विविधांगी व्यक्तिमत्व-६४

लोकसभेतील विरोधी पक्षाच्या नेतृत्वात झालेल्या बदलासंबधी आपले विचार स्पष्टपणे मांडताना वि. ना. देवधर लिहितात, दिल्लीच्या राजकारणात स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या ३० वर्षात प्रभावीपणे गाजलेल्या महाराष्ट्रीय नेत्यांची नावे मी सहज आठवली. हाताची बोटे काही पुरी भरली नाहीत. पहिले नाव आले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे. भारताचे घटनाकार व पहिल्या राष्ट्रीय सरकारातील कायदेमंत्री म्हणून त्यांचे नाव इतिहासात नमूद झाले आहे, त्यांचे समकालीन काकासाहेब गाडगीळ हेही नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्री. त्यांच्यापाठोपाठ नाव पुढे येते चिंतामणराव देशमुख आणि त्यानंतर कुणाचे नाव पुढे येत असेल तर ते यशवंतराव चव्हाण यांचे. ही संसदेतील महत्त्वाची मंडळी झाली. संसदेत व त्यातही लोकसभेत विरोधी बाकावर बसून नाव गाजविणारे आणखी एक नेते म्हणजे बॅ. नाथ पै, ह. वि. पाटसकर, र. के. खाडिलकर, अण्णासाहेब शिंदे, मोहन धारिया, विठ्ठलराव गाडगीळ, शिवाजीराव देशमुख आदींनी आपल्या परीने कर्तृत्व गाजविले, पण राष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून मी वर उल्लेखिल्याप्रमाणे डॉ. आंबेडकर, काकासाहेब गाडगीळ, चिंतामणराव देशमुख, यशवंतराव चव्हाण, बॅ. नाथ पै या महाष्ट्राच्या सुपुत्रांचा उल्लेख करावा लागेल.

यशवंतरावांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथील दै. ‘लोकसत्ता’चे संपादक लिहितात, महाराष्ट्राच्या तीन सुपुत्रांचे वाढदिवस ह्या आठवड्यात साजरे होत आहेत, हा एक योगायोगाचा तसाच सदभाग्याचाही योग म्हणावा लागेल. भारताचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे अग्रगण्य नेते श्री. यशवंतराव चव्हाण ह्यांचा ५६ वा वाढदिवस गुरुवारी साजरा होत आहे., तर महाराष्ट्राचे महसूलमंत्री वयाची साठी पूर्ण करून मंगळवारी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत आणि महाराष्ट्र राज्याचा कोष अत्यंत चतुरपणे सांभाळणारे अर्थमंत्री श्री. शेषराव वानखेडे ५५ वर्षांची सीमा ओलांडून ५६ व्या वर्षात पदक्षेप करीत आहेत. सार्वजनिक जीवन म्हटले की वादंग व मतभेद हे आलेच. पण या सर्व वादंगांना आणि मतभेदांना तोंड देऊन वर्षानुवर्षे काही नेतेमंडळी आपली आघाडी सांभाळतात, ह्यातच त्यांच्या कर्तृत्वाचा आणि लोकप्रियतेचा पुरावा सामावलेला असतो.

कर्‍हाडचा एक सामान्य शेतकरी कुटुंबातला तरुण मुलगा देशभक्तीने प्रेरित होऊन, आपल्या सार्वजनिक आयुष्याचा प्रारंभ करतो आणि स्वकर्तृत्वाच्या जोरावर, द्वैभाषिकाचा मुख्यमंत्री, संयुक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, भारताचा संरक्षण मंत्री आणि नंतर गृहमंत्री अशी मानाची, अधिकाराची व जबाबदारीची पदे भूषवितो, ह्याचा महाराष्ट्राला सानंद अभिमान वाटल्याशिवाय कसा राहील? महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळाच रंग प्राप्त झाला. त्या दु:खद घटनेतून महाराष्ट्राच्या सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात नव्या नेतृत्त्वाचा उदय झाला. देव, देवगिरीकर, गाडगीळ हे पांढरपेशांचे नेतृत्व हळूहळू मागे पडले आणि हिरे, चव्हाण, देसाई, कै. शंकरराव मोरे, वसंतराव नाईक असे बहुजन समाजातील नेते पुढे आले. ग्रामीण भागात मर्यादित क्षेत्रात कार्य करणारी मंडळी प्रांताच्या राजकारणात अग्रभागी चमकू लागली आणि समाजक्रांतीच्या एका नव्या प्रवाहाचा प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात गेली वीस वर्षे अत्यंत वादळी तितकीच बिकट ठरली. ह्या कालखंडात ह्या नव्या नेतृत्त्वाचा कस लागला आणि बहुजन समाजाच्या नेत्यांच्या हाती महाराष्ट्राचे हितसंबंध सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिले. गेल्या १५ वर्षातील महाराष्ट्राचा इतिहास हा यशवंतराव ह्यांच्या कर्तृत्वाचाच इतिहास म्हणावा लागेल. विशिष्ट काळांत विशिष्ट व्यक्ती कशी वागली याबाबत मतभेद होऊ शकतात. त्या पद्धतीने वागण्यात राष्ट्रांच्या दृष्टीने काही चूक झाली का, हा प्रश्नही वादग्रस्त ठरू शकेल., पण तेवढयाने त्या व्यक्तीने बजावलेल्या ऐतिहासिक कार्यावर पडदा पडणार नाही की त्यावर बोळा फिरविण्याचा यत्‍न यशस्वी होणार नाही. यशवंतरावांच्या सार्वजनिक कार्याला हा न्याय यथार्थाने लागू पडतो. यशवंतराव चव्हाण ही याक्षणी थोडीफार वादग्रस्त व्यक्ती ठरलेली आहे. तथापि, त्यांच्या चालू धोरणावर भविष्यकाळच अभिप्राय देणार आहे. आज तरी चव्हाणांच्या कर्तृत्वाचा व नेतृत्वाचा परिमल भारतभर पसरलेला असून, दिल्लीतील धकाधकीच्या राजकारणाला ते मोठ्या चातुर्याने तोंड देत आहेत. अशा ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला भारताची व महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी उदंड आयुरारोग्य लाभो आणि त्यांचा कीर्तिसुगंध देश-विदेशात पसरून, देशसेवेची प्रेरणा देशांतील व महाराष्ट्रांतील तरुण पिढीला लाभो, अशी ह्या मंगल प्रसंगी आम्ही प्रभुचरणी प्रार्थना करतो.