या सर्व परिस्थितीमुळे पं. नेहरू हे कमालीचे निराश बनले. कृष्णमेनन आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी मात्र अजून उमेद बाळगून होते. असं असलं तरी, चिनी लष्कराकडून भारताचा मोठ्या प्रमाणांत पाडाव होऊ लागताच कृष्णमेनन यांच्यावर टीका सुरू झाली. मेनन हे पं. नेहरूंची दिशाभूल करत आहेत अशी काँग्रेस-पक्षाच्या खासदारांचीच टीका होती. २३ ऑक्टोबरला त्यांनी या टीकेला तोंड फोडलं. परंतु पं. नेहरू हे या टीकेशी सहमत नव्हते. भारत-चीन सीमेवर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला कृष्णमेनन हे एकटेच जबाबदार नाहीत असं पंडितजींचं मत होतं. झाल्या-गेल्या गोष्टीची चिकित्सा करण्याची ही वेळहि नव्हे, असं त्यांचं सांगणं होतं. परंतु मेनन यांच्याविरुध्द देशांत सर्वत्रच टीकेचं काहूर उठल्यामुळे तेहि अस्वस्थ बनले आणि संतापानं त्यांनी संरक्षण-मंत्रिपदाचा राजीनामा ३० ऑक्टोबरला पं. नेहरूंकडे सुपूर्त केला. प्राप्त परिस्थितींत मग पं. नेहरूंनी दुस-या दिवशी संरक्षणखातं स्वतःच्याच ताब्यांत घेतलं. मेनन यांचा राजीनामा मात्र त्यांनी मंजूर केला नव्हता.
संरक्षणखातं आणि कृष्णमेनन याबाबत त्या काळांत मोठाच पेच निर्माण झाल्यामुळे त्याचा विचार करण्यासाठी ‘नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल’ या धोरणात्मक निर्णय ठरवणा-या देशांतल्या सर्वश्रेष्ठ यंत्रणेची दिल्लीला ४ व ५ नोव्हेंबरला बैठक आयोजित करण्यांत आली. देशांतल्या सर्व राज्यांच्या मुख्य मंत्र्यांना या बैठकीसाठी पाचारण करण्यांत आलं होतं. ४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी पं. नेहरूंनी कांही राज्यांच्या मुख्य मंत्र्यांना भारत-चीन सीमावादाची आणि त्यांतून निर्माण झालेल्या परिस्थितीची चर्चा करण्यासाठी खास पाचारण केलं. या बैठकीला के. कामराज, संजीव रेड्डी, प्रतापसिंग कैराँ, बिजू पटनाईक आणि यशवंतराव चव्हाण हे उपस्थित होते. पंतप्रधानाच्या दिल्लीतल्या ‘साऊथ ब्लाँक’ मधील कार्यालयांत, त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत ही चर्चा झाली.
संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांच्या बाबतींत देशांत जे मत व्यक्त होत राहिलं होतं त्याबाबत या बैठकींत बरीच चर्चा झाली. मेनन यांना मंत्रिमंडळांतून दूर करण्यांत यावं असं नव्हे, परंतु पक्षांतल्या लोकांकडून आणि देशांतल्या जनतेकडून जे मत व्यक्त केलं जात आहे त्याकडे पंतप्रधानांना दुर्लक्ष करतां येणार नाही, असंच या मुख्य मंत्र्यांनी पंडितजींना ऐकवलं.
मुख्य मंत्र्यांकडून हे ऐकतांच पंडितजी कांहीसे विचारमग्न बनले. निर्णय करणं त्यांना अवघड ठरलं. मेनन यांचे निर्णय चुकलेले नाहीत असं प्रथमपक्षी त्यांनी मुख्य मंत्र्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांना पुढे असंहि ऐकवलं की, “पहा, एकदा आपण, लोक म्हणतात ते बरोबर आहे असं मानलं आणि त्यांच्या मागणीला शरण गेलो, तर न जाणो, उद्या ते माझ्या राजीनाम्याचीहि मागणी करतील! मला त्याची पर्वा नाही म्हणा, परंतु या पध्दतीनं आपण कुठवर पोचणार आहोतॽ”
बैठकीत बरीच उलटसुलट चर्चा झाली आणि अखेरीस, पंतप्रधानांनी कोणताहि निर्णय केला, तरी मुख्य मंत्री हे त्यांच्याबरोबरच रहातील, एवढाच त्या बैठकीचा निष्कर्ष ठरला. मात्र काँग्रेस-पक्षामध्ये अधिक प्रक्षोभ होणार नाही याची काळजी घेतली जावी असं पं. नेहरूंना सुचवण्यास मुख्य मंत्री विसरले नाहीत.
यशवंतराव आणि कृष्णमेनन यांची दाट मैत्री होती. मेनन यांना मंत्रिमंडळांतून दूर करण्यांत यावं यासाठी त्यांच्या मनाची तयारी नव्हती. मेनन यांच्याबद्दलच्या चव्हाणांच्या मनांतील आदराच्या भावना पंडितजी जाणून होते. मेनन हे मुंबई लोकसभा मतदार-संघांतून निवडणूक लढवत असतांना, पंडितजींना त्यांच्या विजयाबद्दल काळजी होती; परंतु यशवंतरावांनीच त्या वेळी मेनन यांना विजयी करण्याबद्दलची खात्री पंडितजींना दिली होती.