इतिहासाचे एक पान. २४५

प्रकरण - २१
------------

६ नोव्हेंबर १९६२ !
मुख्यमंत्री यशवंतराव मुंबईमध्ये सचिवालयांत आपली नित्याची कामं पहाण्यांत दंग होते. दुपारची वेळ. फोन घणघणच होते. मुख्य मंत्र्यांच्या कार्यालयांतल्या फोनला एक मिनिटाचीहि उसंत नसते. अनेकांची अनेक कामं, अनेक समस्या ! आणि प्रत्येकालाच मुख्य मंत्र्यांशी संपर्क साधण्याची निकड कार्यालयीन धांदल नित्य सुरूच रहाते. महत्वाच्या कामाचे फोन मुख्य मंत्र्यांपर्यंत पोचवायचे, दुय्यम महत्वाच्या फोनचं निराकरण सचिव-पातळीवर व्हायचं हेहि ठरलेलं असे.

एक फोन घणघणला. हा फोन अनपेक्षित होता. नाटकाची नांदी सुरू होण्याची ती जणू घंटाच होती. फोन आला होता दिल्लीहून – पंतप्रधान पंडित नेहरूंचा !

पं. नेहरू फोनवर बोलण्यासाठी थांबले होते. मुख्य मंत्र्यांचे खाजगी सचिव-बहुधा श्रीपाद डोंगरे असावेत – लगबगीनं यशवंतरावांच्या कार्यालयीन खोलींत गेले आणि त्यांनी निरोप सांगितला - “पंतप्रधान तुमच्याशी बोलण्याकरिता थांबले आहेत- फोन आहे.” सारंच अनपेक्षित ! फोनवरूनच मग बोलणं सुरू झालं.

“खोलांत अन्य कुणी आहेॽ” – नेहरू.

“होय. चर्चेसाठी कांहीजण आले आहेत.”-चव्हाण.

“जे कोणी असतील त्यांना थोडा वेळ बाहेर थांबण्यास सुचवतां येईल काॽ मला तुमच्याशी कांही खाजगी बोलायचं आहे !”- नेहरू.
यशवंतरावांना आपली खोली निवान्त करावी लागली. खोलीमध्ये आता ते एकटेच होते.

“हां, कशासंबंधी बोलायचं म्हणालांतॽ” – चव्हाण.

“तुम्हांला कांही महत्वाचं सांगायचं आहे; आणि त्याबद्दल मला ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढंच उत्तर पाहिजे. हे पहा, तुम्हांला दिल्लीस ‘संरक्षणमंत्री’ म्हणून यावं लागणार आहे. त्याबद्दल मला तुमचं मत ताबडतोब हवं आहे. मात्र एक लक्षांत असूं द्या, हे सर्व अद्याप निश्र्चित निर्णयाप्रत पोचायचं आहे. याची कुणाजवळ वाच्यता होतां उपयोगी नाही. मला सांगा, दिल्लीस यायची इच्छा आहेॽ”-नेहरू.

“मी या संबंधांत कांही विचार केलेला नाही. पण मला तुमची दुसरी अट मान्य करणं थोडं कठीण दिसतं. मुंबई सोडून दिल्लीला यायचं तर निदान एका व्यक्तीशी तरी मला ते बोलावं लागेल.” – चव्हाण.

“कोण एवढी महत्वाची ती व्यक्ति आहेॽ” –नेहरू.

“माझ्या पत्नीला मला हे सांगावं लागेल ” – चव्हाण.

फोनच्या दुस-या टोकाहून मग पं. नेहरूंच्या हसण्याचा आवाज आला.

“आलं, आलं लक्षांत, तुम्हाला तुमच्या पत्नीला हे सांगावं लागेल म्हणतां.........पण लक्षांत असूं द्या, हे अगदी खासगी, गुप्त आहे हं !” – नेहरू.

“जेव्हा आणि जिथे कुठे माझी आपणांस गरज पडेल तिथे आणि त्या वेळी मी निश्र्चित येईन; परंतु माझी तिथे येण्याची गरज आहे का, हे एकदा तुम्हीच कृपा करून मनाशी पक्कं केलेलं बरं.” –चव्हाण.

“मला, तुम्ही इथे यायला हवे आहांत. थोड्या दिवसांतच नक्की काय ते सांगेन.”- नेहरू.