मोठया माणसाच्या तुलनेसंबंधी यशवंतराव म्हणतात, ''मोठया माणसांची परस्परांशी तुलना करू नये असे मानणारा मी आहे. मोठया माणसांची तुलना करणे ही त्यांचा अपमान करण्याची उत्कृष्ट रीत आहे. माझ्या मते हा मोठा, तो लहान अशा प्रकारची दोन मोठया माणसांची तुलना होऊच शकत नाही. कारण दोघांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी असतात. दोघांचे कल वेगवेगळे असतात. दोघांचे निरनिराळ्या प्रश्नांचे मूल्यमापन वेगवेगळे असते. खरे म्हणजे माणसे आपापल्या परीने मोठी असतात.'' पुढे म्हणतात ''महान व्यक्तींना आपण विशिष्ट जातीचे बनवून करंटेपणा दाखवीत आहोत. म.ज्योतिबा फुले माळी होते म्हणून माळी लोकांनी त्यांचा उत्सव करणे, छ. शिवाजी महाराज मराठी होते म्हणून त्यांची पूजा मराठ्यांनी करणे, लो. टिळक ब्राह्मण होते म्हणून त्यांचा उत्सव ब्राह्मणांनी करणे, हे करंटेपणाचे लक्षण आहे. हे मोठे लोक विशिष्ट जातीत जन्मले असतील, पण त्यांचे जीवन सर्व समाजासाठी होते. त्यांच्याविषयी सर्व समाजाने आदर दाखवून त्यांच्या शिकवणुकीचे अनुकरण करावे.'' खेड्यासंबंधी यशवंतराव सांगतात, ''आता जेव्हा मी एखाद्या खेडयात जातो तेव्हा लहानपणाचे खेडे सहसा समोर येत नाही. खेडे आता बदलत राहिले आहे. एक मात्र खटकते, महारवाडा आजही तो गावाच्या, खेडयाच्या बाहेरच उभा आहे. परिस्थितीच्या भिंती ढासळत गेल्या, वेशी उद्ध्वस्त झाल्या; पण जाती-जमातींच्या भिंती पडलेल्या नाहीत. भल्याभल्यांनी सुरुंग लावले, पहारी चालविल्या पण ते तट अजून उभेच आहेत. मांगाची मुलं, मुली व स्त्रिया आजही वारवाच्या दोर्या वळीत त्या तटाच्या बाहेर उन्हात उभ्या आहेत. त्याच त्या गवताने शेकारलेल्या झोपडया आणि पाठीला लागलेली पोटं!'' पुढंचा विचार मांडताना ते म्हणतात, ''पूर्वी खेडयातील सारीच माणसे परिस्थितीने बनविली होती. आज माणसे तिथली परिस्थिती बनवीत आहेत. शिक्षण त्यांच्या घरापर्यंत पोचले आहे. कुंभारी कौलाने घर शेकारणारे आता घरावर मंगलोरी तांबडी कौले चढवीत आहेत. मध्येच एखादे दुमजलीही दिसते. त्या दुमजलीच्या हिरव्या, निळया, गुलाबी भिंती लक्ष वेधून घेतात. एखाद्याच्या घरात ट्रान्झिस्टर गात असतो. एखादी मोटारसायकल फडफडत घरासमोर थांबते. मुले-मुली नेटके कपडे घालून शाळेत जाताना दिसतात. तालुक्याच्या गावात असलेल्या कॉलेजला पोचण्यासाठी एखादा तरुण सायकल दामटीत असतो. पैरणीची जागा बुशशर्टने घेतली आहे. खळणा शर्ट आणि टोपी हा जमाना शे-दोनशे वस्तीच्या गावातही पोचला आहे.''
''ज्या समाज-सुधारणा करायच्या, घडवायच्या त्या जनतेच्या हृदयावर बिंबवल्या पाहिजेत., त्याशिवाय माणसा-माणसांना संघटितपणे एकमेकाविरुद्ध वागण्यास शिकविणारा जातिवाद नाहीसा होणार नाही, निदान कमी तरी होणार नाही.''
संकटासंबंधी बोलताना यशवंतराव सांगून जातात, ''संकटाची सुद्धा चव घ्यावी लागते. खडीसाखरेची गोडी माहिती नसलेल्या माणसानं ती खाल्याशिवाय तिच्या गोडीचं ज्ञान होत नाही. तसेच संकटाचे आहे. ती सामाजिक असोत, राजकीय असोत, ती चाखावीच लागतात. निश्चयी लोक आपल्या कार्यापासून कधी उद्विग्न होत नाहीत. त्याबद्दलचे दाखले मी जेव्हा इतिहासात वाचतो त्यावेळी संकटे चाखायची ती कशासाठी हे उमजते. तरुणपणी हे सर्व समजून घेऊन आम्ही खांद्यावर तिरंगा घेतला असे नव्हे, त्यावेळी ते पोरसवदा धाडसही असेल. पावसाळयात नदीचे पाणी गढूळ असणारच. बुध्दी कितीही निर्मळ, उदार, शुद्ध असली तरी तारुण्यात ती मलीन बनतेच. पण बुद्धी अशी मलीन बनण्याच्या काळात म्हणूनच तुरटीचा हात मधून मधून फिरवावा लागतो. मलीनतेचा गाळ त्यामुळे खाली बसतो. माझ्या पूर्वायुष्यात घरात आईने हे काम केले. तिच्या वागणुकीने मला पुष्कळ शिकवले. आणि बाहेर टिळक, गांधी-नेहरू या महापुरुषांच्या विचाराने आणि कृतीने. त्यांच्या विचाराचे बोट धरूनच माझी वाटचाल सुरू केली. त्या वाटेवर चंदनाचा सुगंध होता. चंदन स्वत: झिजते, पण माणसाला सुगंध देते. या महापुरुषांचा सुगंध असाच होता. सुंदर फुलांचे वृक्ष पुष्कळ असतात, पण चंदनाचे वृक्ष विरळ आणि विरळा असतात ही जाणीव त्या वाटचालीत झाली.''
''प्रत्येक व्यक्तीस व्यक्ती म्हणून उच्चतम गोष्टीची आकांक्षा बाळगण्याचा अधिकार आहे. त्या मूलतत्त्वाची अंमलबजावणी सावधानतेने, आत्मविश्वासाने आणि निर्भीडपणे करावी लागेल.'' “हजारो वर्षांपूर्वी होतो, तितकेच आजही आपण सनातनी आहोत., जात-पात, धर्म, प्रांत, भाषा, बोलीभाषा आदी अनेक बाबतीत अजूनही आमच्यात मतभेद आहेत. या फुटीर प्रवृत्ती अस्तित्वात आहेत. एवढेच नव्हे, तर त्या भयानक वेगाने बोकाळतच आहेत. तरुणांपुढील हे एक मोठे आव्हान आहे.''