सत्तेत पोहोचल्यावर, उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. याचं एक महत्त्वाचं कारण आहे. प्रशासक हा शिस्तीचा असावा, पण हृदयशून्य नसावा हे यशवंतरावांनी कृतीनं दाखविलं. सत्तेत श्रेष्ठ ठिकाणी असतानाही त्यांनी समाजातील सामान्यांनाही थारा दिला. एकदा थारा दिल्यावर त्याची अवहेलना केली नाही. गुण आणि अवगुण पाहून त्यांच्यासाठी कामाची, कार्याची योजना केली. जे त्यांच्या सहवासात आले आणि कामाला वाहून घेतले ते त्या त्या क्षेत्रात पावन झाले, विधायक कार्य करू लागले. यापैकी कितीतरी असे असतील की त्यांना सहवासात येण्याचा आणि मार्गदर्शन मिळण्याचा योग प्राप्त झाला नसता तर त्यांचं आयुष्य कदाचित कायमचं बरबाद होण्याची शक्यता होती. यशवंतरावांनी महाराष्ट्रात आणि देशात ज्या अनेकांना संधी दिली, मार्गदर्शन केलं त्यांच्यातील कित्येकजण पुढच्या काळात लाखो रुपयांच्या, व्यापारी किंवा औद्योगिक उलाढाली करण्यात तरबेज बनले. काहींनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्यात, उत्पादन वाढविण्यात उच्चांक प्रस्थापित केले. कोणी सहकारमहर्षी, उद्योगमहर्षी, कृषि-पंडित बनले. यशवंतरावांनी या सर्वांमध्ये चढाओढ लावली ती अधिक चांगलं काम कोण करतो याची ! त्यांचं बोट धरून जे राजकारणात अवतरले त्यांच्यातील अनेकजण राज्याच्या किंवा देशाच्या सत्तास्थानापर्यंत पोहोचले.
विद्वान, बुद्धिवान यांना साहाय्य करण्यास सारेच सरसावतात. परंतु सारा समाज हा बुद्धिमानांचा असत नाही. वाल्मिकीची पूजा करताना वाल्याचा वाल्मिकी कसा होईल आणि सारा समाज सुखी कसा हाईल याकडेच जो लोकनेता असेल त्याला लक्ष द्यायचं असतं. हे कार्य सर्वाधिक महत्त्वाचं असतं. परंतु हे घडायचं तर लोकनेत्याच्या अंगी योजकता हा गुण असावा लागतो.
योजकता हा यशवंतरावांचा सर्वांत मोठा गुण होता. ते नेते बनताच अनेक माणसं जवळ आली. यामध्ये हौसे, गवसे, नवसे असणं स्वाभाविकच होतं. टीकाकारांनी त्याचं वर्णन शंभुमेळा असं केलं. यशवंतरावांनी ही टीका सहन केली. सामान्यांना जवळ करण्यातील हेतू त्यांना विकासाच्या, समृद्धीच्या कामात संधी प्राप्त करून देणं, ग्रामीण, भागाचा, तेथील कृषिउद्योगाचा कायापालट घडविणं हा होता. अर्थातच हे नागरी भागातील टीकाकारांच्या कल्पनेच्या पलीकडील होतं. राजकीय, पक्षीय यशासाठी यशवंतराव सामान्यांना जवळ करीत आहेत असं सोईस्कर उत्तर नागर टीकाकार काढील राहिले. परंतु यशवंतरावांच्या स्वभावाची घडण आणि वृत्ती, लोकांकडे पाहण्याचा, त्यांना समजून घेण्याचा दृष्टिकोण ज्यांना समजला त्यांनाच या कोड्याचं उत्तर सापडण्याची शक्यता.
म. फुले, शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. आंबेडकर यांच्यापासून स्फूर्ती घेतलेले यशवंतराव सामान्यांपासून दूर राहणे केवळ अशक्य. कारण या सर्व विचारवंतांनी सामान्यांच्या जीवनाला उजाळा देण्याचा संदेशच दिला आहे. डॉ. आंबेडकरांनी तर पददलित आणि छळवाद सोसणार्या समाजात स्वाभिमानाची ज्योत पेटविली. माणुसकीचे हक्क संपादन करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले, त्यांची मने तयार केली. त्यांच्या या कार्याबद्दल यशवंतरावांना आदर असे. त्या आदराच्या पोटी त्यांनी महार वतनाचा कायदा रद्द केला. नवबौद्धांना न्याय देण्यासाठी ते सरसावले. त्यासाठी त्यांनी केंद्र किंवा इतर प्रदेश राज्ये यांचया प्रतिक्रियांची तमा बाळगली नाही. म. फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना समोर ठेवूनच महाराष्ट्रात असताना, त्यांनी समाजातील सर्व थरांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. औद्योगिक वसाहती निर्माण केल्या. साहित्यिक, कलाकार, चित्रपट व्यावसायिक यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
या संदर्भातही त्यांनी टीका सहन केली. समाजपरिवर्तनाचा, लोकांना शिक्षित बनवून जातिपातीच्या, उच्चनीचतेच्या बंधनातून त्यांना बाहेर काढणे याचा ध्यास त्यांनी घेतलेला असल्यानं टीकेमुळं ते विचलित होणं शक्य नव्हतं. मिळतं घेऊन पुढं जाण्याचा स्वभाव बनलेला असल्यानं प्रमुख ध्येयावर लक्ष केंद्रित करून ते एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आणि त्याची अंमलबजावणी करण्यात गुंतून राहिले. आपल्या ध्येयपूर्तीसाठी मुद्दाम कोणाला दुःख द्यावे, कोणाचा अवमान करावा हे त्यांच्या स्वभावात नव्हते. कोणी अवमान केला तरी त्यांनी त्याच्याशी पराकोटीचे शत्रुत्व केले नाही. कटुता न ठेवणं आणि कटुता ठेवणारं वातावरण स्वतः निर्माण न करणं, त्याचबरोबर कटुता नसणारं वातावरण वाढविणं हा स्वभावधर्म बनला होता.