विविधांगी व्यक्तिमत्व-४९

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सुलोचना यांच्या महाराष्ट्र सेवेबाबतही ते कौतुकाने व गौरवाने बोलत. 'वहिनीच्या बांगडया' या चित्रपटाच्या प्रिमीयर शो ला यशवंतरावजी सौ. वेणूताईंसह उपस्थित होते. सुलोचनाबाईंच्या रसिकप्रिय अभिव्यक्तीबद्दल ते म्हणाले, ''अहो, आपली आई, बहीण किंवा वहिनी असावी तर तुमच्यासारखीच'' असं एका चित्रपट अभिनेत्रीबद्दल वाटायला लागणे ही काय समाजाची कमी सेवा आहे? सुलोचनाबाईंनां या श्रेष्ठ विचारवंताकडून लाभलेल्या प्रशस्तीने जीवनाचे सार्थक झाल्यासारखेच वाटले.

संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळीच महाराष्ट्रातील काही पत्रकारांनी हे राज्य मराठी का मराठयांचे? असा खोचक प्रश्न विचारून एका नव्या वादाची पार्श्वभूमी निर्माण केली होती. मा. यशवंतरावांनी या खोचक प्रश्नाला आपल्या विधायक व सर्जनशील कृतीनेच उत्तर दिले आणि आपल्या त्यानंतरच्या (१ मे १९६० नंतर) अवघ्या दोन-अडीच वर्षाच्या कालावधीत साहित्य, संगीत, नाट्य या संस्कृती क्षेत्रातील सर्वांगीण विकासाला संपूर्ण उत्तेजन देऊन आपल्या अभिजात व उमद्या रसिक अभिरूचीची साक्ष केवळ महाराष्ट्रीयांनाच नव्हे, तर इतर प्रांतीयांनाही पटवून दिली व आपले सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान सिद्ध केले.

गाणे, नाटक, साहित्य व संगीत ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनन्यसाधारण वैशिष्टये आहेत. मराठी माणूस जसा नाटकाचा वेडा तसाच तो गानवेडा. साहित्याच्या क्षेत्रात अनेक वाटा आणि वळणांनी साहित्याला संपन्नता लाभते. महाराष्ट्राच्या या अभिजात गुणांची वाढ व्हावी, अभिव्यक्तीच्या विविध क्षेत्रातील कलावंतांच्या आविष्काराला योग्य वाव मिळावा, त्यांच्या गुणांचे कौतुक व्हावे आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाची जडणघडण आपल्याकडूनही घडावी, हा थोर मूल्यभाव यशवंतरावांनी आपल्या राजकीय जीवनात सुद्धा सातत्याने राजकारणाव्यतिरिक्त जीवनातील सर्व कलांची कदर केली. हस्ते - परहस्ते त्या अभिरूचीला सदभिरुचीचे वळण कसे देता येईल याचा मनोमनी विचार केला आणि त्यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी वेळोवेळी जे कार्य केले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील यशवंतरावांचे खरे योगदान मानल्यास अतिशयोक्ती न वाटावी.

कर्‍हाड नगर परिषदेने यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (नाटय, कला आणि साहित्य) उभे करून यशवंतरावांचे स्वप्न साकार केले आणि संबंधितांची कृतज्ञता व्यक्त केली. ही घटना यशवंतरावांच्या कलाप्रेमाला मुजरा देणारी ठरावी.