विविधांगी व्यक्तिमत्व-२४

महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे निर्मिक

भारताच्या समग्र जडणघडणीमध्ये ज्यांचे मोलाचे योगदान आहे अशा महापुरूषांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये यशवंतराव चव्हाण, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरूषांच्या स्मृतिदिनानिमित्ताने त्यांच्या विचार आणि कार्याचा सूत्रबद्ध पद्धतीने आढावा घेण्यासाठी हा लेख प्रपंच....

महात्मा ज्योतिराव फुले आधुनिक महाराष्ट्रातील सर्जनशील समाजक्रांतीचे खरेखुरे ‘निर्मिक’ होते. त्यांनी बहुजन समाजाला, उपेक्षित व पीडितजन सामान्यांना मानवी अस्मिता प्राप्त करून देण्याचा प्रयत्‍न केला. या देशातील शोषित व दलित समाजाला विद्या मिळविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, फुल्यांनी पददलितांच्या व बहुजन समाजाच्या व्याधीचे मूळ कारण शोधले, त्याचे योग्य व अचूक निदान केले. अविद्या घालवायची असेल तर लोकांना विद्या द्यावी लागेल, त्यांचे अज्ञान घालवायचे असेल तर लोकांना विद्या द्यावी लागेल, त्यांचे अज्ञान घालवायचे असेल तर त्यांना ज्ञान उपलब्ध करून द्यावे लागेल, हा विचार त्यांनी मांडला. नुसता विचार मांडून ते स्वस्थ बसले नाहीत तर विचाराला त्यांनी कृतीची जोड दिली. शिक्षण कार्याचा आरंभ त्यांनी केला.

महात्मा फुले कृतिशील तत्त्वचिंतक होते. त्यांच्या जीवितकार्यामागील सर्व प्रेरणा मानवी स्वातंत्र्याच्या, समतेच्या व बंधुत्वाच्या प्रेरणा होत्या. मानवी स्वातंत्र्यासाठी, समतेसाठी न्याय आणि बंधुत्वासाठी त्यांनी समर्पित भावनेने प्रतिकूल परिस्थितीशी आणि प्रस्थापित वर्गाशी अव्याहतपणे लढा दिला.

बहुजन समाजाच्या आणि अस्पृश्यतरांच्या गळ्यात हजारो वर्षे धार्मिक गुलामगिरीच्या, अंधश्रद्धेच्या, विषमतेच्या आणि ब्राह्मण्याच्या चिकटविलेल्या जळवा महात्मा फुल्यांनी तोडून टाकल्या आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक-शैक्षणिक आणि आर्थिक समतेचा दीपस्तंभ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या मार्गदर्शनासाठी उभा केला. सर्वांगीण क्रांतीचे शिंग भारतात महात्मा फुल्यांनीच प्रथम फुंकले आणि समतेचे वारे खेड्याखेड्यांतून, घरांघरांतून, दर्‍या-खोर्‍यांतून वाहू लागले. संतांनी आध्यात्मिक समतेचा पोटतिडकीने प्रचार केला, तर महात्मा फुल्यांनी सर्वांगीण समतेचा पाया घातला. आधुनिक प्रगत विचारांची बिजे फुल्यांच्या कार्यात, लिखाणात आणि बोलीत आढळून येतात. ते महान द्रष्टे होते. सामान्य माणसाच्या नवयुगाची ग्वाही देणारा आधुनिक भारतातला पहिला समाज क्रांतिकारक म्हणजे महात्मा फुले हेच होत.

महात्मा फुले महाराष्ट्राच्या क्रांती विचाराचे भारतीय विद्यापीठ आहे. बुद्ध, चार्वाक, तुकाराम यांच्या निर्भय मानवतावादी विचारांच्या वटवृक्षाला आलेले मधुर फळ म्हणजे महात्मा फुले आणि त्यांची सत्यशोधक चळवळ होय. महात्मा फुले यांनी जाती संस्थेविरूद्ध बंड पुकारले. कोणताही धर्म ईश्वरप्रणित नाही आणि कोणताही धर्मग्रंथ देवनिर्मित नाही असे ठणकावून सांगून ज्योतिराव फुले यांनी ईश्वरशाहीला हादरा दिला. भौतिकवाद्यांना आणि समाजवाद्यांना भिडावेत आणि जुळावेत असे त्यांचे तत्त्वज्ञान होते.

महात्मा फुले शेतकरी, कामगार, दलित आणि स्त्रिया यांचे कृतिशील कैवारी होते. रयतेचे ते क्रांतिकारी तत्त्वज्ञ होते. शूद्रादी शूद्रांना आणि स्त्रियांना ज्ञानाचे दरवाजे खुले करणारी चळवळ त्यांनी सुरू केली. भारतातील शुद्र आणि अतिशुद्र व स्त्रियांच्या  शिक्षणाचे ज्ञानपीठ म्हणजे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले होत