यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३५-१

साहेबांची प्रकृती ठीक नाही हे समजल्यापासून त्या रात्री मनात हीच उजळणी सुरू राहिली.  वाटलं ताबडतोब दिल्लीत पोहोचावं.  मायेचं तसं तिथं कुणी असणं आवश्यकच होतं.  साहेबांच्या मनाला त्या यातना होत असणारच.  परंतु निवडणुकीचा उमेदवारी अर्ज घेऊन येण्याचा निरोप होता.  मन द्विधा झालं.  त्या अवस्थेत दि. २३ नोव्हेंबरच्या सकाळी सातार्‍याला परतलो.  जिल्हाधिकार्‍यांना भेटून उमेदवारी अर्ज हस्तगत केला.  आवश्यक त्या तांत्रिक गोष्टी पूर्ण करून घेतल्या अन् त्याच पावली पुण्यास येऊन सायंकाळी दिल्लीकडे निघणारं विमान गाठलं.  रात्री उशिरा इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलो आणि साहेबांना पाहिलं मात्र, मनाला चरका बसला.  उपचारासंबंधी चौकशी केली तेव्हा शिकाऊ डॉक्टर उपचार करीत आहेत असे आढळले.  तेथे तज्ज्ञ डॉक्टर कोणी उपस्थित नव्हते.

रात्री एक वाजण्याच्या सुमारास साहेबांना सपाटून थंडी वाजून आली.  ते काही हिवतापाने आजारी नव्हते.  आमची धावपळ उडाली.  डॉक्टरांना बोलवावे म्हणून गेलो तर तेथे एक शिकाऊ डॉक्टर होते.  त्यांना प्रकृतीविषयी बोललो आणि ताबडतोब कोणातरी तज्ज्ञाला बोलवा असे सुचविले.  परंतु ते शिकाऊ डॉक्टर थंड होते.  ते कोणाला तरी फोन करतील, बोलावतील, सल्ला घेतील या आशेने थोडे थांबलो.  पण काही हालचाल दिसेना.  तेव्हा जरा चढ्या आवाजात त्यांना पुन्हा विनंती केली.  त्यावर त्या डॉक्टराने जे ऐकवले त्यामुळे तर आम्ही सर्दच झालो.  तो म्हणाला, ''चव्हाणसाहेब व्ही.आय.पी. आहेत, ठाऊक आहे.  पंतप्रधान इंदिरा गांधी जखमी होऊन येथे आल्या तरी सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर येथे पोहोचण्यात पंधरा-वीस मिनिटे गेली.  तुम्ही उगीच का आरडाओरडा करताय ?  व्ही. आय.पी. असले म्हणून काय झाले ?''

डॉक्टरांचा कमालीचा निष्काळजीपणा घालविणार कसा ?  आम्ही तर अस्वस्थ झालो होतो.  त्या डॉक्टरांशी वाद घालण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मग आम्ही, चव्हाणसाहेबांच्या फॅमिली डॉक्टरशी फोनवरून संपर्क साधला.  वस्तुस्थिती सांगितली.  इथे कोणी तज्ज्ञ नाही आणि उपचार ताबडतोबीने होण्याची आवश्यकताही निवेदन केली.

त्यांनी बहुधा तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला असावा.  त्यामुळे हालचाली सुरू झाल्या.  साहेबांना एक इंजेक्शन देण्यात आले.  तासाभराने थंडीचा जोर ओसरला.  अर्ध्या-पाऊण तासानंतर साहेब आमच्याशी बोलले.

इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांची बेफिकिरी, यामुळे आम्ही मंडळी कमालीचे धास्तावलो.  बाहेरचे कोणी तज्ज्ञ डॉक्टर आणून उपचार करावेत तर त्याला नियमांची आडकाठी.  शिकाऊ डॉक्टर यायचे-जायचे, नर्सची ये-जा व्हायची पण हे सारे वरवरचे सुरू होते.  नेमकेपणाने इलाज केला जात आहे किंवा काय याबाबतीत आम्ही अनभिज्ञ होतो  विचारणा करावी तर दुरुत्तरेच ऐकावी लागत.  दि. २४ नोव्हेंबरचा दिवस असाच अस्वस्थतेत गेला.  परंतु त्या दिवशी श्री. रसिकभाई, साहेबांचे पुतणे अशोक आदी आम्ही मंडळींनी मनोमन असा निर्णय केला की, साहेबांना इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये उपचारासाठी ठेवण्यात अर्थ नाही.  त्यांना तातडीने मुंबईला न्यावे आणि मुंबईत तज्ज्ञांकडून उपचार सुरू करावेत.  दि. २४ च्या रात्री साहेबांशी बोललो आणि आम्ही तुम्हास मुंबईला नेण्याची तयारी करीत आहोत असे सांगितले.  साहेबांची अनुमती गृहीत धरून रसिकभाई पहाटेच हॉस्पिटलमध्ये आले.  मुख्यमंत्री श्री. वसंतदादा पाटील हे त्या वेळी नवी दिल्ली येथे होते.  दि.२५ च्या सकाळच्या विमानाने ते मुंबईस परत जाणार होते.  लोकसभेच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी निश्चित करून ते परत चालले होते.  कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसांचाच अवधी उरला होता.  मुंबईस जाण्यास निघण्यापूर्वी, साहेबांना भेटावे, प्रकृती पाहावी म्हणून पहाटेच ते इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये आले.  त्यांच्यासमवेत श्रीमती शलिनीताई आणि श्री. मुरली देवरा होते.

साहेबांची प्रकृती आणि उपचारातील हलगर्जीपणा, तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपस्थिती हे सर्व वसंतदादांना सांगितले आणि उपचारासाठी मुंबईस नेण्याची निकड त्यांच्या नजरेस आणली.  दादांनाही ते योग्य वाटले.  परंतु त्यांनी सुचविले की, पुढच्या दोन-अडीच तासांत मी मुंबईत पोहोचेन.  तेथून विमान पाठविण्याची व्यवस्था करतो.  त्याचप्रमाणे मुंबईतल्या तज्ज्ञ डॉक्टरांनाही पाठवितो.  ते तेथे प्रकृती पाहतील.  मुंबईपर्यंत साहेब व्यवस्थित पोहोचतील याची ते काळजी घेतील.  मुंबईपर्यंत डॉक्टर त्यांच्याबरोबर असलेले बरे.  मुरली देवरा यांनीही त्यास दुजोरा दिला.  साहेबांचा निरोप घेऊन दादा तातडीने मुंबईस रवाना झाले.

इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये आवश्यक ती काळजी घेतली जात नाही म्हणून साहेबांना मुंबईला नेण्यात येणार असल्याचे श्री. एन. के. पी. साळवे यांना समजताच ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांना भेटून सर्व सांगितले.  साहेब आजारी आहेत, इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे याची श्री. राजीव गांधींना माहिती नव्हती.  एक-दोन दिवसांतच या सार्‍या घटना झपाट्याने घडल्या होत्या.  परंतु श्री. साळवे यांच्याकडून जेव्हा त्यांना साहेबांना मुंबईला हलविण्यात येणार असल्याचे समजले तेव्हा तेही अस्वस्थ बनले.