इतिहासाचे एक पान. २६८

काश्मीरमध्ये जास्तींत जास्त गोंधळाची परिस्थिति निर्माण करून, त्या वेळचं जी. एम्. सादिकचं सरकार उंद्ध्वस्त करण्याचं कार्य या गनिमांवर सोपवण्यांत आलं होतं. परंतु भारत सरकार जागं होतं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यांतच ७५ टक्के गनीम पकडून भारताच्या पोलिसांनी आणि सैनिकांनी गनिमांचा डाव उधळून लावला. काश्मीरच्या जनतेचं सहकार्य मिळवण्यांत आणि त्यांना बंडांत ओढण्याच्या कामांतहि गनिमांना अपयश आलं होतं. कारण एक तर हे गनीम पंजाबी होते आणि काश्मीरच्या जनतेनं गनिमांना साहय्य करावं असा या दोघांमध्ये कांही धार्मिक लागाबांधाहि नव्हता. या भागांतल्या पश्चिम-टोकांतील मुसलमान हे वांशिक व सामाजिकदृष्ट्या पंजाबी मुसलमानांच्या जवळचे. त्यामुळे तें टोक (छांब-अखनूर) सहजगत्या ताब्यांत घेतां येणं पाकिस्तानला शक्य होतं; परंतु गनिमी काव्याच्या लढाईंत यश संपादन करायचं, तर त्यासाठी स्थानिक जनतेचं फार मोठं पाठबळ उपलब्ध व्हावं लागतं; आणि तसं तर तें इथे मुळीच नव्हतं.

ही वस्तुस्थिति असली तरी या गनिमी काव्याच्या आव्हानाची भारत सरकारला गंभीर दखल घेणं क्रमप्राप्तच होतं. यशवंतराव विजगापट्टमहून तातडीनं परतल्यानंतर शास्त्रीजींच्या निवासस्थानींच केंद्रीय मंत्रिमंडळानं, या नव्या परिस्थितीबाबत चार तास खल केला. गनिमांच्या कृतीला प्रतिटोला कसा द्यायचा याचीच या चार तासांत चर्चा झाली. पाकिस्तानकडून ज्या कुरापती काढल्या जात होत्या त्या संदर्भांत पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि लष्कर-प्रमुख यांनी एकत्रित चर्चा करून जुलैमध्येच वस्तुतः कांही निर्णय केले होते. जुलैच्या मध्यावर या संदर्भांतलं धोरणहि निश्चित झालेलं होतं. पाकिस्तानचे गनीम इथे पोंचण्यापूर्वीच हा निर्णय झालेला होता. दिल्लीला त्या काळांत नेतृत्वाचा समसमा संयोग झालेला होता. लालबहादूर शास्त्रींचं उत्तम नेतृत्व देशाला लाभलेलं होतं. महत्त्वाच्या प्रश्नाबाबत ते अचूक निर्णय करत आणि केलेल्या निर्णयाशीं घट्ट चिकटून रहात असत. संरक्षणमंत्र्यांना त्यांचं कमालीचं सहकार्य होतं आणि संरक्षणमंत्र्यांनी – यशवंतरावांनी त्यांना आपल्या सर्व निष्ठा वाहिल्या होत्या.

पाकिस्तानसंबंधांत त्यांच्या चर्चा होत असत. अमुक एका ठिकाणीं आपण कांही कृति केली, तर त्यावर पाकिस्तानची कोणती प्रतिक्रिया होईल, असा शास्त्रींचा प्रश्न असे. या संदर्भांत मग पाकिस्तान कोणतं कोणतं धाडस करूं शकेल याचीहि चर्चा या दोघांमध्ये होत असे. भारतावर चाल करण्यासाठी पाकिस्तानचे कोणकोणते पर्याय असूं शकतील, १९४७ मध्ये हल्ला केला तसा तो काश्मीरवर हल्ला करील, की छांबवर चाल करील, अशा विविध पर्यायांचा विचार या चर्चेच्या वेळीं करून, आपली प्रतिक्रिया कोणती असावी याचं उत्तरहि ठरवून ठेवत असत. या दोघांचं त्या संबंधांतलं उत्तर असं तयार झालेलं होतं की, पाकिस्तानचा हल्ला कोणत्याहि दिशेनं होवो, आपली चाल मात्र पंजाबच्या रोखानंच झाली पाहिजे. या उत्तराच्या अनुषंगानं तशी योजनाहि सिद्ध करून ठेवण्यांत आली होती.

वस्तुतः पाकिस्तानचा कट उधळून लावणं एवढं मर्यादित लष्करी ध्येय डोळ्यांपुढे ठेवून भारताचे सैनिक अहोरात्र पहारा करीत होते. परंतु या एकूण कटामध्ये पाकिस्तानचा खरा अपेक्षाभंग काश्मिरी जनतेनं केला. काश्मीर-खो-यांत गनिमांच्या साहाय्यानं अपेक्षित उठावणी होत नाही असं ध्यानांत आल्यामुळे पाकिस्तानला युद्धाचं वेळापत्रकच अनपेक्षितपणें बदलावं लागलं. उठावणी झाल्यावर त्यांना छांब-अखनूर भागांत मुसंडी मारायची होती. पण अपेक्षित यश हस्तगत करण्यासाठी, पहिला रोख बदलून घूसखोरांना दिलासा देण्यासाठी अखेर छांब भागांत मुसंडी मारणं पाकिस्तानला भाग पडलं.