अर्थमंत्रीपदाच्या कारकीर्दीत यशवंतरावांनी अर्थविषयक आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अनेकदा परदेशचे दौरे केले. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील चलनाच्या व्यवहारासंबंधी प्रश्नाचा विचार करून त्याच्या व्यवहाराच्या पद्धतीत बदल सुचविण्यासाठी आणि अर्थविषयक तत्सम प्रश्नांचा विचार करण्यासाठी तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'वीस राष्ट्रांच्या कमिटीचे' (सी-२०-कॉमनवेल्थ ट्वेंटी) यशवंतराव हे प्रतिनिधी होते. या कमिटीच्या ज्या सहा बैठका निरनिराळ्या राष्ट्रात झाल्या, या सर्व बैठकींना ते उपस्थित राहिले. भारत, बांगला देश आणि श्रीलंका या देशांच्या वतीने त्यांची या कमिटीवर निवड झाली होती. निवडलेले प्रतिनिधी हे आपल्या देशाचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर प्रतिनिधी या नात्यानं कमिटीच्या कामकाजात भाग घेत असत.
कमिटीचे कामकाज सुरू असतानाच विकसनशील २४ राष्ट्रांनी आपला एक गट स्थापन करून अर्थविषयक विविध प्रश्नांच्या संदर्भात, समान आणि एकसंध भूमिका स्वीकारून सर्वच विकसनशील राष्ट्रांच्या समस्यांसंबंधी विचार सुसंगत राखण्याचं नमुनेदार कार्य केलं. यशवंतरावांनी २४ सप्टेंबर १९७२ला या गटासमोर सर्वप्रथम आपले विचार व्यक्त केले.
वीस प्रतिनिधींच्या (सी-२०) बैठकीत चलन विषयक व्यवहाराच्या बदलाच्या संदर्भात २३ मार्च १९७३ला मार्गदर्शन केलं. १९७३च्या जुलै आणि सप्टेंबर महिन्यांत कमिटीच्या आणि विकसनशील राष्ट्रांच्या ज्या बैठकी झाल्या त्या प्रत्येक बैठकीत त्यांनी पुढाकार घेतला.
कॉमनवेल्थ फायनान्स मिनिस्टर्सची नासा, बहामा येथे झालेल्या वार्षिक बैठकीत यशवंतरावांनी जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (नाणेनिधी) याविषयी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. विदेशमंत्रीपद स्वीकारल्यानंतर भारताच्या विदेश व्यवहार नीतीसंबंधात 'युनो'च्या ऑक्टोबर १९७४ ते जानेवारी १९७७ या काळातील खास अधिवेशनात आपले विचार मांडले. विशेषत: 'यूनो' च्या सातव्या अधिवेशनात न्यूयॉर्क येथे २ सप्टेंबर १९७६ ला जागतिक अर्थकारणाच्या संदर्भातील राजकीय इच्छाशक्ती आणि अपेक्षित बदल याविषयी सुस्पष्ट शब्दात त्यांनी जगातील अर्थतज्ज्ञांसमोर विचार व्यक्त करून अर्थविषयक धोरण बदलण्याची निकड प्रतिपादन केली.
अर्थमंत्रीपद स्वीकारल्यापासून, त्यांच्या कल्पनेतील अर्थविषयक धोरणाचा पाठपुरावा त्यांनी सातत्यानं केला. राष्ट्राचा आर्थिक विकास घडून येण्याच्या कामी मोलाची भर घातली. पुढील काळात या धोरणानुसारच देशाची अर्थविषयक वाटचाल सुरू राहिली. अर्थतज्ज्ञ अर्थमंत्र्यांनी अर्थखात्याचा कारभार पूर्वी केला होता. परंतु अर्थखात्याचा चेहरा-मोहरा बदलून सुसंगत धोरणाचं काम यशवंतरावांनी खात्याच्या आपल्या चार वर्षांच्या कारभारात केलं. चार वर्षे अर्थखात्याचा सुरळीत कारभार करणारे यशवंतराव हे पहिलेच अर्थमंत्री होत.