इतिहासाचे एक पान. २३२

आडवे येणारे बांध ओलांडून यशवंतरावांना पलीकडे जाणं आवश्यकच होतं. थांबण्यास आणि स्वतःला व महाराष्ट्राला संपवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा खचितच स्वीकारलेली नव्हती. त्यांची अडथळ्याच्या शर्यतींतील धांव सुरूच राहिली. महाराष्ट्राला शेतीसंपन्न करण्यासाठी धरणाच्या योजना तर त्यांनी पुढे रेटल्याच, शिवाय शेतीच्या धंद्याला उद्योगाची जोड मिळावी यासाठी कृषि-उद्योग निर्माण करण्याची योजना तयार केली. खेडं आणि शहर, खेडं आणि नगर यांमधील कृत्रिम अंतर दूर करणं हा या योजनेचा हेतु असल्याचं ते सांगूं लागले.

कृषि-उद्योग या शब्दाचा अर्थ काळाच्या ओघाबरोबर बदलत जाणारा असला, तरी त्याचा मूळ गाभा हा कायमच रहाणार आहे. महाराष्ट्राच्या खेड्यांतील सारा समाज शेतीच्या मूलभूत उद्योगावर जगणार असल्यानं यांतूनच भूमिहीनांच्या प्रश्र्नांसारख्या अनेक सामाजिक कटकटी आणि तणाव निर्माण होत रहातात. त्या काळांत तर हे तणाव वाढले होते. हा तणाव कमी करायचा तर शेती न करणारा खेड्यांतला जो वर्ग, त्याला शहरामध्ये नेणं आणि काम उपलब्ध करून देणं हाच उपाय ठरतो. नागरीकरण हे यांतूनच वाढत रहातं.

यशवंतरावांची मात्र यासाठी वेगळी योजना होती. ती अशी की, खेड्यामध्ये निवळ शेतीवर आधारलेला जो समाज आहे त्याच्यासाठी कृषि-उद्योग काढण्याचा प्रयत्न झाला तर खेडं हे खेडं रहाणार नाही. परंतु शेतीमधून निर्माण होणा-या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर औद्योगिक प्रक्रिया करणं म्हणजे कृषि-उद्योग समाज नव्हे.

उत्पादनाचं नवीन तंत्र आणि नवीन विज्ञान निर्माण करणारी साधनं शेतक-यापर्यंत पोचणं याला त्याच्या या योजनेत महत्वाचं स्थान होतं.

शेती हा उद्योग असल्यानं त्यांत या साधनांचा उपयोग तर झालाच पाहिजे, शिवाय त्यांच्या मदतीनं दुसरे धंदे काढता आले पाहिजेत, मागोमाग खेड्यांत वीज गेली पाहिजे अशी त्यांची कृषि-उद्योगप्रधान अर्थरचनेमागची विचारसरणी होती. आर्थिक विकासाचं सूत्र या सर्व विषयांत गोवलं गेलेलं असल्यानं या सर्वच प्रश्र्नांचा साकल्यानं विचार करून मार्ग काढण्यासाठी सर्व जनतेला आणि विशेषतः पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी त्यासाठी आवाहन केलं.

महाराष्ट्रांतील जनतेला अंतर्मुख बनवण्यासाठी नागपूरपासून सावंतवाडीपर्यंत महाराष्ट्राच्या सर्व भागांत यशवंतरावांचा संचार सुरू असतांना त्यांचा ‘झिंदाबाद’ होत होता, तसंच त्यांना ‘मुर्दाबाद’हि ऐकावं लागत होतं. सर्वांच्याच मनांतली कोळिष्टकं अजून साफ झालेली नव्हती. यशवंतराव हे सर्व पोटांत साठवत राहिले. मोठमोठे किमती पुष्पहार ज्यांनी घातले त्यांच्याहि ते आधीन झाले नाहीत आणि कुणी मुर्दाबाद म्हणत आहेत म्हणून अस्वस्थ बनले नाहीत. मुर्दाबाद म्हणण्यासाठी का होईना, कांही लोक आपली निवड करत आहेत आणि आठवणीनं मुर्दाबाद म्हणत आहेत याबद्दलहि त्यांच्या मनांत एक प्रकारचं समाधान असावं.

मुख्यमंत्रिपदाची, नेतृत्वाची वाट आजवर रखरखत्या निखा-यावरूनच ते चालत आलेले होते. ज्यांनी पूर्वी मुर्दाबाद ऐकवलं त्यांनीच त्यांना हा विजय मिळवून दिला होता; धिमे राहून त्यांनी मिळवला होता. मराठी भाषेचं राज्य यशस्वी करण्यासाठी, मराठी माणसाच्या मनांत जे ज्ञानेश्र्वर, रामदास, तुकाराम आहेत, मनांत मराठी माउली आहे, शिवाजी, लोकमान्य, म. गांधी यांनी दिलेल्या प्रेरणा आहेत त्या सर्वांना जागे करण्यासाठी स्वतःचं रक्त आटवत होते.