यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-२

यशवंतरावांचा आदर्श त्यांच्यासमोर राहावा, मानवी मूल्यांचा उच्च आदर्श निर्माण व्हावा यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. साहित्यातून व्यक्त झालेल्या त्यांच्या जीवनातील आठवणींचा, आपले मत व्यक्त करण्याचा मोह सर्वांनाच होतो. यशवंतराव चव्हाण हे अपयशाने न खचणारे व यशाने हरखून न जाणारे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव लेखकावर पडला. म्हणून त्यांचे विचार, त्यांच्यावरील ग्रंथ, त्यांच्यावरील सर्व प्रकारचे साहित्य, म्हणजेच साहित्यातील यशवंतराव व साहित्यिक यशवंतराव यांचा अभ्यास करण्याचा ओढा माझ्या मनात निर्माण झाला.

मला असे म्हणावेसे वाटते की देशाची उंची वाढते ती केवळ त्यातील महान पर्वत व नद्या यांच्यामुळे नाही तर तेथील क्रियाशील विचारवंतांच्या तपश्चर्येमुळे. अशा क्रियाशील विचारवंतांमध्ये यशवंतरावांचा उल्लेख करावा लागेल. अशा या महान पुरुषाची जीवनज्योत इतराना आशेचे किरण दाखवते. यशवंतरावांसारख्या सामान्य माणूस स्वकर्तृत्वाने परिस्थितीवर मात करु शकतो. ही गोष्ट निराशावादी माणसांना कार्यप्रवृत्त करणारी आहे. त्यासाठीच यशवंतराव चव्हाणांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणे, त्यांच्या साहित्यिक मूल्य विचारांचा तटस्थेतेने विचार मांडणे हा हेतू आहे.

यशवंतराव चव्हाणांच्या साहित्यामुळे महाराष्ट्र काल, आज आणि उद्याच्या संदर्भात भर पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक व राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती कशी होत गेली याचे सिंहावलोकनही करण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. 'आजचे नेते, उद्याचे प्रेरक'या नात्याने तरुण पिढीला, मुलांना आणि भावी पिढीला त्यांचे विचार समजावेत म्हणूनच हा छोटासा प्रयत्न आहे.

यशवंतराव चव्हाण हे  एक फार मोठे लोकनेते होते; खरा लोकनेता हा एका अर्थाने लोकशिक्षक असतो. लोकनेत्याला लोकांच्या विविध प्रश्नांची जाणीव असणे आवश्यक असते. त्याचबरोबर लोकनेत्याने समाजाचे सातत्याने प्रबोधन करावे लागते. तेच नेमके यशवंतरावांनी केले. असा हा लोकनेता समाजाला सतत विचार देणारा होता. त्याने समाजाला विचारशील बनवण्याचा प्रयत्न केला. समाजाला त्या काळात विचारप्रवण केले. आणि नवमहाराष्ट्रात विचारांची एक वीण तयार होऊ लागली. महाराष्ट्राचा आकृतिबंध कसा असावा याविषयी त्यांनी सतत चिंतन आणि कार्य केले आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्याचे फार महत्त्वाचे कार्य आहे. सृजनशील विचारांनी भारलेला एक द्रष्टा नेता म्हणून साहेबांचा त्या काळात लौकिक होता. महाराष्ट्राचा भवितव्याविषयी यशवंतराव आपले चिंतनगर्भ विचार मांडीतच राहिले. कलाकारांना कसे फुलवायचे हे तंत्र जाणणारे ते एक जादुगार होते. त्यांच्या प्रेरणेने कलाकार फुलले साहित्यिक ही भारावून गेले. गुणांची कदर करणारा व लोकांच्या भावना जपणारा असा हा महामानव होता. त्यांच्या एक सत्कार समारंभात सातारचे एक नवोदित लेखक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते 'उपरा'कार लक्ष्मण माने श्रोत्यात बसलेले साहेबांना दिसले. साहेबांनी त्यांना तेथून आपल्याजवळ बोलावून घेतले आणि समारोपाच्या भाषणात त्यांनी डॉ. अनिल अवचटांच्या 'माणूस'च्या बरोबरीने लक्ष्मण माने यांच्या 'उपरा'चा जाणीवपूर्वक गौरव केला. यावरून त्यांचे साहित्यिकांवर व साहित्यावर असलेले प्रेम दिसून येते. हे प्रेम त्यांनी स्वत:  पुरते ठेवले नाही. इतरांनाही प्रेरणा देऊन सातत्यपूर्वक फुलविले. पश्चिम महाराष्ट्रातून आज निर्माण झालेली अनेक ग्रामीण साहित्यिक मंडळीही त्यांच्या जाणीव जागृतीची साक्ष देतील.

विकसनशील भारताला सर्वांगीण प्रगतीचे शिखर गाठायचे असेल तर सर्वांगीण प्रगती म्हणजे नेमके काय हे उमजणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नव्या पिढीने यशवंतरावांच्या साहित्याचा अभ्यास करणे महत्त्वाच आहे. म्हणून यशवंतरावांसारख्या देशातील एक मुत्सद्दी विचारवंत, साहित्यिक म्हणून लौकिकास पात्र असलेल्या विचारवंत नेत्याचे अभ्यासपूर्ण संशोधन करणे गरजेचे आहे. लेखकासारखे साहेबांच्या विचारावर, कर्तृत्वावर, साहित्यावर अलोट प्रेम करणारे हजारो या देशात आहेत. महाराष्ट्रामध्ये जी नवीन पिढी सक्रीय राजकारणात, समाज-कारणात, साहित्यात रस घेत आहे किंवा इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत हा विचार पोहोचणे महत्त्वाचे आहे.