''संध्याकाळच्या वेळी नाईलच्या दोन्ही काठांची शोभा प्रेक्षणीय आहे. मेरिडीयन हॉटेल नाईलच्या अगदी काठावर आहे. तसे म्हटले तर काहीसे नदीतच आहे. नदीकाठच्या गॅलरीतून संध्याकाळी नाईलचा संथ पण विशाल प्रवाह व त्यात चमकणारे काठावरचे प्रकाशदिवे पाहाण्यात मोठी मौज आहे.'' दमास्कस येथून पाठविलेल्या पत्रातून यशवंतराव लिहितात, ''ओसाड व निष्पर्ण डोंगरांच्या मधून एक सुंदर खोरे आहे. दमास्कस सोडताना चिंचोळे दिसते., परंतु पुढे ते खोरे विस्तृत होत जाते. या खोर्यातून जाणारा हा रस्ता लेबेनॉनमध्ये बैरुतला जातो. या खोर्यात जसजसे पुढे गेलो, तशी उंची वाढत गेली. हवेत गारवा वाटू लागला. हिरव्यागार शेतीवाडीने भरलेले खोरे दृष्टिपथात येताच नेत्रांची तृप्ती होते.''
''खाली रस्त्यावरून मोटारींची रांग हळूहळू पुढे सरकत होती. अधून-मधून दिवे लागत होते., पण पश्चिम क्षितिजावर सूर्याचे लाल बिंब स्वच्छ आकाशात एकाएकी लागलेल्या दिव्यासारखे भासले. पलंगावरून उठून खिडकीशी जाऊन किती तरी वेळ ते दृश्य नजरेत आणि काळजात साठवीत उभा राहिलो. हळूहळू सूर्यबिंब डुबू लागले. पूर्ण बिंबाचे अर्धबिंब झाले आणि नंतर अधिक लहान होत होत शेवटी कुंकवाची एक लकेर रहावी असे राहिले. क्षणभरात तेही लुप्त झाले आणि सूर्य गेला - काहीतरी हरवले असे वाटून मी खिडकीतून मागे फिरलो. लगेच एकाकी वाटू लागले. मघा जेथे सूर्याची लाल कोर बुडताना पाहिली त्याच्या बरोबर वर - क्षितिजापासून काहीशा उंचीवर चंद्राच्या बीजेची कोर मंद तेजाने उगवली होती. तिच्या बाजूला थोड्या अंतरावर (म्हणजे कित्येक कोटी मैल) एकच एक चांदणी लुकलुकत होती. सगळे आकाश स्वच्छ होते. इतर चांदण्यांचा मागमूसही नव्हता.” असे त्यांनी अंकारा येथून पाठविलेल्या पत्रात वर्णन केलेले आहे. बाली (इंडोनेशिया) येथून पाठविलेल्या पत्रात ते वर्णन करतात, ''या बाली-बीच हॉटेलमध्ये आलो. सुरेख बीच आहे. माझ्या खोलीच्या गच्चीत गेल्यावर पूर्व दिशेला पसरलेला जाबा समुद्र दिसला. क्षितिजावर अंधुकसे एक बेट व त्याच्यावरचे डोंगररांगांचे आकार दिसत होते. समुद्राचे पाणी शांत व स्वच्छ दिसले., पण बेट फार सुंदर आहे. केरळ-कोकणामध्ये असावी अशी गर्द झाडे, जमीन उत्तम, म्हणून शेती-उत्तम नटलेला निसर्ग इतका विपुल आहे की, येथे नृत्य, चित्रकला यासारख्या कला शतकानुशतके पोसल्या गेल्या यात काय आश्चर्य! 'विश्वविख्यात बुद्धमंदिर’ आहे. हे मंदिर जगातील सर्वांत मोठे बुद्धमंदिर आहे. मंदिराची रचना, शिल्प म्हणून व बुद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतीक म्हणूनसुद्धा अपूर्व आहे. जशी जशी मंदिराची उंची वाढत जाते, तसतशी आध्यात्मिक अनुभवाचीही उंची वाढते असे दिग्दर्शित केले आहे. हे व्यक्त करण्यासाठी भगवान बुध्दाच्या मूर्तीचा उपयोग केला आहे.''
दारखान येथून पाठविलेल्या पत्रातून ते लिहितात. ''अंधार कमी आणि दोन्ही बाजूंचे 'लँडस्केप' नजरेखाली आले. छोटया टेकड्यांच्या रांगा दोन्हीकडे होत्या त्यांना भिडेतो, नजर टाकील तिथपर्यंत गवताळ जमीन दिसत होती. गवत काढलेले दिसले. झुडुपांचे झापे ठिकठिकाणी होते., परंतु वृक्षराजी म्हणून असे काही नव्हते. डोंगर बोडखेच वाटले. सकाळ झाली, पण पक्ष्यांची किलबिल नाही, की कोठे त्यांचे थवे नाहीत. एकाकी पाखरू उडताना दिसे. पाणी भरपूर दिसले. त्यामुळे वैराण माळ याला म्हणता येणार नाही.' विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राबद्दल ते म्हणतात, ''आपला महाराष्ट्रही विविधतेने नटलेला आहे. ही विविधता निसर्गाच्या रचनेत जशी आहे तशी ती माणसात सुद्धा आहे. उत्तरेस सातपुडा आणि पश्चिमेस सह्याद्री यांची उत्तुंग शिखरे व त्यांच्या उतरणीवरील घनदाट जंगले यांनी या भागास भव्योदात्त सौंदर्य प्राप्त आहे. तर वर्धा वैनगंगेच्या खोर्यात जागोजागी असलेली जलाशये व पळसाच्या लाल फुलांनी डवरलेली राने मनाला प्रसन्नता आणतात. कोकणचा किनारा अथांग पश्चिम सागराचे दर्शन घडवितो, तर गोदेच्या पाण्याने पुनीत व समृद्ध झालेली मराठवाडयाची भूमी महाराष्ट्राच्या तेजस्वी भूतकाळाची व संस्कृतीची आठवण करून देते. नागपूरच्या परिसरात भारतातच केवळ नव्हे तर सर्व आशियात उत्तम म्हणून नावाजलेली संत्री पिकतात, तर रत्नागिरीकडे भारतात तोडीचा दुसरा आंबा नाही, तो हापूस आंबा अमाप पिकतो. विदर्भ-मराठवाडयाच्या काळ्याभोर जमिनीत कापूस भरघोस फुलतो, तर नगर-सोलापूर-कोल्हापूर भागात पिकणारा रसदार ऊस सर्वांचे तोंड गोड करतो. निरनिराळ्या भागातील लोकांच्या बाबतीतही ही विविधता आहे. कोकणपट्टीतील माणसाचे अनुनासिक उच्चार ऐकून देशावरच्या माणसाला मौज वाटते. तर खानदेश, वर्हाडचा माणूस एक विशिष्ट हेल काढून बोलू लागला की सांगली-कोल्हापूरकडील माणसांच्या चेहर्यावर स्मिताची रेषा न झळकली तरच आश्चर्य! पण या विविधतेतच महाराष्ट्रातील जीवनाचे सौंदर्य साठलेले आहे. अशी विविधता नसेल तर जीवन नीरस व रंगहीन होईल.''