नक्षलवाद्यांचे उद्योग आता देशाच्या निरनिराळ्या भागांत पसरले होते. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं होतं. चीनकडून मोठ्या प्रमाणांत मदत दिली जाईल, अशी त्यांना उमेद होती; परंतु तसं घडलं असतं तर, भारतांतल्या क्रांतिकारक गटाला बाहेरच्या देशांतून, चीनमधून मदत केल्यानं, नक्षलवाद्यांचं भारतीय क्रांतिकारकांचं म्हणून जें स्वरूप होतं तें बदलून जाणार होतं. चीननं तो विचार करून क्रांतिकारकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मदत पाठवली नाही.
तरी पण नक्षलवाद्यांनी विविध मार्गांनी गुंडुगिरी, दडपशाही वाढवण्यात कुचराई केली नाही. कलकत्त्यांत त्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांची मदत घेतली. बेकार कामगारांना वेठीस धरलं आणि शहरांतील विवक्षित भाग निवडून अनागोंदी माजवली. १९७० च्या अखेरीपर्यंत पोलिसांनी १७०० नक्षलाइट्सना अटक केली होती; तरी पण चळवळ मात्र अणुमात्रहि कमी झालेली नव्हती. नक्षलवाद्यांनी पोलिसचौक्या, शाळा, रेल्वे-स्टेशनं, महाविद्यालयं यांवर त्या काळांत तुफान हल्ले चढवले. त्याचबरोबर कांहींना व्यक्तिगत ठार केलं. पूर्व-बंगालमधील डाव्या कम्युनिस्टांचे कांही नेतेहि त्यांचे भक्ष्य ठरले. उजव्या कम्युनिस्टांपैकी मात्र कुणी नक्षलाइट्सच्या हल्ल्याला त्या काळांत बळी पडले नव्हते. उजव्या विचारसरणीचे, प्रतिगामी, जनसंघीय किंवा काँग्रेसमधील कोणालाहि त्यांनी स्पर्ष केला नाही. लोकांना त्याचंहि आश्चर्य वाटलं.
काँग्रेसपैकी गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावर नक्षलवाद्यांनी टीकेची झोड उठवली. इतकंच नव्हे तर, त्यांना दमदाट्या करण्यापर्यंत मजल मारली. १९६९ च्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी दिल्लीमध्ये तांबड्या रंगाची पोस्टर्स सर्वत्र चिकटवलीं होती. कनु संन्याल आणि जंगल संथाल यांची ताबडतोब मुक्ती करा आणि हें घडणार नसेल, तर जनरल ओडवायर याचं जे घडलं तें भोगण्यास तयार रहा, असा चव्हाणांना उद्देशून या पोस्टर्सवरील मजकूर तयार केला होता.
नक्षलवाद्यांनी हें आव्हान दिल्यानंतर यशवंतरावांनी त्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी म्हणून लोकसभेंतील विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या आव्हानाला कसं तोंड द्यायचं यासंबंधी त्यांना त्यांच्याशीं सल्लामसलत करायची होती; परंतु आश्चर्य असं की, या बैठकीला हजर रहाण्याचं विरोधी नेत्यांनी टाळलं. त्यांच्यापैकी कोणीहि आले नाहीत. याचा अर्थ, या विरोधी नेत्यांची नक्षलाइट्सच्या कृतीला संमति होती असा नव्हे; परंतु नक्षलाइट्सचं पारिपत्य करण्याचा पवित्रा आपण स्वीकारला, तर कदाचित् आपल्या कार्यकर्त्यामधून त्याची उलटी प्रतिक्रिया उमटेल अशी भीति त्यांना वाटली. त्यामुळे मग यशवंतरावांना एकट्यालाच त्या प्रसंगाशीं सामना करावा लागला.
नक्षलवाद्यांची त्या काळांतली चळवळ म्हणजे क ऐतिहासिक आव्हान होतं. सशस्त्र क्रांति घडवण्याच्या दृष्टीनं भारतांत अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे अशी या क्रांतिकारकांची समजूत होती. आणि या समस्येला तोंड कसं द्यायचं हा सरकारपुढे, विशेषतः गृहमंत्रालयासमोर प्रश्न निर्माण झाला होता. नक्षलवाद्यांनी चळवळीसाठी ग्रामीण क्षेत्र निवडलं होतं. मओनं चीनमध्ये प्रथम अशीच, ग्रामीण भागांत चळवळ सुरू केली होती. माओचं तंत्र आणि त्याचंच तत्त्वज्ञान नक्षलाइट्सनी स्वीकारलेलं होतं.
भारताची सीमा जिथे आंतरराष्ट्रीय सीमेशीं भिडते असंच क्षेत्रं त्यांनी, क्रांतीच्या हालचालीसाठी निवडलं होतं. एका बाजूला नेपाळ, दुस-या बाजूला पाकिस्तान आणि शेजारींच चीनची हद्द, अशी ही मोक्याची जागा होती. चीनमध्ये शस्त्रास्त्रांची आयात चोरट्या मार्गानं करून देशांत क्रांतीची हवा निर्माण करण्याचीं स्वप्नं ते पहात होते. परंतु अशा प्रकारे क्रांति घडवून आणण्याच्या संदर्भात त्यांना त्यांची आवश्यक ती प्रतिमा कधीच निर्माण करतां आली नाही. तरी पण नक्षलवाद्यांची चळवळ आणि त्यांनी निर्माण केलेली समस्या मात्र पुढच्या काळांतहि कायमच राहिली. चळवळीचा जोर कमी करण्यासाठी सरकारनं कडक उपाययोजना केली आणि त्यामुळे चळवलीचा, क्रांतीचा जोम ओसरला हें खरं; परंतु अशा प्रकारच्या चळवळी ज्या परिस्थितींत जन्म घेतात ती परिस्थिति बदलून टाकणं आणि असंतोषाचीं कारणं नाहीशीं करणं हाच त्यावरील खरा उपाय होय, असंच यशवंतरावांचं मत व्यक्त होत राहिलं. काँग्रेसनं पुरोगामी कार्यक्रमांचा अंगीकार केला पाहिजे असं मत त्यासाठीच सांगितलं जाऊं लागलं.