यशवंतरावांचा जन्म सामान्य कुटुंबात झाला आणि गरिबीत, प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत राहून त्यांच्या मातोश्रींनी त्यांचे लालनपालन केलेलं असलं तरी यशवंतराव जन्मतःच काही गुण घेऊन आलेले असावेत. नंतरच्या काळात विद्यालयातील, महाविद्यालयातील अभ्यास, वाचन, मनन-चिंतन सतत सुरू राहिल्यानं जन्मतः असलेल्या गुणांवर या सार्यांचे संस्कार होत राहिले आणि मूळ गुण अधिक तेजस्वी, कार्यक्षम ठरण्यास मदत झाली. ते मोठे हुषार विद्यार्थी म्हणून गणले गेले नव्हते. परंतु विविध विषयांच्या वाचनाचे त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले, ज्ञान हस्तगत केलं. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांना ज्ञातेपण मिळविता आलं. या ज्ञातेपणाची सोबत त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत कायम राखिली.
एकाहत्तर वर्षांच्या आयुष्यातील पन्नास-पंचावन्न वर्षांचा काळ त्यांनी राजकारणावर, राजकीय जीवनावर स्वार होऊन काढला. याचं कारण त्यांचं सखोल ज्ञातेपण. राजकारणात असले तरी त्याबाहेरच्या लोकांचे विचार ऐकण्यात आणि ते पचविण्यात कधी कंटाळा केला नाही. विद्वानांच्या संगतीची आवड तर होतीच पण त्याचबरोबर सामान्य, अडाणी, गावरानी माणसांची आवड त्यांनी सोडली नव्हती. गरिबांकडं अधिक लक्ष द्यायचं हा त्यांचा स्वभावच होता. सामान्यांची सुखदुःखं, त्यांच्या अडचणी, त्यांच्या भावना, वासना, यांची त्यांना ते स्वतः त्या अनुभवांतून गेलेले असल्यानं जाणीव होती. या सार्यांकडे, मग तो विद्वान असो वा अडाणी, मानवतेच्या भूमिकेतून पाहात आणि बोलत. त्यामुळं त्यांच्या बोलण्याला वास्तवतेचं अधिष्ठान प्राप्त झालेलं असे. ती भाषा अंतःकरणाचा ठाव घेत असे. ऐकणारा त्यांचा होऊन जात असे. लोकांवर निष्कपट, मोकळेपणानं प्रेम करायला शिकणं हे समाजावर, राष्ट्रावर प्रेम करायला शिकण्याची पहिली पायरी आहे असा त्यांचा आणखी एक सिद्धान्त !
माणसाला प्रेमानं आपल्याकडं वळविण्याची कला त्यांनी आत्मसात् केलेली होती. निष्कपअ प्रेम कसं करावं याचं दर्शन ते स्वतःच्या वागणुकीतून घडवीत. अडाणी शेतकरी, कामगार, विद्वान शास्त्री-पंडित, सनातनी, किंवा आधुनिक सुधारक, इंग्रजी शिकलेले न शिकलेले, तरुण-तरुणी, महिला, कलावंत, व्यापारी, नोकरदार, डॉक्टर, इंजिनिअर, राजकारणी, उद्योगपती, मुत्सद्दी, अर्थतज्ज्ञ, समाजधुरीण, साहित्यिक, कवी-कुणाशीही बोलायचं असो त्यांच्या त्यांच्या भाषेत ते बोलत असत. विचारविनिमय, चर्चा करीत असत. त्यामुळे त्यांचं म्हणणं प्रत्येकजण प्रसन्नपणानं ऐकत असे. राष्ट्रप्रेमाचं, देशभक्तीचं, देशाच्या विकासाचं, समृद्धीचं, कार्यकर्त्यांच्या वागणुकीचं स्पष्टीकरण करताना त्यांच्या वाणीला स्फुरण चढत असे. त्यांचं भाषण तसं सहजमधुर होतं. उत्तम उत्तम दृष्टान्त ते सहज बोलून जात. भाषण सहजमधुर असलं तरी त्यातून व्यासंगाचा प्रत्यय येत असे. सहजपणा आणि अर्थवत्ता हे त्यांच्या वाणीचे मुख्य धर्म होत. उत्तम वक्तृत्व, उत्कृष्ट रसिकता आणि तर्कनिष्ठ बुद्धी यामुळे कोणतेही प्रमेय नवीन तर्हेनं, सोप्या शब्दांत मांडणं त्यांना साध्य झालं होतं. त्यांचं भाषण ऐकून झाल्यावर त्याचा सुगंध नेहमीच मागे दरवळत राहिलेला असायचा. या भाषणाचा आणखी एक विशेष असा की, एखाद्या वाह्याताला खडसावून ताळ्यावर आणण्याचं सामर्थ्यही प्रसंगी प्रचीतीला यायचं.
एखाद्याला खडसावायचा असलं तरी मुखातून कधी अपशब्द बाहेर पडायचा नाही. सगळं कसं संयमशील ! स्वतःचा बडेजाव कधी सांगितला नाही. राग, लोभ, मद, मत्सर त्यांनी गिळला होता असं नव्हे. पण संयमानं या विकारांना इष्ट असं वळण त्यांनी लावलं असलं पाहिजे. मत्सरानं, द्वेषानं पेटले आहेत असं त्यांच्या जिभेनं कधी दाखवलं नाही. असं नसतं तर दुसर्याची मनसोक्त प्रशंसा त्यांच्या वाणीतून प्रकट होणं अशक्य ठरलं असतं. एखाद्यानं हलकं-फुलकं काम केलेलं असलं तरी त्याची ते मुक्तपणे प्रशंसा करीत. यातून त्याला अधिक काम करण्याची प्रेरणा सहजगत्या मिळे. उत्तेजन देण्याची वृत्ती राष्ट्राभिमानी, निरहंकारी माणसाच्या ठिकाणीच असू शकते.
स्वातंत्र्योत्तर काळात यशवंतराव सत्तेच्या स्थानी आरूढ झाले, ज्येष्ठ-श्रेष्ठ सत्ताधारी बनले; परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात, तुरुंगात असताना किंवा बाहेर समाजात मिसळताना, स्वातंत्र्य कशासाठी, याचं सखोल चिंतन करून कामाची दिशा निश्चित केली होती. त्यामुळे सत्तेच्या ठिकाणी पोहोचताच सामाजिक परिवर्तन, महाराष्ट्राची आणि संपूर्ण देशाची सर्वांगीण प्रगती आणि त्यासाठी समाजातील सर्व थरांतील लोकांना प्रोत्साहन देऊन शेकडो-हजारो लोकांना कामाची संधी प्राप्त करून देणे आणि विकासाच्या कामात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग राहील यासाठी जागरूक राहणं या ध्येयाची बांधिलकी तयांनी स्वीकारली. सत्याग्रही समाजवादी आणि प्रगतिशील लोकशाहीवादी असं त्यांच्या वैचारिक जडणघडणीचे यथार्थ स्वरूप होतं. क्रियावान, कर्तृत्वपूर्ण आंदोलकांचं नेतृत्व त्यांनी केलं. म. जोतिबा फुले, शाहू महाराज, लो. टिळक, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची स्फूर्तिस्थाने होती. विचारांचा पक्केपणा आणि धडाडीने ते व्यक्त करण्याचा बाणा ही त्यांची दोन वैशिष्ट्ये त्या स्फूर्तीतूनच निर्माण झाली असली पाहिजेत.