छांब विभागांत तर त्या दिवशीं भारतीय लष्कराचं फार मोठं नुकसान झालं. ही युद्धभूमि भारताच्या सैन्याला अतिशय गैरसोयीची होती. त्या ठिकाणीं मोठ्या प्रमाणांत दारूगोळा ओतूनहि विशेष प्रगति साध्य करतां आली नव्हती. पाकिस्तानची मात्र सतत आगेकूच सुरू होती. प्रत्यक्ष युद्धभूमीवरील कमांडर हरबक्षसिंग यांनी मग दिल्लीला सरसेनापति चौधरी यांच्याशीं दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि पाकीस्तानचं जबरदस्त आक्रमण थोपवायचं, तर हवाईदलानं धडक घेण्याची निकड प्रतिपादन केली.
ही वेळ अशी आणीबाणीची होती की, पाकिस्तानचे पॅटन रणगाडे जम्मूच्या रोखानं आग ओकत निघाले होते. कमांडर हरबक्षसिंग यांचा संदेश मिळाला ती वेळ दुपारीं चारची होती. हवाईदलाला या लढाईंत झेप घ्यायची, तर त्यासंबंधीचा निर्णय करण्यास फार वेळ जाऊं देण्यास अवसर नव्हता. कारण सूर्यास्त होऊन काश्मीरवर अंधाराचं साम्राज्य प्रस्थापित झालं असतं आणि पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांना झपाट्यानं आगेकूच करण्यास चांगलाच अवसर मिळाला असता. परिणामीं जम्मूवर कबजा मिळवणं त्यांना सहज शक्य होतं. हा धोका टाळायचा तर हवाईदलानं आकाशांत झेप घेण्यासंबंधीचा निर्णय कांही मिनिटांतच करावा लागणार होता.
कमांडर हरबक्षसिंग यांचा संदेश आला तेव्हा हवाईदलाचे प्रमुख तिथेच होते. सरसेनापति चौधरी यांनी तातडी करून मग या दोघांनी चर्चा केली आणि ते संरक्षणमंत्र्यांची आज्ञा घेण्यासाठी त्यांच्यासमोर दाखल झाले.
यशवंतरावांनी छांब विभागांतील गंभीर परिस्थिति समजावून घेतली. पाकिस्ताननं मोठ्या धूर्तपणें कट तयार केला होता. काश्मीरचा प्रश्न शस्त्रबळावर सोडवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू झालेला होता. जम्मू आणि काश्मीरचा लचका तोडण्यासाठी तो टपून होता. गनिमांना अगोदर पुढे पाठवून ‘मावो’च्या युद्धनीतीचा अवलंब पाकिस्ताननं केला होता, परंतु मावोचं शहाणपण मात्र त्यांच्याजवळ नव्हतं. शत्रूला दूरगामी धोरणांत सतत आव्हान द्यावं, पण डावपेंचांत मात्र त्याचा आदर करत रहावं, हें मावोतंत्र – मावो-युद्धनीति पाकिस्ताननं कधीच आत्मसात केली नाही.
छांबमधील पाकिस्तानी मुसंडीचा शक्यतों त्याच भागांत प्रतिकार करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यानं केला, परंतु पाकिस्तान एवढ्या प्रचंड तयारीनिशी आलं होतं की, त्या ठिकाणीं त्याचा बीमोड करण्यासाठी तितकाच कणखर निर्णय करण्याची आवश्यकता होती. सरसेनापति आणि हवाईदलाचे प्रमुख यांनी हेंच संरक्षणमंत्र्यांच्या नजरेस आणलं. पॅटन रणगाड्यांची दौड थोपवायची तर भारताला आता हवाईदलाचा निर्णय करावा लागणार होता. सरसेनापतींना त्यासाठी संरक्षणमंत्र्यांची अनुमति हवी होती.
हवाई चढाई करणं याचा अर्थ भारतानं आंतरराष्ट्रीय युद्धांत झेप घेणं असा होता. आंतरराष्ट्रीयदृष्ट्याहि त्यामुळे या निर्णयाला महत्त्व होतं. यशवंतरावांना त्यासाठी अर्थातच पंतप्रधानांशीं चर्चा करूनच हा ऐतिहासिक महत्त्वाचा निर्णय करावा लागणार होता. परंतु वेळ अशी येऊन ठेपली की, उलटसुलट चर्चा आणि वाटाघाटी यासाठी अवसरच उरला नव्हता. पॅटन रणगाडे तिकडे पुढे सरकत होते आणि सूर्य अस्तास चालला होता. सायंकाळचा अंधार पडण्यापूर्वी जें कांही करायचं तें करावं लागणार होतं. कारण ती अचूक वेळ हुकली असती, तर काश्मीरवर बाका प्रसंग गुदरून तें भारतापासून तोडलं जाण्याची शक्यता दृष्टीच्या टप्प्यांत होती.