इतिहासाचे एक पान. २४७

या नगरींत पुढे असुरांचा कुशल शिल्पकार मयासुर यानं कैलासाच्या उत्तरभागांतून, मैनाकपर्वतानजीकच्या बिंदुसरोवराजवळून अतिशय किमती सामग्री आणून भव्य राजवाडा बांधला. या राजवाड्याच्या भिंती, खांब, तट, कमानी या सर्व रत्नांनी मढवल्या होत्या. मयासुरानं अनेक रत्नांनी मढवलेलं कृत्रिम सरोवर तिथे तयार केलं. पांडवांनी या राजवाड्याला ‘मयसभा’ असंच नांव देऊन मयासुराच्या कलेचं चीज केलं. या इंद्रप्रस्थांत राजसूय व अश्र्वमेध यज्ञ झाले. महाभारतांतील त्याच्या वर्णनावरून भरतखंडांतील त्या काळच्या वैभवाचा व संपत्तीचा सहज अंदाज करता येतो; आणि हिंदुस्थानला सुवर्णभूमि नांवानं संबोधलं जातं ते कसं अन्वर्थक होतं हेहि लक्षांत येतं. दिल्लीचा हा इतिहास पहातांना दिल्ली आणि महाराष्ट्राचा सह्याद्रि यांची तुलना सहजगत्या मनांत येते. सह्याद्रि हा नेहमीच जय आणि पराजयाच्या भावनेपासून मुक्त राहिला. सह्याद्रीला ज्यांनी जिंकलं तो चाल करून येणारा शत्रु कितीहि मोठा असो, तो इथे कधी समर्थ बनला नाही. सह्याद्रीनं अनेकांना मित्र म्हणूनच स्वीकारलं.

दिल्ली ही मात्र मायानगरी आहे असं म्हणतात. दिल्लीच्या मनांतले भाव ओळखणे कठीणच. ही नगरी स्वतःबद्दल एखाद्याच्या मनांत उत्कंठा निर्माण करूनहि अत्यल्प कृपा करते, पण त्याला दुःखी बनवत नाही. दोन्ही हात जोडून सेवा करणाराला मात्र ही नगरी म्हणे असूयेनं कधी कधी जेरबंद करते. अनेक उन्मत्त, अनाचारी राजांना हिनं सिंहासनावरून खाली फेकलं आहे. त्याचप्रमाणे दुर्भागी, अश्रुपूर्ण शोकावस्था प्राप्त झालेली असतांनाहि आपल्या सौभाग्याच्या तेजानं ते दिवस तिनं दूर केले आहेत. या नगरीनं तटस्थपणानं परस्पर-विरोधी अनुभवांचं दर्शन अनेकदा घडवलं आहे. गंगा व शरयू यांची ही पवित्र भूमि खरी, परंतु ऐतिहासिक काळांत स्वातंत्र्यरक्षणास ती अनेकदा असमर्थ ठरली. सह्याद्रीचं तंत्र वेगळं. कृष्णेच्या तटानं स्वातंत्र्याला नेहमी अभयच दिलं. गुलामी तोडून फेकून दिली.

हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रि धांवेल असा, महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी यशवंतरावांनी ‘शब्द’ दिला होता. ती वेळ आता आली. पं. नेहरूंचीच हाक आली होती. महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशीच ही घटना, परंतु त्याच वेळी सह्याद्रीवर यशवंतरावांचा मुक्काम आणखी कांही काळ घडावा असंहि महाराष्ट्राला वाटणं स्वाभाविक होतं. महाराष्ट्राला त्याची नितान्त गरज होती.

यशवंतरावांनी संरक्षणमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्याची घटना ही मोठी नाट्यपूर्ण घटना आहे. १९६२ च्या नोव्हेंबरमध्ये अनपेक्षितरीत्या ते या नव्या आसनावर आरूढ झाले. भारत-चीन दरम्यानच्या सीमा-वादांतून चीननं भारतावर लष्करी आक्रमण केलं, त्यांत भारताला अपमानास्पद पराभव पत्करावा लागला आणि त्यांतून निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या परिस्थितींतच चव्हाण हे दिल्लीला पोचले.

भारत-चीन दरम्यानचा सीमा-वाद हा एक प्रदीर्घ इतिहास आहे. या वादाची मुळं खोलवरची आहेत. भारतांत ब्रिटिश सत्ता होती त्या काळांतच भारत आणि चीन यांच्यांतली सीमा-रेषा निश्र्चित करण्यांत ब्रिटिशांना अपयश आलेलं होतं; तेव्हापासूनचा हा वाद आहे. या उभय देशांतल्या सीमेसंबंधांत निरनिराळ्या कालखंडात घडलेल्या घटनांची एक लांबलचक साखळीच तयार झालेली असून १९६२ च्या हिवाळ्यांत चीननं भारतावर केलेलं आक्रमण म्हणजे या साखळीचाच एक दुवा आहे. त्या अगोदर चीननं १९५९ च्या ऑगस्टमध्ये नेफा-हद्दींत लाँग्जू या ठिकाणी पहिल्यांदा कुरापत काढली होती. लडाखमध्ये १९५८ मध्ये चीननं आक्रमण करतांच भारत सरकारनं चीनकडे निषेध-खलिता पाठवला आणि तेव्हापासून दिल्ली-पेकिंग दरम्यान खलिते येत-जात राहिले होते. तरी पण या दोन्ही देशांच्या सरहद्दीवर दोन्ही देशांच्या सैनिकांचे पहारेकरी गस्त घालूं लागले होते. १९६० मध्ये तर भारताच्या सैन्यानं कांहीशी आगेकूच करून कांही ठिकाणी लष्करी तळ उभारण्यापर्यंत मजल मारली होती.