डॉ. ऍपल (जर्मन फॉरिन इकॉनॉमिस्ट) हा पुरोगामी दृष्टी असलेला सुस्पष्ट विचार बाळगणारा, ग्रामीण विकास यावर अधिक जोर देणारा हा मनुष्य. कृष्णनचे लेखन वाचले होते. हार्बरमध्ये त्यांची भेट झाली. त्यामुळे ओळख झाली. या वर्षीची नोंद करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे व्ही. के. आर. व्ही. राव यांची, सहा अर्थशास्त्रांच्या पुस्तिकेवर आणि त्यांच्या इकॉनॉमिक पॉलिसी यावर चर्चा पुष्कळ पण अकारण गाजली. तथापि त्यातून काही फारसे निष्पन्न झाले नाही.
वित्तमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अर्थविषयक कामासाठी यशवंतरावांना संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करावी लागली. १९७०ला अर्थमंत्री म्हणून जगातील निरनिराळ्या राष्ट्रांचे दौरे सुरू झाले आणि विदेशमंत्री म्हणून १९७७ला दौऱ्यांची समाप्ती झाली. या प्रवासात प्रवासातील घटना, अनुभूती, नियोजित कार्य, त्यातील समस्या आणि उकल, नाना देशात भेटलेली नाना प्रकारची, स्वभावाची माणसं, त्यांच्याशी झालेल्या चर्चा, त्याचे निष्कर्ष, जागतिक अर्थकारण, राजनीती, भारताची भूमिका या सर्वांच्या त्यांनी नोंदी करून ठेवल्या.
देशातील मुत्सद्दी, विचारवंत म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या विचारवंत नेत्याचं अभ्यासपूर्ण, अनुभवसंपन्न असं हे विचारधन आहे. उच्च दर्जाचा ध्येयवाद, तात्त्विक चिंतन आणि साहित्य कुशलता याचं दर्शन त्यांच्या लेखनातून घडतं.
आपल्या विशिष्ट मंत्रिपदाच्या गरजेनुसार विदेशातील उच्चपदस्थ, प्रथितयश व्यक्ती यांच्याशी संधान बांधणे हे यशवंतरावांनी आपले कर्तव्य मानले. भारताच्या हितसंबंधाशी उदासीन कोण, विरोधी कोण, सहानुभूतीचे कोण आणि प्रत्यक्ष मदत करणारे कोण याची त्यांनी या दौऱ्यात पहाणी केली. परिचय करून घेतला. संवाद साधला. सुसंस्कृत शिष्टाचाराच्या पातळीवर हे सर्व सुरू ठेवल्यानं त्यातील औपचारिक भाग वगळून तथ्य कशात आहे आणि वैय्यर्थ कशात आहे याची त्यांनी विलक्षण तटस्थतेनं समीक्षा केली.
जागतिक बँकेचे आणि अमेरिकेचे एकवेळचे अर्थसचिव मक्नामारा यांच्याशी त्यांनी परिचय करून घेतला. वारंवार भेटत राहिल्यानं परिचयाचं मैत्रित रूपांतर झालं. अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पट्टीच्या मुत्सद्यांशी त्यांनी स्नेहसंबंध जोडले. या स्नेहसंबंधाचा भारताच्या संदर्भात मोठा लाभ झाला.
देशात १९७१ पासून आर्थिक आपत्तीचे सत्र सुरू झालेले होते. दुष्काळ, अवर्षण यामुळे अन्नधान्याची टंचाई, भाववाढ, चलन फुगवटा तुटीची अंदाजपत्रके अशी आर्थिक आघाडी दुर्बल बनली होती. केंद्र आणि राज्य सर्व पातळीवर ओढाताणीची स्थिती निर्माण झाल्याने जनता हवालदिल बनलेली होती. अन्नधान्याची आयात करण्यावाचून गत्यंतर उरले नाही.