विविधांगी व्यक्तिमत्व-३०

याची सुरुवात यशवंतरावांच्या अखेरीच्या दिवसातच झाली होती. मुस्लिम लीग, दलित पँथर, शिवसेना, मराठा महासंघ इत्यादी जातीयवादी संस्थांच्या कारवायांमुळे ते अतिशय अस्वस्थ झाले होते. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र असा नव्हता ही आपली अस्वस्थता ते वेळोवेळी जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवत. महाराष्ट्रातील थोर शिक्षण महर्षी स्व. बापूजी साळुंखे यांच्या सत्कारप्रसंगी (एप्रिल १९८२) ते म्हणाले होते, ''महाराष्ट्राला एवढी थोर शैक्षणिक परंपरा असताना आजची तरूण पिढी ठिकठिकाणी जातीयवाद निर्माण करत आहे, याचा मला खेद वाटतो. प्रत्येक तरुणाने समाजातील आपले स्थान कोणते आहे, समाजासाठी आपण काय करतो याचा विचार करावा. हा अमूक जातीचा, तो अमूक जातीचा असा विचार जर तरुण पिढी करू लागली तर हिंदुस्थानचा विचार कोण करणार!''

लो. टिळकांच्यानंतर अखिल भारतीय पातळीवर महाराष्ट्राचे स्थान निर्माण करणारा यशवंतरावांच्यासारखा महाराष्ट्रीय नेता अपवादानेच आढळेल. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर अखिल भारतीय समाजजीवनाच्या संदर्भात सर्वांगीण विचार करणारे असे हे थोर व्यक्तिमत्त्व होते. यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राज्यशासनात पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून स्थान मिळविले, पुढे ते विशाल द्वैभाषिकाचे, नंतर संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एवढेच नव्हे, तर नंतर नोव्हेंबर, १९६२ मध्ये झालेल्या चिनी आक्रमण प्रसंगी पं. जवाहरलाल नेहरूंच्या निमंत्रणावरून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संरक्षणमंत्री म्हणून प्रवेश केला. त्यानंतर १९८० पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात निरनिराळया खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले.

आपले स्वयंभू आणि पृथगात्म वैशिष्ट्य यशवंतरावांनी शेवटपर्यंत टिकविले. हे त्यांनी प्रत्येक क्षेत्रातील विशेषत: सार्वजनिक क्षेत्रातील कार्यात आपला जो ठसा उमटवला त्यावरून स्पष्ट होते. त्यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना अत्यंत भावरम्य शब्दात ना. शरद पवार म्हणतात, ''भारताचे समर्थ गृहमंत्री एवढयावरच त्यांचे मूल्यमापन करणे अशक्य आहे. किंबहुना यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे हेच वैशिष्टय आहे की, ते एकसुरी नाही, एकरंगी नाही, ते बहुरंगी, बहुसुरी आहे. एखाद्या कुशल संगीततज्ज्ञाचा संच आपल्या सर्व वाद्यवृंदासह सुरेल झंकार एका लयीत छेडून एक नादमधुर सूरकाव्य मन:पटलावर कोरतो. त्यावेळी एक निर्व्याज आनंदाचा क्षण आपल्या अंतरंगात चिरंतन होतो, तसेच यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल वाटते. ते राजकारणात राजकारणी आहेत, सामाजिक समस्यांचे चिंतक आहेत, तसेच समाजातल्या विविध प्रवृत्तीचे अभ्यासू आणि रसिक टीकाकार आहेत. यशवंतरावांच्या स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर राजकीय जीवनाकडे पाहिले तर असे दिसून येते की, त्यांचे आजवरचे राजकारण हे व्यापक सामाजिक हित, समाजवादी अर्थकारणाचा पुरस्कार, लोकशाही जीवननिष्ठा आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी दृष्टिकोन या चार प्रमुख सूत्रांचा आचार करणारे आहे.'' (महाराष्ट्र टाइम्स - १२ मार्च १९७० – ‘यशवंतराव : राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व’ पृष्ठ ६२)

'यशवंतराव : राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व', संपादक भा. कृ. केळकर, या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या ग्रंथात 'राजकीय जीवनाचे चार अध्याय' या आपल्या लेखात संसदपटू मधू लिमये म्हणतात. ''यशवंतरावांना संगीत, नाटय, साहित्य यात रस होता. त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकरंगी होते. त्यांचे आत्मचरित्र अपुरे राहिले याची खंत वाटते. त्याचा पुढील भाग मनाने राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर जर त्यांनी लिहिला असता तर तो निश्चितच रंगतदार झाला असता यात शंका नाही.'' (पृष्ठ-१००)

यशवंतरावांच्या मुलाखती वेगवेगळया प्रसंगी वेगवेगळ्या कारणाने विविध क्षेत्रातील भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या जाणकार लोकांनी घेतलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे पाहण्याचा यशवंतरावांचा दृष्टिकोन जसा स्पष्ट होतो, तसाच या जाणकारांचा यशवंतरावांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता होता हेही या मुलाखतींच्या वाचनाने वाचकांना कळून येईल. गेल्या ४०-४५ वर्षांतील महाराष्ट्रातील निरनिराळया वृत्तपत्रातील व नियतकालिकातील निरनिराळ्या कार्यक्रमाच्या वा प्रासंगिक निमित्ताने घेतल्या गेलेल्या मुलाखतीपैकी काही मुलाखती सारांशरूपाने देत आहे. त्यातून गेल्या ३० वर्षातील महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील राजकारणापासून ते साहित्यापर्यंत घडामोडींचे समालोचन समीक्षण व डोळस रसग्रहण यांचे समग्रदर्शन यशवंतप्रेमी विचक्षण वाचकांना व्हावे, अशी अपेक्षा आहे.