जसे वाढत गेले तशी त्यांची सामाजिक जाणीवही प्रगल्भ होत गेली, विकसित झाली. समाजात जे जे बदल झाले, ज्या नव्या विचारप्रणाली निर्माण झाल्या. त्या विलक्षण तीव्र संवेदनशीलतेने, शांत समंजपणाने आणि डोळस वृत्तींनी न्याहाळल्या. तसेच समाजातील, वैयक्तिक जीवनातील पारतंत्र्य, दारिद्रय आणि अज्ञान याने ते व्यथित होताना दिसतात. यातूनच समाजाकडे बघण्याचा त्यांचा निश्चित असा दृष्टिकोन बनत गेला. त्यासंबंधी त्यांची निश्चित अशी काही मते आहेत. काही विचार आहेत. हे विचार अखंड वाचन, मनन व स्वानुभव यातून सिद्ध झालेले आहेत. तेच विचार त्यांनी अनेक भाषणांतून प्रभावीपणे मांडले आहेत. यशवंतोरावांनी त्यांच्या राजकीय राजवटीमध्ये अनेक सामाजिक समस्यांचा विचार मांडला. या समस्या टाळण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता. त्यांचे अर्थविचार असो की शेतीसंबंधी किंवा उद्योगधंद्यासंबंधी अथवा सामाजिक प्रश्नांबाबत मांडलेले विचार असोत, त्या सर्वांच्या पाठीमागे एकच हेतू होता. माझा समाज, माझे राष्ट्र बलवान व सामर्थ्यसंपन्न बनले पाहिजे. यासाठी सर्वच क्षेत्रांतील सर्व प्रकारची विषमता नाहीशी होणे आवश्यक आहे. यावर तो विशेष करून लक्ष केंद्रित करताना दिसतात. निव्वळ आर्थिक विकास होऊनच काम भागणार नाही तर सामाजिक विकासही व्हायला पाहिजे असा ते आग्रह धरतात. सामाजिक समतेशिवाय समाजाचा विकास होणे अशक्य आहे. म्हणूनच हा विकास साधण्यासाठी एकदिलाने, एकजुटीने, एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठीच सामाजिक समता असणे महत्त्वाचे आहे. एकूणच राष्ट्राच्या उभारणीत समाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दृष्टीने त्यांची काही भाषणे महत्त्वाची आहेत. 'राष्ट्ररचनेतील समाजसेवेचे महत्त्व', 'सामाजिक समतेचे कार्य', 'विविधतेतील एकता', 'समाजवादाचा आमचा मार्ग', 'विकासाची शर्यत', 'सामाजिक प्रगतीच्या प्रेरणा', 'आमच्या मूळ समस्या', 'समाजसेवेचे महत्त्व' इ. वयासारख्या भाषणातून त्यांची समाजाभिमुखता प्रकट होताना दिसते.
यशंवतरावांनी आपल्या भाषणांतून जी सामाजिक जाणीव प्रकट केली आहे ती त्यांच्या वास्तवाच्या आकलनातून केली आहे. हे आकलन-प्रकटनातून वास्तवाच्या असंख्य बाबी मांडल्याने त्यांच्या या भाषणसाहित्याला मोठा अर्थ प्राप्त होतो. भारतीय समाज जागृत होऊन सर्व बाबतीत त्याने जगाची बरोबरी करावी. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीला दुस-याच्या स्वातंत्र्याआड न येता जास्तीत जास्त जेवढे स्वातंत्र्य मिळणे शक्य आहे तेवढे मिळावे असे त्यांना वाटते. देशातल्या हर त-हेच्या दु:खाविषयीची उत्कट तळमळ आणि ती दु:खे त्यागाने आणि विवेकनिष्ठेने दूर करण्याची इच्छा प्रत्येक मानवाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.