विरंगुळा - ८८

नवी दिल्ली
८ ऑक्टोबर १९७

दिल्लीत सकाळी पोहोचलो. विमान तळावरच समजले - कॅबिनेट मीटींग आहे.

सकाळी दहा वाजता झोपेतून उठलो होतो. परंतु मीटींगला गेलो. बाईंनी केव्हा आला, कसा काय प्रवास झाला, वगैरे कुशल विचारले. मी सांगितले, कबूल केल्याप्रमाणे ठरल्या दिवशी थेट परत आलो. अर्थपूर्ण आम्ही दोघेही हसलो.

दिल्लीतले वातावरण मंत्रिमंडळातील बदलाच्या अफवांनी खच्चून भरले होते. आज मनात विचार आला की भेट झाली तर काय बोलायचे. सौ. वेणुबाईंशी बोललो. तिला वाटतेय की बदल करणार नाही. विषय काढलाच तर विचार करू म्हणून मोकळे व्हावे. परंतु मला ते शक्य दिसत नाही. विषय निघाला की होय किंवा नाही हे स्पष्ट सांगावे लागते. माझ्या दृष्टीने केलेल्या जुन्या कामामध्ये जाण्याची मला मुळीच हौस नाही. महत्त्वाची दोनच खाती राहतात. ऍग्रिकल्चर आणि एक्स्टर्नल अफेअर्स.

ऍग्रीकल्चरलसाठी बाबूजी त्यांचे डोळ्यासमोर आहेत असे बरेच दिवस ऐकिवात आहे. एक्स्टर्नल ऍफेअर्स मला ऑफर होईल हे मला शक्य दिसत नव्हते. यापैकी एक ऑफर आली तर होय नाहीतर Good bye असे मनाशी ठरविले. भेटीच्या निमंत्रणाची वाट पहात राहिलो. परंतु भेट झाली ती मजेदारच!

श्री. गंजूच्या मुलीचे लग्नाचे रिसेप्शन त्या दिवशी होते. ते संध्याकाळी होते. गंजू मला भेटून म्हणाला, तुम्ही ७ वाजता या. पंतप्रधान ७॥ वाजता येणार आहेत. म्हणजे त्या येण्यापूर्वी मी येऊन गेलो म्हणजे त्याला सोयीस्कर असा त्याचा बेत.

मी हो म्हटले. बरोबर ७ वाजता पोहोचलो. तो पाच मिनिटात माझ्या पाठोपाठ बाईसाहेब आल्या. मला पाहिले आणि म्हणाल्या इथेच बाजूला उभे राहून बोलू या का? मी म्हटले ठीक. आमची चर्चा दोन मिनिटांत संपली.

त्या म्हणाल्या, तुमच्यासाठी मी एक्स्टर्नल अफेअर्स ठरविले आहे! मी म्हटले ठीक तर आहे. मग इतरांच्या बाबतीत काय काय ठरले आहे ते त्यांनी सांगितले. 'कॅबिनेट वेटिंग' संपले.

गंजूच्या दोन्ही लेकी आणि दोन्ही जावयांना शुभेच्छा ठेवून बाहेर पडलो.
-यशवंतराव
------------------------------------------------------------