या प्रश्नाची सोडवणूक राजकीय दृष्टीकोनांतून केली पाहिजे असा आग्रह डॉ. चेन्ना रेड्डी आणि कोंडा लक्ष्मण बापूजी यांनी धरला होता. यशवंतराव यांची भूमिका भाषिक राज्य अस्तित्वांत येणं अपरिहार्यच आहे अशी होती. भाषिक राज्यांची निर्मिति ही एक आवश्यक गरज म्हणून त्यांनी मानलं होतं. परंतु हें घडवण्यासाठी भाषिक राज्य-पुनर्रचनेचा आणखी एक डाव देशांत सुरू करूं देण्यास त्यांची तयारी नव्हती. त्या अगोदरच्या भाषिक राज्य-पुनर्रचनेच्या समस्येंतून निर्माण झालेलीं कडू फळं त्यांनी चाखलेलीं होती. त्यामुळे संमति मिळणं अशक्य होतं.
परंतु या संदर्भात त्यांनी आपली भूमिका मात्र स्पष्ट केली की, राज्यांतले जे अविकसित भाग असतात त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांकडे राज्यानं जुजबी स्वरूपाचं लक्ष देऊन चालणार नाही. राज्यापातळीवरील किंवा केंद्रस्थानच्या राज्यकारणाच्या ओढाताणीचा परिणाम जर राज्यांतील अविकसित भागांकडे दुर्लक्ष होण्यांत आणि त्याचा परिणाम त्या राज्यांत असंतोष निर्माण होण्यांत घडणार असेल, तर तें मात्र चालू देतां उपयोगी नाही.
तेलंगणाच्या तंट्याबाबत आणि अन्य आंतरराज्यविषयक प्रश्नांविषयी वाद मिटवण्याच्या मार्गाचा शोध सुरू असतांना त्याच काळांत यशवंतरावांनी लोकसभेंत जी विविध विधेयकं सादर केलीं त्यावरच मग लोकसभेमध्ये वादळी चर्चा होत राहिली. ऑफिसियल लँग्वेज (दुरुस्ती) बिल, अन्-लॉ-फुल् अँक्टिव्हिटीज (दुरुस्ती) बिल, भाषणस्वातंत्र्य आणि उच्चारस्वातंत्र्य यांवर बंधन घालण्यासाठी सरकारला आवश्यक ते अधिकार प्राप्त करून देणारं घटना-दुरुस्तीचं विधेयक आणि अन्य अनेक विधयकं त्यांनी लोकसभेला सादर केलीं.
हीं सर्व विधेयकं आणि दुरुस्त्या यावर स्वाभाविकच विरोधी पक्षाच्या खासदारांनी झोड उठवली आणि शेकडो दुरुस्त्या सुचवल्या. १९६७ हें संपूर्ण वर्ष यशवंतरावांना लोकसभेंत खिळून पडल्यासारकं झालं. दिवसांतला सारा वेळ त्यांना तिथेच थांबावं लागत असे. विधेयकं सादर करणं आणि त्यावरील प्रश्नांना, उपप्रश्नांना उत्तरं देणं हें काम त्यांनाच करावं लागे. विषयक वेगळे, त्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न वेगळे, मात्र उत्तरं देणारे एकच. अशी स्थिति होती. प्रत्येक प्रश्नाचा प्रारंभ गृहमंत्र्यांना पुकारूनच केला जात असे. देशांत कुठे कांही अनिष्ट घडलं असेल, तर आयत्या वेळचे प्रश्न म्हणूनहि प्रश्नांच्या फैरी सुरू होत असत.
असं असलं तरी १९६७ हें संपूर्ण वर्ष, हें गृहमंत्र्यांच्या कर्तृत्वाचं वर्ष ठरलं, या एका वर्षाच्या काळांत यशवंतराव हे दमदार आणि आत्मविश्वाससंपन्न असे नेते आणि तरबेज संसदपटू असल्याचं दर्शन देशाला घडलं. एकामागोमाग एक कर्तृत्वाची शिखरं ओलांडीत त्यांची प्रतिमा उज्ज्वल बनत राहिली.
लोकसभेंत जे वादविवाद होत असत त्या वेळी सत्ताधारी पक्षाच्या आसनावरून यशवंतरावांनाच त्या काळांत त्या वादविवादाशीं सामना करावा लागला. गृहखात्याच्या संदर्भांतील चर्चेच्या वेळीं, ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आत्मविश्वासानं आणि बिनतोड देत असता. यशवंतरावांना वक्तृत्वाची जन्मजात देणगी असली तरी आपल्या वक्तृत्वांत पाश्चात्त्य धर्तीच्या इंग्रजीचा फुलोरा निर्माण करत न रहातां ते ठामपणानं बोलतात, एखादी अवघड आणि गुंतागुंतीच्या त्रासदायक समस्येच्या संदर्भात बोलतांना ते विशिष्ट पद्धतीच्या भाषाशैलीचा वापर करून, विशिष्ट आवाजांत बोलतात आणि बोलतांना वेळेचं भान ठेवतात असंच त्यांच्या यशाचं रहस्य म्हणून वृत्तपत्रांनी जनतेपर्यंत पोंचवलं.