३०. ग्रंथवाचन हा नित्यनेम (राम खांडेकर)
यशवंतरावांनी आपल्यातील अनेक गुणांबरोबर साहित्यिक गुणांची जोपासना केली. ते गुण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. साहित्य व साहित्यिकांचा सहवास हा त्यांच्या आयुष्यातील मोठा 'विरंगुळा' होता. यशवंतरावांवरील जबाबदारीबरोबरच वाढत गेला तो साहित्य-सहवास.
यशवंतरावांना वाचण्याची इतकी आवड निर्माण झाली की रोज १२ ते १५ तास सतत काम केल्यानंतर तास-दीड तास तरी वाचन केल्याशिवाय ते झोपत नसत. कामाचा शीण घालविण्याचे त्यांचे हे फार महत्त्वाचे साधन होते. यशवंतरावांना दोन गोष्टींची फार चीड होती. एक-ते सरकारी काम करण्यास बसले असताना कोणी अडथळा आणला तर व दुसरे वाचन चालू असताना कोणी आले तर.
साधारणतः ते रोज रात्री जेवणानंतर ९-३० च्या सुमारास सरकारी कागद पाहून झाल्यानंतर ते सर्व कागद व्यवस्थित बंद करून नंतर ते पुस्तक हातात घेत. अर्था घड्याळाकडे लक्ष न देता त्यांचे वाचन चालू असे. डोळे थकले म्हणजेच वाचन बंद करीत. हा कालावधी कधी तास-दीड तास, तर कधी त्यापेक्षा जास्त असे. दिवसाही जशी सवड मिळेल तसे अधूनमधून त्यांचे वाचन चालू असे. पण कमी.
यशवंरावांची वाचनाची शैली मात्र वेगळीच होती. ते एकाच वेळी पाच-सहा पुस्तके हाती घ्यायचे व प्रत्येकातील काही पाने वाचायचे. प्रवासात वाचण्याची पुस्तके व मासिक निराळी असायची. दिल्लीत आल्यानंतर त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीप्रमाणे पुस्तकांचे विषयही अनेक होत गेले. दर महिन्यात ५-२५ पुस्तके तरी त्यांच्या संग्रही यायची. पुस्तकांची निवड ते बारकाईने करीत. दैनिके, साप्ताहिके, मासिके यांतील पुस्तकांची यादी व परीक्षणे वाचून ती पुस्तके ते त्यांच्या पत्नी सौ. वेणूताईंकडून मागवीत. दिल्लीत जर पुस्तके मिळाली नाहीत तर मुंबईहून मागवत. न्यूज वीक व टाइम ही परदेशी मासिके त्यांना फार उपयुक्त वाटायची.
पुस्तके ते मनन करून वाचीत असत. त्यांनी वाचलेल्या पुस्तकातील मजकूर ते विसरत नसत. संग्रही असलेल्या पुस्तकाचे व लेखकाचे नाव त्यांच्या लक्षात राहात असे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या आत्मचरित्राचा दुसरा खंड लिहिण्याची तयारी सुरू केली होती. यासाठी त्यांना संयुक्त महाराष्ट्रावरील ५ पुस्तके हवी होती. त्यातील 'वाटचाल' लेखक नाना कुंटे व 'दैव देते कर्म नेते' शंकरराव देव ही दोन पुस्तके वाचल्याचे व ती घरात असल्याचे त्यांनी मला सांगितले. मराठी पुस्तकांची आलमारी व रजिस्टर शोधूनही ही पुस्तके मिळाली नाहीत. ती पुस्तके घरातच आहेत असा यशवंतरावांना आत्मविश्वास होता. शेवटी ती पुस्तके त्यांच्या सांगण्याप्रमाणे घरातच मिळाली. लेखकाने दिलेले पुस्तक उपयोगी आहे की नाही हे न पाहता त्यांच्या भावना लक्षात घेऊन ते संग्रही ठेवावयाचे हा त्यांचा स्वभाव. कोणतेही पुस्तक रद्दीत द्यायचे नाही असा त्यांचा कडक आदेश.