मराठी वक्तृत्वाचे शिवाजी – यशवंतराव
मराठी भाषेचे शिवाजी म्हणून चिपळूणकर स्वत:लाच 'I am the Shivaji of Marathi Language' असे म्हणत असत., पण त्यांची वाक्ये प्रदीर्घ व लांबलचक असत. वक्तृत्वातला गनिमी कावा हा कदाचित चिपळूणकरांना उमगला नसावा. त्यामुळे त्यांची पल्लेदार भाषा सामान्याप्रत पोहोचत नसे. पण छत्रपती शिवरायांची अस्मिता मराठीतून जर कोणी अवगत करून लोकशाहीतील सामान्यातील सामान्याला प्रबोधित केले असेल तर ते यशवंतरावांनीच! महाराष्ट्रातील मराठीची खरी अस्मिता यशवंतरावांनी प्राणपणाने जागवली आणि आपल्या खुमासदार शैलीने त्यांनी श्रोतृसमुदायाला हलवले-डोलवले-मंत्रमुग्ध केले. अशी त्यांची वक्तृत्वाची मोहिनी होती.
यशवंतरावांच्या राजकीय कर्तृत्वाचा, यशस्वी तत्त्वगुणांचा, प्रशासकीय कौशल्याचा, अभ्यासपूर्ण विचारांचा आणि अविचल निष्ठांचा जसा भाग होता तसाच त्यांच्या संयमी, संस्कारित प्रसंगोचित आणि लालित्यपूर्ण आविष्कार-निपुणतेचाही फार मोठा भाग होता. लोकांना आकर्षित करील अशी वक्तृत्वशैली पण त्याचबरोबर त्यांच्या भाषणातील आशयात अभिजात, साहित्यिक, रसिक आणि लाघवीदृष्टी विलोभनीय असे.
यशवंतरावांनी विविध ठिकाणी व विविध प्रसंगी केलेल्या भाषणातील काही उतारे खाली देत आहे. त्यावरून त्यांच्या वक्तृत्वशैलीचा अभिजात गुण दिसून येईल.
प्रसिद्ध नाटककार श्री. विद्याधर गोखले यांच्या षष्ट्यब्दी समारंभाचे अध्यक्ष म्हणून यशवंतरावजी होते. त्यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या साहित्यिक रसिकतेचा एक वेगळा पैलू नकळत प्रकाशात आणला. ते म्हणतात, ''रविवारच्या लोकसत्तेतील गोखल्यांच्या उर्दू शायरीने आणि संस्कृत सुभाषितांनी नटलेल्या रसिल्या अग्रलेखांचे आपण अनेक वर्षांचे वाचक आहोत, त्या अग्रलेखांनी आपल्याला उर्दू व संस्कृत भाषेची गोडी लावली.'' असा गौप्यस्फोट यशवंतरावांनी केला.
१९६२ चे अ. भा. मराठी साहित्य संमेलन सातारा येथे झाले. ते चिनी आक्रमणाच्या सावटाखाली भरले. संमेलन चालू असतानाच चिनी आक्रमण सुरू झाले होते. त्याप्रसंगी उदघाटनाच्या भाषणात ते म्हणतात, ''देशात आणीबाणीची स्थिती असतानाही ज्या बाबतीत काटकसर करू नये त्यापैकी साहित्य संमेलन ही एक बाब आहे'' असा विचार त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी आणीबाणी परकीय आक्रमणामुळे होती., पण १९७५ साली अंतर्गत आणीबाणी होती आणि कर्हाड येथील मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष यशवंतरावजी इंदिराबाईंच्या केंद्रीय मंत्रिमंडळात होते. त्यामुळे राजकारणी आणि साहित्यिक माणसातली नाती दुरावली होती. मनं दुरावली होती. कर्हाडला हे संमेलन भरत असल्याने अनिवार्यपणे यशवंतरावांना स्वागताध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आलं. सरकारी माणसाला स्वागताध्यक्षपद स्वीकारण्याची ती वेळ नव्हती, धिक्कारण्याची होती. म्हणून काही मंडळींनी त्यांच्या निवडीला विरोधही केला. त्यावेळी यशवंतरावांनी अत्यंत समर्पक शब्दात सर्वांना आवाहन करून आपले शहाणपण आणि कार्यकुशल व्यवहारीपण यांची आपल्या भाषणातून सर्वांना जाणीव करून दिली.
त्यावेळी दुर्गाबाई भागवतासारख्या कट्टर स्वातंत्र्यवाद्यांना सौम्य स्वरात “मुक्त विचाराचा सिद्धांत हा एक आकर्षक विचार आहे आणि मूलत:समर्थनीय आहे., पण आजच्या सामाजिक आर्थिक क्षेत्रात उभे असलेले इतर राष्ट्रीय प्रश्न यांचा संदर्भ विसरून हा सिद्धांत होऊ शकेल काय, याचेहि चिंतन होण्याची गरज आहे.” हे निखळ साहित्याच्या प्रेमापोटी त्यांनी सुनावले. आणि साहित्यातल्या नव्या प्रवाहाची सृजनता शिफारस काळाचे भान ठेवून साहित्य वाचणारा रसिक, ही भूमिका स्पष्ट करणारे अनेक संदर्भ त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कर्हाडच्या साहित्य संमेलनात साहित्यिकांनी जयप्रकाशजींना आराम वाटावा म्हणून सामुदायिक प्रार्थना पुढे आणली आणि विनम्रपणे उभे राहण्याऐवजी वाघ मारल्याच्या थाटात उभे राहिले ! ज्यांना आणिबाणिपूर्वी जयप्रकाश कधीहि आठवले नाहीत, जे राजकीय आंदोलन सुरू असताना लैंगिक आंदोलनात तरंगत होते अशा या साहित्यिकांना प्रार्थनेत सामील झालेले यशवंतराव म्हणाले की, “आम्ही जयप्रकाशजींसाठी रोज प्रार्थना करतो !” पोटभर खाऊनपिऊन एक दिवसापुरता स्वत:ला रंग फासणार्यांचा असा मुखभंग कुणी केला नसेल.! गरिबी म्हणजे काय ते सांगताना एका सभेत यशवंतराव म्हणाले की, “तिन्ही सांजेच्यावेळी मुळे अन्नासाठी कासावीस झाली आणि घरात कणही नसला म्हणजे आईच्या पोटात जी कळ येते ती गरिबी ! भुकेची कळ ज्यांना माहित नाही त्यांना गरिबी कळणार नाही !” साहित्याकांचे संमेलन, पत्रकारांची परिषद, बेंद्रे लिखित इतिहास खंडाचे प्रकाशन, कलावंतांचा कार्यक्रम किंवा नाट्य प्रयोगातील मध्यंतराचा समारंभ असो, यशवंतरावांनी मार्मिक भाषण करून त्या त्या क्षेत्रातील दर्दी जाणकारांची दाद घेतली आहे. पक्ष कार्यकर्त्यांचे शिबीर असो किंवा निवडणूक प्रचारातील फड मारण्याची सभा असो, यशवंतराव नेहमी यशवंतच झाले आहेत. त्यांना खोचक बोलता येते नि रोचकही बोलता येते ! दम देता येतो नि दम खाताही येतो ! टोला हाणताही येतो नि चिमटाही काढता येतो ! टांग मारून उलथे पाडता येते अन् पाठीवर थापही देता येते ! या विविध भूमिका ते उक्तृष्ट बजावतात याचे कारण असे की, माणसांना खतम करण्यापेक्षा माणसांना जिंकले पाहिजे असे त्यांना मनोमन वाटते ! यामुळेच त्यांनी कर्हाड संमेलनात रसिकांची भूमिका स्वीकारून साहित्यिकांना जिंकण्याचा प्रयत्न केला.