स्वतंत्र विदर्भाचा प्रश्र्न पुन्हा निर्माण करून कांही नागपूरकर मंडळी दंगली माजवत होते. खोटेनाटे आरोप, असभ्य टीका करत होते. यशवंतरावांना मराठ्यांचं राज्य निर्माण करायचं आहे अशा कंड्या उठवण्यांत समाधान मानत होते. यशवंतरावांनी या संदर्भात एकदा या मंडळींना खुद्द नागपूरच्या भूमीवर उभं राहून चांगलंच खडसावलं.
नागपूरच्या मंडळींनी घाट घालून यशवंतरावांचा सत्तेचाळिसावा वाढदिवस १२ मार्च १९६१ ला नागपुरांत साजरा केला. सांगलीला त्यापूर्वी वसंतरावदादा पाटील यांनी मोठ्या प्रमाणांत वाढदिवस साजरा केला होता; परंतु तेव्हापासून वाढदिवसाच्या जाहीर समारंभापासून अलिप्त रहाण्याचा निर्णय त्यांनी केला होता. वैयक्तिक सत्कारांत मी फसूं इच्छित नाही असं त्यांनी सांगितलं होतं; परंतु नागपूरकर मित्रांच्या प्रेमामध्ये ते फसले आणि नागपूरला गेले. तो सत्कार स्वीकारतांना प्रेमामुळे फसून चूक करत असल्याचं त्यांनी जागरूकपणानं जाहीररीत्या सांगितलं.
नागपूरच्या या सत्काराच्या भाषणांत त्यांनी आपलं मन मोकळं केलं. स्वतःच्या जीवनाकडे ति-हाईत दृष्टीनं पहाण्याचा प्रयत्न करून जीवनाच्या निरनिराळ्या कालखंडात जे घडलं, ज्या प्रेरणा मिळाल्या, ज्यांच्यापासून मिळाल्या आणि त्यांतून काय शिक्षण मिळालं ते सर्व या भाषणांत त्यांनी सांगितलं. नागपूरमध्ये त्या दिवशी थोडी गडबड झाली होती. त्या गडबडीचाहि उल्लेख केला आणि छोट्या छोट्या घोषणांनी छोट्या छोट्या आग्रहाला बळी पडून, मोठी माणसं चुकीच्या मार्गानं जातात की काय, याविषयी चिंताहि व्यक्त केली.
कुणाच्या तरी कानांत कांही तरी कुजबूज करून दूषित वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांत कांही मंडळी गुंतलेली असत. या सर्वांना यशवंतरावांनी आव्हान दिलं की, ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यानं मैदानात येऊन बोलावं.
स्वतः मैदानांत उभं राहूनच त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जिम्मेदारी मी घेतली आहे ती महाराष्ट्र राज्य फोडण्याकरिता नसून ते चालवण्यासाठी घेतलेली आहे. गंगेच्या ओघासारखं मराठी जीवन आता जे एक झालेलं आहे ते कुणाच्या मेहरबानीनं, कुणा चार व्यापा-यांच्या कृतीनं किंवा कुणाची तरी लहर आली म्हणून चाललेलं, असं हे जीवन नाही. नवीन सामर्थ्य निर्माण करण्याकरिता ते प्रयत्नशील आहे. गंगेचा हा ओघ पुढेपुढे जाईल. हे जीवन बंद करण्याची शक्ति अशा अपवित्र गोष्टींनी निर्माण होऊ शकणार नाही. छोट्या गटबाजीला घाबरून किंवा निवडणुकींत काय घडणार आहे हे पाहून काम करणारा माणूस मी नव्हे. मार्ग स्पष्ट आहे. राज्य यशस्वी करायचं आहे. मराठ्यांचं राज्य निर्माण करायचं आहे अशी कुजबूज जे करत आहेत त्यांना नागपूरच्या भूमीवरूनच सांगतो की, ज्या दिवशी एका जमातीचं, निवळ एका गटाचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असं सिध्द होईल, त्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्वतःची जाहीर चौकशी करून जनता देईल ती शिक्षा पत्करीन, हे व्रत घेऊनच या राज्याची जिम्मेदारी मी पत्करली आहे.”
आत्मविश्र्वासानं यशवंतराव हे सर्व सांगत राहिले. प्रत्यक्ष आचरत राहिले. दिवस पुढे सरकत होते. हां हां म्हणता राज्यानं पहिलं वर्ष मागे टाकलं. राज्याच्या जीवनांत एक वर्षाचा काळ हा मोठा म्हणतां येणार नसला, तरी या एका वर्षाच्या काळात, राज्यानं सुरुवातीला दिलेली आश्र्वासनं, अभिवचनं यांची पूर्तता करण्याच्या दिशेनं जे कसोशीनं प्रयत्न केले आणि वैचारिक क्रांति घडवून आणली त्याचं मोजमाप काळाच्या फूटपट्टीनं करण्यापलीकडचं होतं.