मुख्यमंत्री असताना किंवा दिल्लीत सत्तेमध्ये काम करीत असतानाही मी जो विचार जपला तो असा की लोक जवळ येण्यासाठी आतुर असतात त्यांना आपण संधी देतो का ? रोज सकाळी वृत्तपत्र वाचताना आज महत्त्वाचं का आहे किंवा आपल्या एखाद्या निर्णयाची प्रतिक्रिया कोणती उमटली आहे याकडे लक्ष ठेवावंच लागतं. प्रतिक्रियांसंबंधी मनाला सवय लावून घेतली ती अशी की, एखाद्या निर्णयावर टीकाटिप्पणी होणं वेगळं आणि त्यावर एकांगीपणाचा शिक्का मारला जाणं वेगळं. मनात शत्रुत्व ठेवून किंवा पूर्वग्रह राखून निर्णय केला तर तो एकांगी होण्याची शक्यता अधिक. असं काही होऊ द्यायचं नाही हे स्वतःला शिकवायचा, सत्तेत नसल्यापासूनचा माझा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. त्यामुळे प्रतिक्रियांसंबंधात कधी धास्ती वाटली नाही.
त्याचबरोबर सत्ता स्वीकारण्यापूर्वी, स्वातंत्र्य कशासाठी, याबाबतच्या आपल्या जुन्या प्रेरणा काय होत्या, त्या ध्येय-धोरणाची कसोटी राहते की नाही या गोष्टी सातत्यानं समोर असल्यामुळे लहान माणसासाठी, सामान्य माणसांसाठी काही केलं का ? काम करताना, निर्णय करताना या प्रश्नाकडं दुर्लक्ष करून केलं का ? जातीच्या प्रश्नावर न्याय कुणाला नाकारतोय का, असं घडू नये याची काळजी घेतोय का ? यासंबंधीच्या जुन्या प्रेरणा, मूल्यं समोर ठेवूनच निर्णय करीत राहिलो. स्वतःशी प्रतारणा केली नाही. मन शांत राहिलं याचं मूळ कारण हे आहे.
आता ही पथ्यं पाळण्यात किंवा सत्ते तराहिल्यानंतर जी पथ्यं पाळायची असतात त्यामध्ये किती यशस्वी झालो असं कुणी मला विचारलं तर मी म्हणेन, याचा निर्वाळा लोकांनी द्यायचा आहे. स्वतःबद्दलचं जजमेंट करू नये. स्वतः बोलणंही बरोबर नाही. इतरांनी निर्णय करावा. मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. चुका माहिती आहेत.
एक गोष्ट मात्र खरी की, माणसं मिळवणं, टिकवणं हा स्वभाव बनून गेला. मन मोकळं ठेवायचा प्रयत्न करायचा, कुणाबद्दल विरोधी भावना ठेवायची नाही. अनेकांनी विविध कारणांसाठी विरोध केला, परंतु त्या प्रत्येक वेळी या माणसाचा विरोध आपल्याला कमी करता येणार नाही का, त्याला जिंकता येणार नाही का, आपलंच काही चुकलं असलं पाहिजे, त्यामुळं समोरचा माणूस विरोध करायला उभा ठाकला असावा, आपल्या स्वतःमधे सुधारणा करता येणार नाही का असं आत्मसंशोधन करण्याची मनाला सवय जडून गेली.
सत्ता आणि सत्तेत पाळावयाची पथ्ये याबद्दल आपण बोलत आहोत परंतु अखेरीस, सत्तेमध्ये येणारी माणसं, त्यांच्या प्रेरणा, सामाजिक मूल्यांची जाण, लोकशाहीच्या प्रेरणा, सामाजिक परिवर्तनाची खरीखुरी तळमळ यावर हे सारं पथ्य पाळणं किंवा त्यांना फाटा दिला जाणं हे अवलंबून आहे.
महाराष्ट्रात असताना पंचायती राज्य, जिल्हा परिषदा स्थापन करण्याचा, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा निर्णय केला. शिक्षणप्रसाराचा निर्णय केला. सहकारी चळवळ वृद्धिंगत होऊन समाजाच्या सर्व थरांत, सामान्य जनांपर्यंत, दलितांपर्यंत अस्पृश्यांपर्यंत तिची पाळंमुळं पोहोचावीत आणि सर्व थरांना आर्थिक लोकशाहीचा लाभ मिळावा यासाठी काही निर्णय केले.
विकासाच्या शासनाचं काम जनतेच्या जवळ जाऊन केल्याशिवाय होत नाही. तसं ते व्हावं हा जिल्हा परिषदा स्थापन करण्यामागचा खरा उद्देश. महाराष्ट्रात नवीन काही घडवायचं असा विचार सुरू झाला, प्रयत्न सुरू झाला, त्यावेळच्या चर्चेमध्ये, पंचायती राज्य, हातचं काही शिल्लक ठेवून करू नका, लोकांवर संपूर्ण विश्वास ठेवून करा, लोक विश्वासास पात्र नाहीत अशी भीती ठेवून यासंबंधीचा निर्णय करणं उपयुक्त ठरणार नाही हे आवर्जून सांगावं लागलं. वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी एक समिती स्थापन झाली होती. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची योजना जेव्हा अंतिम टप्प्यापर्यंत आली, अन् त्या वेळी नाईकांशी चर्चा झाल्या त्या वेळी हे सूत्र मी त्यांना सांगितलं. जो अंतिम आराखडा तयार व्हायचा तो 'वर्केबल' होईल याची काळजी घ्यावी लागणार होती. त्याचबरोबर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्यानंतरच्या काळात त्यामध्ये काही दोष निर्माण होतील हे लक्षात ठेवून हे सर्व करावं लागणार होतं. सत्तेची नवी स्थानं निर्माण झाली म्हणजे तेथे काही चुकीच्या गोष्टी घडतात. चुकीची माणसं तिथं येऊन बसतात. सत्तेचं स्थान निर्माण करण्यामागचा उद्देश सोईस्कररीत्या बाजूला ठेवून निर्णय करीत राहतात. असे काही दोष निर्माण झाले का हा विचाराचा, तपासणी करण्याचा प्रश्न आहे. दोष निर्माण झाले असतील तर यंत्रणा राबवून घेण्यासाठी तिथं जी माणसे येतात किंवा आली आहेत, त्यांची सामाजिक, राजकीय मूल्यं तपासावी लागतील. लोकशाहीमध्ये अखेरीस संस्था ही फक्त मदत करू शकते. कामाची जबाबदारी माणसांची असते.