यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३४-३

यशवंतराव स्वच्छतेचे फार भोत्तेफ् होते.  त्यांना थोडासाही मळका कपडा पाहिला की चीड यायची.  वेणूताईंनीही या गुणाची जोपासना केली.  वेणूताईंचे स्वयंपाकभर, भांडी-कुंडी, देवघर लखलख चमकायचे.  यासाठी त्या स्वतः झटायच्या.  वेणूताई व यशवंतराव दोघेही देवावर नितांत श्रद्धा ठेवणारे होते.  आंघोळ झाल्यानंतर देवघरात जाऊन देवाला व साईबाबांच्या मूर्तीला नमस्कार केल्याशिवाय यशवंतराव ऑफिसला जायचे कपडे घालत नसत.  वेणूताईंच्या देव्हार्‍यात जवळपास सर्व चांदीचे देव होते, आणि देवघरात सर्व लहानथोर मृत नातेवाईक व जिव्हाळ्याच्या लोकांचे फोटो होते.

कर्तृत्वाच्या मोठेपणाला मनाच्या मोठेपणाची झालर लागली तर व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसते.  यशवंतराव व वेणूताई यांच्या मनाच्या मोठेपणाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.  यशवंतराव मुख्यमंत्री असताना त्यांच्या घरी १० दिवस गणपती उत्सव असायचा.  त्या वेळी अनेक प्रसिद्ध गायक, कलाकार आदींची हजेरी तिथे लागावयाची.  एकदा संगीत कार्यक्रमाच्या मध्यंतरात कॉफीपानाचा कार्यक्रम असताना एका चपराश्याच्या हातून चुकीने यशवंतरावांच्या नातेवाइकाच्या अंगावर कॉफी सांडली.  त्याने चारचौघांत अपशब्द बोलून त्याचा अपमान केला.  त्यानंतर तो चपराशी दोन-तीन दिवस कामावर आला नाही.  यशवंतरावांना ही घटना कळली तेव्हा त्यांनी त्याला बोलावून स्वतः माफी मागितली व सर्व विसरून जाण्यास सांगितले.  हाच गुण वेणूताईंमध्ये होता.  सकाळी ५ वाजता रात्रपाळीच्या लोकांना चहा देण्यापासून रात्री १० वाजता रात्रपाळीच्या लोकांना चहा देण्यापर्यंत सर्वांची काळजी घेण्यात येत असे.  वेणूताई स्वतः अधूनमधून सर्वांना चहापाणी, जेवळ मिळते की नाही हे पाहात असत.  चव्हाणांच्या दारात असलेला नवखा पण कधी उपाशी राहिला असे झाले नाही.  परंतु कधी कधी नोकर लोक त्यांच्याशी झालेल्या भांडणामुळे कोणाचा चहा बंद करायचे किंवा जेवण द्यायचे नाहीत.  ही गोष्ट वेणूताईंचे लक्ष असल्यामुळे त्यांना कळत असे.  यात आपल्या नोकराचा कुठे तरी दोष आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असायची.  त्या ते कारण शोधायच्या व नंतर त्या व्यक्तीला स्वतः चहा किंवा जेवण नेऊन द्यायच्या.  त्याचबरोबर नोकरातर्फे माफी मागायच्या.  मंत्री किंवा मंत्र्याची पत्‍नी यांनी माफी मागणे आजच्या जगात आश्चर्यकारकच !

वेणूताईंची यशवंतरावांचया आवडीनिवडी, स्वभाव याला जोड मिळेल अशी वागणूक होती.  तशीच वागणूक यशवंतराव वेणूताईंच्या स्वभावाला जुळेल अशीच ठेवण्याचा प्रयत्‍न करीत होते.  वेणूताईंच्या त्यागाची आणि तपश्चर्येची त्यांना पूर्ण कल्पना होती.  त्यांचे मन कधीही दुखवणार नाही याची ते काळजी घेत.  ते एकदा म्हणाले होते, आपल्या पत्‍नीचा आपण आदर केला नाही, चारचौघांत किंवा नोकरवर्गासमोर तिचा दोनचार अपशब्द बोलून आपमान केला तर दुसरे तिच्याबद्दल आदर ठेवतील ही भावना ठेवणे चुकीचे होईल.  यशवंतराव कितीही रागावले तरी त्यांच्या तोंडून कधीही अपशब्द निघाले नाहीत.

सुखी कौटुंबिक जीवनाकरिता सर्वांत कशाची जर आवश्यकता असेल तर ती सामंजस्याची.  भांड्याला भांडं लागून आवाज होतो हे खरे आहे.  परंतु ही भांडी एका अंतरावर असली तर तो आवाज होणार नाही.  वेणूताई यशवंतराव असे दूर होते.  पण आचरणाने स्वभावाने एक होते.  एकमेकांचा स्वभाव पूर्ण ओळखून त्यांनी पावले टाकली.  प्रत्येक पाऊल समजून उमजून टाकले.  वेणूताईंनी राजकारणात सरकारी कामात यशवंतरावांचे वर्चस्व मान्य करून त्यात हस्तक्षेप केला नाही तर यशवंतरावांनी संसारात वेणूताईंचे वर्चस्व मानून ढवळाढवळ केली नाही.  दोघांनाही एकमेकांबद्दल आदर होता.  एकमेकांपासून दोघांनीही कधीच काही लपविले नाही.  त्याची आवश्यकता त्यांना भासली नाही.  दोघेही एकमेकांच्या शरीराबाहेरील प्राण होते.  एक फूल होते तर दुसरा त्याचा सुगंध.  म्हणूनच यशवंतरावांचे कौटुंबिक जीवन अधूनमधून येणार्‍या वादळातही सुखाचे व समाधानाचे राहिले.  दोघेही एवढे धीरोदात्त होते की ते वादळाने डगमगले नाहीत.  देशभक्ताचा संसार करण्याचे ध्येय घेऊन वेणूताई आल्या पण नियतीनं त्यांचे हे ध्येय पूर्ण होऊ दिले नाही.  संसाराच्या शेवटच्या अध्यायात त्या भरल्या घरातून भरल्या कपाळी निघून गेल्या.  फूल गळून पडले होते.  त्याचा सुगंध घरात किती काळ दरवळणार ?  फुलाबरोबर सुगंधही जाणार.  यशवंतरावांना एकाकीपणा जाणवू लागला.  जगण्यासाठी जगायचे एवढेच त्यांनी ठरविले.  सुगंध आपल्या फुलाचा शोध घेत राहिला.  वियोगामुळे अश्रूच्या गंगा सतत वाहू लागल्या आणि लवकरच हा सुगंध आपल्या फुलाला मिळण्यासाठी अचानक निघुन गेला.