यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch १२-४

सत्तेचं असं असतं की, आज आहे उद्या नाही असं गृहीत धरूनच काम करावं लागतं.  बराच काळ सत्तेवर राहणं ही अपवादात्मक परिस्थिती म्हटली पाहिजे.  सत्ता नाही असाही क्षण येतो केव्हा केव्हां !  आयुष्याला जर अखेरी आहे तर सत्तेला का नसावी !  सत्तेवर राहू नये असा कित्येकदा जाणूनबुजून निर्णय करावा लागतो.  अर्थात असा निर्णय घ्यावा लागेल तेव्हा काय करावं किंवा काय करीन असा प्रश्न मनात अशा वेळी येणं साहजिक ठरतं.  माझ्यापुरते विचाराल तर या प्रश्नानं माझ्या मनाला कधीच त्रास झालेला नाही.  याचं कारण, जेव्हा सत्ता नव्हती, सत्तेच्या ठिकाणी बसणार आहोत याची पुसटशी कल्पनाही नव्हती, तेव्हापासून मी माझी कामाची दिशा निश्चित केली होती.  

सत्तेत असल्यामुळं, उद्या मी सत्तेत नसलो तर काय करीन यासंबंधी बोलणं बरं नव्हे.  परंतु सत्तेत नसताना पूर्वी जे काम पुढं नेण्याच्या प्रयत्‍नात होतो, त्याच दिशेनं सत्तेत असतानाही प्रयत्‍न सुरू ठेवला.  सत्तेत असताना शासकीय क्षेत्रात काम करावं लागतं.  पण सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात करता येण्यासारखं पुष्कळ काम आहे.  या क्षेत्रात साध्य करण्याचं जे स्वप्न होतं त्यापासून अजून माझ्यासारखा माणूस पुष्कळ लांब आहे.  जाति-जातींमधील स्पर्धा, तेढी लोकशाहीत वाढत आहोत.  महत्त्वाकांक्षी माणसं त्याचा खेळ करीत आहेत.  मागासलेल्या वर्गाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.  या क्षेत्रात माझ्यासारख्याला पुष्कळ काम करता येण्यासारखं आहे.  सत्तेत नसेन त्या वेळी असंच काही काम करीन.  सत्तेत नसलं म्हणजे दुर्बलता येते, शक्ती कमी पडते, साधनं, माणसं कमी होतात हे खरं, परंतु लोकांची मला थोडीफार मान्यता आहे याचा उपयोग करून सामान्यांचं स्थान उंचावेल, जाति-जातींमधील तेढी कमी होतील, मागासलेल्या वर्गाच्या प्रश्नाला चालना देता येईल, लोकांच्या मदतीनं असं काम करता येईल असा विश्वास वाटतो.

एक मात्र निश्चित-सत्तेतून बाजूला गेलो, बाजूला होण्याचा निर्णय मला करावा लागला तरी राजकारणातून बाजून होईन असं नव्हे.  राजकारणातून बाजूला होणे नाही.  परंतु आपल्या स्वतःसाठी काही करायचंय अशी भावना राहणार नाही.  स्वतःसाठी काही मागावं असंही नाही.  पक्षानं, नेत्यांनी जनतेनं मला भरपूर दान दिलं आहे.  त्यामुळे सत्तेच्या बाहेर राहिल्यानं दुःख राहणार नाही.  खंत राहणार नाही.  कोणाबद्दल कटुता, कडवटपणा असणार नाही.  आजवर राहिलेला मनाचा समतोलपणा त्या वेळीही राहील अशी आशा आहे.  माझं मन तसं स्वच्छ आहे.''

गप्पांचा ओघ सत्तेकडं वळला आणि सत्तेत राहणारानं काही पथ्यं पाळली पाहिजेत असं यशवंतरावांनी सांगितलं तेव्हा तीस वर्षांहून अधिक काळ सत्तेत असणार्‍या तुम्ही किती पथ्यं पाळली आणि किती यशस्वी झाला यासारखे किंवा अन्य काही सवाल मी करणं स्वाभाविकच होतं.  परंतु सवाल जोखण्याची बौद्धिक हिंमत पैदा केलेल्या यशवंतरावांसारख्याशी गप्पा करताना मनात असलेल्या अन् नसलेल्या सगळ्याच सवालांची इतिश्री घडायची ती ही अशी !

स्मृतिसंकलन

महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर
वाद आणि चव्हाण

यशवंतरावांची पहिली मुख्य कामगिरी म्हणजे, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात जी तीव्रता त्यांच्या सार्वजनिक आयुष्याच्या पहिल्या १५-२० वर्षांत आलेली त्यांना दिसत होती तिची तीव्रता, दोन्ही बाजूंना न दुखवता आणि दोन्ही बाजूंना जवळ जवळ आणून त्यांनी नाहीशी केली आणि महाराष्ट्रातील वातावरणात गोडवा व स्नेह निर्माण केला असे माझे निरीक्षण आहे.  महाराष्ट्रातील अनेक ब्राह्मण पुढार्‍यांनी यशवंतरावांना त्यांच्या या कामगिरीबद्दल धन्यवाद दिले आहेत.  दोन ठळक नावेच सांगायची असली तर सातारचे भाऊसाहेब सोमण आणि कर्‍हाडचे विद्वान श्री. आळतेकर यांनी यशवंतरावांच्या या कामगिरीबद्दल माझ्याजवळ गौरवोद्‍गार काढलेले आहेत.  त्या जुन्या काळच्या उलट-सुलट घडलेल्या घटना उकरून काढून हा विषय मांडला तर तो कदाचित अधिक बोधप्रद होईलही पण त्या स्मृती विसरण्यायोग्य असता, जिवंत केल्यासारख्या होतील म्हणून मी ते टाळतो.  १९५६ साली यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्या वेळी द्वैभाषिक जन्माला आले होते, तेव्हापासून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातील तीव्रता कमी करण्याचा त्यांनी प्रयत्‍न केला असे मला म्हणायचे नाही.  ४९ सालापासून मी त्यांना ओळखू लागलो आणि तेव्हापासूनच यशवंतराव हा सलोखा निर्मिण्यात रस घेत होते आणि कार्यरत होते असा माझा अनुभव आहे.  भाऊसाहेब सोमण यांचे यशवंतरावांवर विशेष लक्ष होते.  यशवंतरावांना ते माहीत होते की नाही ते मला ठाऊक नाही.  भाऊसाहेब सोमणांना ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादातील तीव्रता दुःखदायी वाटे आणि 'हा मुलगा पुढे येईल तर ही तीव्रता, तो कमी करील' असे उद्‍गार भाऊसाहेबांनी माझ्याजवळ काढले होते.  आणि नंतर केव्हातरी आपले हे म्हणणे खरे झाल्याचेही त्यांनी मला सांगितले.  त्या वेळेपर्यंत यशवंतराव फार थोर पुढारी झालेही नव्हते.  मुख्यमंत्री झाल्यापासूनच्या काळात ते मुंबईत थोडीच वर्षे राहिले होते.  पुढील काळात त्यांची दिल्लीतच अधिक वर्षे गेली.  पण 'घार उडते आकाशी तरी तिचे लक्ष पिलापाशी....' असे यशवंतराव, हेच केंद्रीय मंत्री होते.  दिल्लीस राहून ते सतत महाराष्ट्राची काळजी करीत असत आणि महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची तीव्रता त्यांच्या विशिष्ट स्वभावप्रदर्शनामुळे, साहित्यप्रीतीमुळे आणि सामाजिक समता निर्वैरतेने निर्माण करण्याच्या त्यांच्या प्रयत्‍नामुळे त्यांना या कामी बरेच यश मिळाले, असे माझे मत आहे.

- पां. वा. गाडगीळ
(गावकरी, ३-१२-८४)
(महाराष्ट्राच्या इतिहासात यशवंतराव चव्हाणांचे स्थान)