यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व- यशवंतरावांचा राजकीय प्रवास-ch ११

११. भारताच्या राजकीय रंगमंचावरील चारुदत्त (ना. बा. लेले)

भारतीय राजकीय रंगमंचावरील धीरोदात्त नायक श्री. यशवंतरावजी चव्हाण हे आधुनिक 'चारुदत्त' होते.  बव्हंशी त्याच्या समान होते, असे मूल्यांकन जर कोणी १९६२ ते १९८४ या कालखंडाचे सिंहावलोकन करताना करील तर ते विशेष वावगे ठरू नये.  कारण 'मृच्छकटिक' नाटक तल्लीन होऊन पाहणार्‍या 'सर्व श्रोत्यांची सहानुभूती प्राप्‍त करून घेणार्‍या' या धीरोदात्त नायकाला 'यशःप्राप्‍ती मात्र कष्टसाध्य' होत असल्याचे प्रसंग पाहून क्षणभर हवालदिल झालेल्या श्रोत्यांची चारुदत्ताविषयीची आपुलकी व आदर मात्र वृद्धिंगतच होत जातो.  'अयं वसंतसेनाघातकः चारुदत्तः वधस्तंभम् नीयते', असे शब्द कानी पडल्यावर नाटक पाहणार्‍या सामान्य जनांच्या भावना सहजपणे उचंबळून येऊन 'निष्पाप नायक' नाहक बळी पडत असल्याची तीव्र सहानुभूतीची लाट रंगमंदिरातील सर्वच श्रोत्यांच्या मनाची पकड घेते.  अल्पस्वल्प अंतराने वा फरकाने हाच भाव बहुतेक सर्व राजकीय निरीक्षकांच्या ठाची आधुनिक 'चारुदत्त' श्री. चव्हाण यांच्या भारताच्या राजधानीतील सुमारे बावीस वर्षांच्या राजकीय जीवनाचे समालोचन करताना अगदी सहजपणे जागृत झाल्याविना राहात नाही.  नाकयाची 'कष्टसाध्य यशप्राप्‍ती' पाहून शेवटी श्रोत्यांना हायसे वाटत असतानाच नायकाविषयीचा आदर द्विगुणित होत असल्याचा अनुभव झाला तरी या आदराला प्रचंड 'सहानुभूतीची झालर' असल्यागत वातावरण न कळत निर्माण होत जाते.  श्री. यशवंतरावजींच्या दिल्लीतील कारकीर्दीचे पक्षातील भूमिकेवरून समालोचन करतानाही हाच अनुभव उत्कटतेने आल्याविना राहात नाही !

१९६६ च्या जानेवारीत द्वितीय पंतप्रधान श्री. लालबहादूर शास्त्रीजींच्या अचानक निधनानंतर 'पंतप्रधान'पद जेव्हा श्री. ६५शवंतरावजींना हुलकावणी दाखवून इंदिराजींना प्राप्‍त झाले त्या वेळी अथवा १९६९ मधील राष्ट्रपती निवडणूकप्रसंगी श्री. चव्हाणसमर्थित वा पुरस्कृत श्री. नीलम संजीव रेड्डी पराभूत होऊन श्री. वेंकट वराह गिरी विजयी झाले त्या वेळी वर उल्लेख केलेलाच अनुभव सर्वांना आला.  'यशःप्राप्‍ती' सकृद्दर्शनी इंदिराजींना लाभली तरी प्रचंड सहानुभूती व आदर मात्र यशवंतरावजींच्याच पदरी पडला.  १९६६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यशवंतरावांची गणना 'अविवादास्पद व्यक्तिमत्त्व' या श्रेणीत करीत असल्याने (नॉन कॉन्ट्राव्हर्सियल पर्सनॅलिटी) सर्वश्रुत असल्याने बहुतेक सारे संसदसदस्य व पत्रकार यांच्या लेखी तेच पंतप्रधानपदी येणारी अशी अटकळ असताना घडले मात्र अगदी वेगळे व अनपेक्षित !  १९६९ मधील राष्ट्रपति-निवडणूक निमित्ताने जो बनाव घटित झाला त्यामुळे श्री. रेड्डी पराभूत होऊन श्री. गिरींना विजयश्रीने वरिले तरी वरील दोन्ही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रसंगी यशवंतरावजींचे व्यक्तिमत्त्व व राजकीय महत्त्व सामान्यजनांची अपार सहानुभूती लाभल्याने वृद्धिंगतच झाल्याचा अनुभव राजधानीतील राजकीय निरीक्षकांना आला.  अपयशाचा आरोप वा कलंक पदरी पडलेला असूनही धीरोदात्त नायकाचे संदर्भात सहानुभूतीच प्रकट होत राहिल्याचा अनुभव श्री. यशवंतरावजींना आधुनिक 'चारुदत्त' श्रेणी प्राप्‍त करून देणारा असा नाही का ?

यशवंतरावजींच्या मनोरचनेत धीरोदात्तता ओतप्रोत भरलेली असल्याची प्रचीती ते संरक्षणमंत्रिपदी वा गृहमंत्रिपदी असताना अनेक प्रसंगी अनेकांना येऊन त्यांच्याविषयीच्या अपेक्षा दिल्ली दरबारात वाढतच गेल्या.  भारत-चीन संघर्षमयीची संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांची काळीकुट्ट कारकीर्द संपुष्टात येऊन यशवंतरावजी संरक्षणमंत्रिपदी आरूढ होण्याचे सुमारास 'हिंदुस्थान समाचार' वृत्तसंस्थेचा वार्ताहर या नात्याने लेह विमानतळाचे आसमंतात थेट चुसूल वा डुंगटीपर्यंत सुमारे चौदा हजार फूट उंचीवर डोळ्यांत तेल घालून प्रहरी म्हणून सतत वावरणार्‍या व प्रत्यक्ष संघर्षसमयी 'महार रेजिमेंट'चे पाईक बनून ज्या जवानांनी अतुलनीय शौय प्रकट करून आक्रमक चिनी सेनेला चातुर्याने खडे चारले होते अशा मंडळींना जेव्हा सुमारे चार दिवस भेटलो होतो त्या वेळी अनेक सेनाधिकार्‍यांनी मोठ्या अपेक्षेने व आशेने मला एकान्तात गाठून संरक्षण आघाडीवरील काही महत्त्वपूर्ण पैलूंच्या संदर्भात नव्या संरक्षणमंत्र्यांच्या कानी काही 'विशेष माहिती' घालण्यासाठी निवेदने केली.