या दोन देशांतल्या संबंधांत नंतरच्या काळांत सातत्यानं तणाव निर्माण होऊं लागला होता. चीनकडून धोका निर्माण झालेलाच होता आणि पाकिस्तानहि भारतीय हद्दींत घूसखोरी करून मधून मधून कुरापती काढण्यांत गुंतलं होतं. १९६५ च्या मार्चमध्ये आयूबखान यांनी चीनची वारी केली. या दौ-यांत चीनकडून पाकिस्तानला फार जबरदस्त प्रोत्साहन दिलं गेलं. २७ मार्चला रावळपिंडीमध्ये या दोन्ही राष्ट्रांत एक करारहि घडून आला. हा करार म्हणजे भारताला अन्य राष्ट्रांपासून अलग पाडण्यासाठी ज्या युक्त्या योजल्या जात होत्या, त्यांतलाच एक भाग होता. आर्थिक मदतीचा आणि अत्याधुनिक शस्त्रसामग्रीचा पूर अमेरिकेकडून पाकिस्तानकडे वहात राहिला होता. चीननं तर त्याहीपुढे मजल मारून पाकिस्तानशीं राजनैतिक आणि लष्करी संबंधहि प्रस्थापित केले.
पाकिस्तानला समर्थ बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रांत या घटना घडत होत्या. तरी पण भारताला रशियातर्फे मिळणा-या मदतीमुळे पाकिस्तानची चिंता कमी झाली नव्हती; उलट ती वाढली होती. मुत्सद्देगिरीचा डाव म्हणून मग पाकिस्ताननं रशियाशीं मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरू केल्या. भारत-रशिया मैत्री दृढ बनलेली असल्यामुळे, पाकिस्तान हें मैत्रीच्या आमिषानं आपल्या पंखाखाली येत असेल, तर रशियाचा त्याला विरोध असण्याचं कारण नव्हतं. ४ एप्रिल १९६५ ला मग, आयूब खान यांनी भुट्टोला बरोबर घेऊन रशियाचा सहा दिवसांचा दौरा केला. या दौ-यानंतर रशियानं पाकिस्तानला नागरी दळणवळणाच्या सोयीसाठी म्हणून १५ कोटि रुपये मदत देऊं केली. इतकं घडतांच रशियालाहि आपण आपल्या दावणीला बांधल्याचं समाधान पाकिस्तानच्या नेत्यांना लाभलं आणि भारतावर निश्चित विजय मिळवण्याच्या कल्पनेंत ते रममाण झाले.
रशिया-पाकिस्तान मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाल्याबद्दल भारत मात्र सचिंत बनला नव्हता, परंतु अमेरिकेकडून पाकिस्तानला जो प्रचंड शस्त्रसंभार मिळत होता त्याबद्दल आणि पाकिस्तान-चीन अशी गट्टी जमल्याबद्दलची भारताला खरी चिंता होती. अमेरिकेनं पाकिस्तानला पॅटन रणगाड्यांचा फार मोठा पुरवठा केला होता. आणि हे पॅटन रणगाडे पंजाबमधून दिल्लीकडे जाणारा ग्रँड ट्रंक रोड उद्ध्वस्त करण्याला समर्थ होते.
युद्धासाठी कुरापत काढण्यास पाकिस्तान टपून आहे याची कल्पना १९६५ च्या प्रारंभींच्या काळांतच भारत सरकारला आली होती. कच्छच्या रणामध्ये त्या वर्षाच्या जानेवारींतच पाकिस्ताननं भारताच्या हद्दींत मैल-दीड मैल आक्रमण केलं असल्याचं आढळून आलं. त्या वेळीं तिथे कांही चकमकीहि उडाल्या. परंतु पुढचे दोन महिने राजनैतिक पातळीवर दिल्ली-रावळपिंडी दरम्यान थंडें युद्ध सुरू राहिलं. दरम्यान ९ एप्रिलला पाकिस्ताननं काश्मीर-हद्दींत युद्धबंदी-रेषेचा भंग करून पुढे चाल करण्याचा प्रयत्न केला. सीमेचं रक्षण करणा-या भारतीय पोलिस-ठाण्यावर त्यांनी हल्लेहि चढवले. परंतु हा पहिला हल्ला भारताच्या पोलिसांनी परतून लावला. त्यानंतरहि पुढे पाकिस्तानकडून हल्ले सुरू होतांच भारताच्या लष्कराला ठाम पवित्रा घ्यावा लागला, पाकिस्ताननं ताबा केलेलं भारताचं एक ठाणंहि लष्करानं हस्तगत केलं. कच्छच्या रणामध्ये दहा-पंधरा दिवस अशा कुरापती घडत राहिल्या होत्या. परंतु २४ एप्रिलला पाकिस्ताननं फार मोठ्या लष्करी शक्तिनिशी कच्छवर हल्ला चढवला.
तोफखान्याचा भडिमार करून पाकिस्तानच्या लष्करानं भारताची त्या भागांतलीं कांही लष्करी ठाणीं उद्ध्वस्त केलीं. भारताच्या हद्दींत लांबपर्यंत शत्रु-सैन्यानं मुसंडी मारली आणि त्या लढाईंत भारतीय लष्कराला आपलीं कांही ठाणीं सोडून माघार घ्यावी लागली. नव्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मग दिल्लींत चिंतेचं वातावरण पसरलं. कच्छच्या रणामध्ये पाकिस्ताननं अघोषित युद्ध पुकारलं आहे, असंच तेव्हा दिल्लींतून घोषित करण्यांत आलं.