यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७३


यशवंतरावांनी नवसमाज निर्मितीत समतेचे महत्त्व ओळखळे होते. यासाठीच ते समतेचा आग्रह धरतात. समता म्हणजे व्यक्तीव्यक्तींमध्ये झालेला संवाद. मग हा संवाद चर्चेतून असो, वाङ्मयातून असो, व्यासपीठावरून असो, संवाद साधण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असते. या संवादातून सुसंवाद निर्माण झाला पाहिजे व यातूनच समाजाची उन्नती झाली पाहिजे. मने सुसंस्कारित झाली पाहिजेत असे त्यांना वाटे. त्यांच्याकडे माणसे जोडण्याची कुशलता होती. त्यांना मार्गदर्शन करणे व त्यांना कधी उपलब्ध करून देणे, सहका-यांना विश्वासात घेणे व त्यांच्यावर जबाबदारी टाकून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे त्यांचे गुणवैशिष्टय होते. एखादा मुद्दा कार्यकर्त्यांना व विरोधकांना नेमक्या शब्दांत ते पटवून देत असत. आदर्श समाजव्यवस्थेची संकल्पना अशीच स्पष्ट करताना ते म्हणतात, "ज्या समाजात आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सर्व लोक समान पातळीवर असतात आणि ज्याला आपण समाजसेवा म्हणतो तिच्या मदतीशिवाय जीवनातील सर्व उपलब्ध सुखसोईंचा जिथे सर्वांना सारख्या प्रमाणात उपभोग घेता येतो, अशा प्रकारच्या समाजव्यवस्थेस आदर्श समाजव्यवस्था म्हणता येईल." भारतात आर्थिक व सामाजिक विषमता निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे नियोजन व योजनाबद्ध अर्थव्यवस्था नसल्यामुळे लोकांची सर्वांगीण सुधारणा होत नसल्याचे ते सांगतात.


समाजसुधारणा करणा-या समाजसुधारकांपेक्षा राज्यकर्ते हे काम अतिशय प्रभावीपणे करू शकतील असा त्यांचा विश्वास आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्तेच्या क्षेत्रात काही कारभार करणे वा निवडणुका लढविणे नसून समाजपरिवर्तनाचे ते साधन आहे असे यशवंतराव मानतात. म्हणून समाज गतिमान बनविण्यासाठी राज्यकर्त्या मंडळींनी पुढाकार घ्यावा. म्हणजेच समाजपरिवर्तनाच्या माध्यमातून हे काम करता येईल. समाजपरिवर्तन करण्यासाठी सत्ता किवा मिळालेला अधिकार हे साधन आहे. साध्य नव्हे असा इशाराही कार्यकर्त्यांना देताना दिसतात. सामाजिक जाणीव मनात बाळगून महाराष्ट्रातील राजकारणाच्या क्षेत्रात यशवंतरावांनी काम केले. त्यांनी सामाजिक प्रश्नांचे महत्त्व जाणून घेतले. ज्या सुधारणा करायच्या त्या जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्याशिवाय माणसामाणसांना संघटितपणे एकमेकांविरुद्ध शिकविणारा जातीवाद नाहीसा होणार नाही. महाराष्ट्रातील समाजमन विविध गंडांनी दुभंगले आहे. अनेक प्रकारच्या पूर्वग्रहांनी ते व्यापलेले आहे. त्यामुळे या समाजात भावनिक एकात्मता आढळत नाही. उलट अनेक त-हेची भेदाभेदाची मोठी थोरली उतरंड रचली आहे. म्हणूनच हिंदुस्थान दुबळा बनला, प्रगतीपासून दूर गेला. ही प्रगती यशस्वी करून घ्यावयाची असेल व आर्थिक व औद्योगिक क्रांती करावयाची असेल तर समाजातील ही उतरंड नाहीशी केली पाहिजे. या संदर्भात यशंवतराव म्हणतात, "समाजामध्ये आम्ही ही जी उच्चनीचतेची, जातीभेदांची, वर्णभेदांची उतरंड रचलेली आहे ती केवळ एकाच प्रांतात रचलेली नसन सर्व हिंदुस्थानभर रचलेली आहे. ही उतरंड मोडण्याचे काम ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपण खरी क्रांती केली असे मी म्हणेन." माणसामाणसातील जातीयता नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. एका समाजाला दुस-या समाजापासून बाजूला ठेवणा-या या सामाजिक विषमतेच्या भिंती आपण पाडून टाकल्या पाहिजेत. एक मन एक समाज अशी भावना निर्माण झाली पाहिजे आणि प्रेमाचे आणि सहकाराचे चित्र निर्माण झाले पाहिजे अशी अपेक्षा यशवंतराव करतात.