कर्तृत्वाची येथ प्रचीती मुलाखतकार-ना. ग. नांदे, (साप्ता. आवाहन मासिक १७ एप्रिल १९६६)
यशवंतराव यशस्वी संरक्षणमंत्री ठरले याचे रहस्य काय? यशवंतराव म्हणतात, 'युद्धतंत्रविषयक व चीनविषयक साहित्यिक वाचन, युद्धतंत्र व शास्त्रविषयक तज्ज्ञ लोकांच्या चर्चा घडवून आणल्या.' त्यांचे मनन व चिंतन केले. कष्टाने असाध्य ते साध्य होते अशी त्यांची श्रद्धा होती. मनुष्यस्वभावाचे विविध नमुने सार्वजनिक जीवनामध्ये अभ्यासायला मिळाले. कम्युनिस्ट तंत्रज्ञान व इतिहास यांच्या अभ्यासामुळे चीनने जागतिक राजकारणात घेतलेल्या गेल्या १५-२० वर्षांतील भूमिकेचा अभ्यास करता आला. 'इंटर कॉन्टिनेंटल बॅलेस्टिक मिस्साइल' च्या शोधाचा युद्धतंत्रावर व युद्धाच्या स्वरूपावर झालेला परिणाम त्यामुळेच त्यांच्या ध्यानात आला. अण्वस्त्रबंदी करार अपरिहार्य ठरला. प्रचलित आंतरराष्ट्रीय डावपेचांच्या संदर्भात त्यांनी त्यावरून निष्कर्ष काढला की, चीन-रशिया व रशिया-भारत युध्दाचा विचार व भारत-पाक संबंधाचा विचार क्रमप्राप्त ठरला आहे. पंडितजींची चतु:सूत्री व शास्त्रीजींची राजनीती यात फरक असल्याचा लोकप्रवाद फसवा व खोटा असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. पण परिस्थितीत बदल झाल्यामुळे त्या धोरणांच्या अंमलबजावणीच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक झाले आहे, असाही त्यांनी खुलासा केला.
* सामाजिक परिवर्तनासाठी विषमता निर्मूलन जरूर मुलाखतकार श्री. ना. बा. लेले.
शिक्षणाद्वारे संस्कार करून जात-पात वाद नष्ट करता येईल. त्यातूनच सामाजिक परिवर्तन होईल. स्वयंपूरक नगरांची निर्मिती (सॅटेलाईट टाऊन्स) हे चव्हाणांच्या दूरदृष्टीचे एक गमक होय. विकासाचा समतोल साधायचा असेल तर निष्ठा, मूल्य यांचाही समतोल हवा. या मुलाखतीमध्ये त्यांनी उपेक्षित अशा जिराईत शेती करणार्यांच्या अपेक्षांची आबाळ करता कामा नये, असा इशारा दिला आहे. विज्ञाननिष्ठ मनोवृत्तीचा विकास प्रयत्नपूर्वक केला पाहिजे असे मार्ग या मुलाखतीमध्ये यशवंतरावांनी सुचविले आहेत.
* उद्याच्या औद्योगिक महाराष्ट्राचे माझे स्वप्न - मुलाखतकार - किर्लोस्कर प्रतिनिधी -किर्लोस्कर दिवाळी अंक-१९६०)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्याच्या संपन्न महाराष्ट्राची वाटचाल कशी होणार याचे दिग्दर्शन या मुलाखतीत करत आहेत. त्याची उभारणी १) सार्वत्रिक शिक्षण, २) काम करून स्वत:ची उन्नती करून घेण्याची इच्छा, ३) कष्ट करण्याची तयारी, ४) सामुदायिक कार्यात परस्पर सहकार्याने काम करीत राहण्याची तयारी या चार गुणांनी होणार आहे, याची स्पष्ट जाणीव देत आहेत.
त्यांच्या मुलाखतीचा गाभा हा आहे की, जनता शहाणी व समजूतदार झाल्याशिवाय महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीचा पाया पक्का होणार नाही. ते पुढे म्हणतात की, महाराष्ट्रातली कारखानदारी पक्की करण्यासाठी शिक्षण आणि सतत कष्ट करण्याची आवड ही प्रथम आवश्यक आहे. आपली प्रगती करण्याची तळमळ जनतेतच असावयाला पाहिजे. 'मी पुढे जाणार' हा एकच निर्धार महाराष्ट्राने केला पाहिजे.
साप्ताहिक मौज - दिनांक - १ मे १९६० मुलाखतकार 'मौज' प्रतिनिधी (महाराष्ट्र राज्य निर्मिती विशेषांक)
तीस वर्षे उलटली तरी या मुलाखतीत यशवंतरावांनी त्यावेळी अस्तित्वात असलेल्या अनेक प्रश्नांवर आणि भावी महाराष्ट्र राज्यात निर्माण होऊ पाहणार्या समस्यांवर मनमोकळी मते व्यक्त केली आहेत. 'मौज' च्या प्रतिनिधीनेही ही मुलाखत सर्वांगीण आणि उपयुक्त कशी होईल याची काळजी घेतली आहे.