संत फेत्तेसिंग यांनी नंतर राजकारणांतून निवृत्त झाल्याचं आणि धार्मिक प्रचारास वाहून घेतल्याचंहि जाहीर केलं. परंतु त्यांच्या भोवतालच्या कांही महत्त्वाकांक्षी मंडळींनी अकाली दलाच्या स्वार्थासाठी त्यांना पुन्हा राजकारणांत ओढलं आणि त्यांतूनच त्यांनी १७ डिसेंबर १९६६ ला उपोषण सुरू करून २७ डिसेंबरला आत्मार्पण करण्याची धमकी दिली. अकाली दलाचे आणखी सात सदस्यहि त्याच वेळीं आत्मार्पण करणार होते. संत फत्तेसिंग यांच्याबरोबर २४ तास अगोदर ते आत्मार्पण करणार होते.
संत फत्तेसिंग यांची आत्महत्या घडूं नये यासाठी साथी जयप्रकाश नारायण यांनीहि त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व चर्चा आणि वाटाघाठी निष्फळ ठरल्या. तोंपर्यंत डिसेंबरची २६ तारीख उजाडली होती.
सर्व वाटाघाटी निष्फळ ठरल्या होत्या आणि अग्निकुंडांत आत्मार्पण करण्याचा तो क्षण आता जवळ आला होता.
२६ डिसेंबरला दुपारीं ४ वाजतां संत फत्तेसिंग यांच्या सात साथीदारांनी, सुवर्ण-मंदिरांतल्या पाण्याच्या तलावांत स्नान केलं. सुवर्ण-मंदिराच्या आवारांत, अग्निकुंड धगधगलं होतं. स्नानानंतर अखेरची प्रार्थना करायची आणि आत्मार्पण करायचं यासाठी सर्व सिद्धता झाली होती. सारं वातावरण गंभीर बनलं होतं.
परंतु अकस्मात्, दुपारी ३-३० वाजतां लोकसभेचे सभापति सरदार हुकमसिंग हे अकाली दलाच्या कांही नेत्यांसमवेत सुवर्ण-मंदिरांत दाखल झाले आणि त्यांनी संत फत्तेसिंग आणि त्यांचे सहकारी यांच्याशी अंतिम वाटाघाटी सुरू केल्या. दुपारी चारचा ठोका पडायला किंचितसा अवकाश होता. आता काय घडतं याकडे सारेजण, डोळ्यांत प्राण साठवून पहात राहिले होते. अन् तेवढ्यांत चर्चेत काय घडलं कुणास ठाऊक, संत फत्तेसिंग यांच्या सहका-यांनी, आत्मर्पणा आता होणार नाही असं अचानक जाहीर केलं! थोड्या वेळानंतर आणखी एक घोषणा लोकांनी ऐकली की, आत्मार्पणाचा विचार पुढे ढकलला आहे! सारंच अपेक्षित आणि अनपेक्षित घडलं.
अकाली दलाच्या कार्यकारिणीची मग बैठक झाली आणि दुपारीं ५ वाजतां त्यांनी जाहीर केलं की, सरदार हुकमसिंग यांच्याकडून अद्याप कांही गोष्टींचा खुलासा व्हायचाय् तो झाल की, अकाली दलासमोर तो ठेवला जाईल. शेवटी सरदारसाहेबांचं म्हणणं त्यांनी मान्य केलं आणि मागोमाग संत फत्तेसिंग यांनीहि उपोषणाची समाप्ति केली. त्यांच्या सात साथीदारांनी मग आत्मार्पणाची प्रतिज्ञा मागे घेतली.
अमृतसरमध्ये हें जें सर्व घडलं त्यामध्ये अनेक गमती-जमती झाल्या. अमृतसरला निघण्यापूर्वी सरदार हुकमसिंग आणि गृहमंत्री यशवंतराव यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेमध्ये यशवंतराव, या प्रश्नाच्या संदर्भात कोणत्याहि प्रकारे वचनबद्ध झाले नाहीत, परंतु या ना त्या प्रकारे, आत्मार्पणाचा दुःखद प्रसंग टाळा असंच त्यांनी सांगितलं होतं.
अमृतसरला पोंचल्यावर सरदार हुकसिंग आणि संत फत्तेसिगं यांच्यांमधील चर्चेची पहिली फेरी झाल्यानंतर ते सर्किट हाऊसव रवाना झाले आणि तेथे मग, पंजाबचे मुख्य मंत्री गुरुमुखसिंग मुसाफिर यांच्याशीं चर्चा केली. संत फत्तेसिंग यांना कांही मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण हवं होतं.
दिल्लीत चव्हाण यांच्याशीं संपर्क साधून मुख्य मंत्र्यांनी तें स्पष्टीकरण करून घ्यावं असा मग तोडगा निघाला. त्याच संध्याकाळी ग्यानी गुरुमुखसिंग मुसाफिर यांनी यशवंतरावांशी टेलिफोनवरून दिल्लीस संपर्क साधला आणि संत फत्तेसिंग यांच्या उपोषणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या संदर्भात केंद-सरकारनं एक कमिशन नियुक्त करावं असं सुचवलं. यशवंतरावांनी त्यावर, यासंबंधी विचार करणं शक्य आहे, पण त्यासंबंधांत मी आताच कांही ठामपणानं सांगूं शकणार नाही किंवा वचन देऊं शकणार नाही, हेंहि स्पष्ट केलं. कसलाहि आडपडदा न ठेवतां त्यांनी हें सांगितलं होतं.