यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३५

३५. शेवटचा प्रवास (शामराव पवार)

मध्यरात्र उलटली होती.  दिल्लीत इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये साहेबांचे - यशवंतरावांचे आम्ही नातेवाईक त्यांच्या खोलीत बसून होतो.  साहेबांची प्रकृती बरी नाही असा निरोप मिळाल्यानं आम्ही दिल्लीस धाव घेतली होती.

२३ नोव्हेंबर १९८४ च्या संध्याकाळी मी दिल्लीत पोहोचलो.  साहेबांचा पुतण्या अशोक तिथं पोहोचला होता.  दि. २२ ला दुपारपासून साहेबांच्या प्रकृतीत बिघाड झाला.  किडनी काम करेनाशी झाली.  रक्तदाब वरखाली होत राहिला.  मधून मधून वांत्या होत होत्या.  त्यांचे नेहमीचे दिल्लीचे फॅमिली डॉक्टर डॉ. करोली आणि डॉ. विग यांना निरोप गेले.  त्यांनी प्रकृती तपासली.  उपाययोजना सुरू झाली, परंतु प्रकृतीत चढ-उतार होत राहिला.  डॉ. विग हे भारतीय लष्करातील तज्ज्ञ डॉक्टर.  आता ते निवृत्त झाले होते, परंतु साहेबांचा त्यांचा जिव्हाळा कायम होता.  सौ. मामी-सौ. वेणूताई आणि साहेब यांचे हे दोघे फॅमिली डॉक्टर.  डॉ. विग यांनी दि. २२ च्या रात्री प्रकृती तपासली तेव्हा काही शास्त्रशुद्ध तपासणी आणि उपचार करण्याची आवश्यकता असल्याचा अभिप्राय दिला.  त्यासाठी इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन सर्व तपासण्या कराव्यात असा सल्ला दिला.  डॉ. विग हे या संस्थेचे पूर्वी डीन होते.  या संस्थेमध्ये रुग्णाला तपासण्यासाठी अद्ययावत साधनसामग्री असल्याची त्यांना माहिती होती.

डॉ. विग यांच्या सल्ल्यानुसार साहेबांना त्याच रात्री इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये नेण्यात आले.  तेथे त्या वेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी उचार सुरू केले.  त्याच रात्री साहेबांचे मित्र, श्री. रसिकभाई शहा यांनी दिल्ली येथून साहेबांचे पुणे येथे असणारे दुसरे पुतणे दादा यांना फोन करून साहेबांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असल्याचे सांगितले.  श्री. रसिकभाई मुंबईत असताना श्री. एन. के. पी. साळवे यांनी त्यांना साहेबांची प्रकृती बरी नाही असे फोनवरून सांगितल्याने ते तातडीने दिल्लीत पोहोचले होते.  निवडणुकीची धामधूम सुरू झाली होती.  दि. २६ नोव्हेंबर या दिवशी सातारा जिल्हाधिकारी कचेरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा साहेबांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आलेला होता.  त्यानिमित्ताने सातारा येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावाही आयोजित करण्यात येणार होता.  या संबंधात चर्चा करण्यासाठी दि. २१-२२ च्या दरम्यान मी मुंबईस यावे असेही ठरले होते.  साहेबांनीच तसे सुचविले होते.  कारण मुंबई-पुणेमार्गे सातारा येथे पोहोचावयाचे असा साहेबांचा कार्यक्रम निश्चित झाला होता.  

साहेबांच्या प्रकृतीत अचानक बिघाड निर्माण झाल्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार श्री. रसिकभाईंनी माझ्यासाठी निरोप दिला की, उमेदवारी अर्ज घेऊन तातडीने दिल्लीस पोहोचावे.  मुंबईला जाण्यासाठी कराड येथून निघून मी पुणे येथे थांबलो होतो.  साहेबांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे आणि उमेदवारी अर्ज घेऊन दिल्लीस बोलाविले आहे हा निरोप दादांनी रात्री लगेच माझ्यापर्यंत पोहोचवला.

दि. २२ नोव्हेंबरची उर्वरित रात्र द्विधा मनःस्थितीत घालवावी लागली.  साहेबांना हॉस्पिटलमध्ये नेण्याइतपत प्रकृती बिघडली असल्याचे समजल्यापासून मन कमालीचे बेचैन बनले.  सौ. मामींच्या- वेणूताईंच्या निघून जाण्याच्या धक्क्यातून साहेब सावरले नव्हते.  त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरू राहिले असले तरी मनाची बेचैनी कमी झालेली नव्हती.  समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत होते, भाषणांतून विचार व्यक्त करीत होते, कुटुंबियांशी आणि भेटीला येणारांशी सल्लामसलत करीत होते, परंतु या सर्वांमध्ये उत्साह असा क्वचितच दिसावयाचा.  किंबहुना उत्साह असा नव्हताच.  त्यांच्या मनावरील प्रचंड ताण चेहर्‍यावर दृग्गोचर होत होता.  आला दिवस गेला असं सुरू असल्याचं जाणवत होतं.

मी माझ्या लहानपणापासून साहेबांच्या आणि आक्कांच्या-त्यांच्या मातोश्रींच्या छायेत वाढलो.  घरातल्या, कुटुंबातल्या प्रत्येक लहान-मोठ्या, सुखाच्या-दुःखाच्या घटनेत त्यांचा बनून राहिलो.  सुखाचे दिवस पाहिले अन् दुःखाचे उन्हाळे अंगावर काढले.  यापूर्वीही साहेबांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता.  तातडीने शस्त्रक्रिया करण्यापर्यंत दुखणे विकोपाला पोहोचले होते.  त्यातून ते सुखरूप सावरले आणि त्यांचे धामधुमीचे राजकीय जीवन सुरू झाल्याचा सुखद अनुभव घेतला होता.  साहेबांचं बालपण, लहानपण, तरुणपण कष्टात आणि परिस्थितीची आव्हानं स्वीकारण्यात गेलेलं असलं तरी त्यांच्या महत्त्वाकांक्षी मनानं एक वेगळीच उभारी धरलेली असल्याचं पावलोपावली जाणवत असे.  स्वतःच्या किंवा पत्‍नीच्या प्रकृतीची आणि कौटुंबिक स्वरूपाची संकटं निर्माण झाली तरी ते कधी सटपटले नाहीत.  स्वतःला धीर दिला आणि इतरांना आधार दिला.  परंतु आताचं चित्र वेगळं निर्माण झालं होतं.  सत्तरी उलटलेलं वय.  ज्या वयात कौटुंबिक आधाराची नितांत गरज, तो आधार संपुष्टात आलेला होता.  कौटुंबिक जीवनच उदध्वस्त बनलं होतं.  कशासाठी, कोणासाठी जगायचं असं ते अलीकडे वर्षभरात बोलू लागले होते.  त्यांच्याकडं पाहिलं म्हणजे ते विचारमग्न आहेत असं दिसायचं, वाटायचं, पण मन विचारानं भरलेलं नव्हतं; चिंतेनं, मानसिक कष्टानं ग्रासलं होतं.  एकाकीपणाचा कमालीचा ताण दरदिनी वाढत राहिला होता.  खोलीमध्ये एकटे बसलेले असले म्हणजे हा ताण डोळ्यांवाटे बाहेर पडायचा.  हे सारे मी जवळून पाहात होतो.  काळ हेच त्यावर औषध असं समजून दिवस ढकलावे लागले.  जसजसा काळ जाईल तसे ते सावरतील अशी आशा धरून होतो.