• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३४-१

थोरा-मोठ्यांच्या जीवनात षष्ट्यब्दिपूर्ती एक महत्त्वाची बाब असते.  त्यांचे चाहते यानिमित्ताने समारंभ आयोजीत असतात आणि त्यात साधारणतः प्रत्येक जण त्या व्यक्तीच्या कार्याबद्दल बोलताना त्या व्यक्तीच्या यशात त्याच्या पत्‍नीचा फार मोठा वाटा आहे असे म्हणतो.  यशवंतरावांच्या जीवनात हे न सांगताही मान्य करावे लागेल.  वेणूताईंनी यशवंतरावांसाठी केलेला त्याग, पाळलेली पथ्ये खरोखरच कौतुकास्पद होती.  वेणूताईंनी सगळ्यात मोठे पथ्य पाळले यशवंतरावांच्या जीवनात-अर्थात राजकीय आणि सरकारी- ढवळाढवळ न करण्याचे.  यासाठी त्यांना आपले कार्यक्षेत्र केवळ बंगल्याच्या चार भिंतीतच ठेवावे लागले.  आपल्या मैत्रिणींचा परिवार जेमतेम बोटावर मोजण्याइतकाच ठेवावा लागला.  सहसा त्या गप्पा मारण्यास, चहा-पाण्यास कुठे गेल्या नाहीत किंवा कोणाला त्यांनी बोलाविले नाही.  महिला मंडळ वगैरेसारख्या संस्थांत गेल्यामुळे तेथील बायकांच्या ओळखीबरोबरच त्यांच्यासाठी कराव्या लागणार्‍या कामाची यादी येईल याची त्यांना खात्री होती.  शिवाय त्यांच्यांत नकलीपणा नव्हता.  थोरामोठ्यांच्या बायकांत ज्या सद्‍गुणांचा साधारणतः अभाव असतो अशा सद्‍गुणांनी वेणूताई नटल्या होत्या.  त्या कधीही एकट्या किंवा नातेवाइकांबरोबर सिनेमाला गेल्या नाहीत.  कधी गेल्या तर साहेबांबरोबर.  एक तर त्यांचे विवाहानंतरचे दिवस अतिशय दुःखात गेल्यामुळे दुःख पाहण्याची शक्ती त्यांच्यात नव्हती.  शिवाय यशवंतरावांनाही त्याची आवड नव्हती.  अपत्य नसलेल्या बाईला चार भिंतीत जीवन काढणे किती कष्टाचे आहे याची कल्पना फक्त त्याच बायका करू शकतात.  पण वेणूताईंनी यातून काढलेला मार्ग समाज कल्याणाच्या, महिला मंडळाच्या किंवा गरिबांबद्दल पोकळ जिव्हाळा असलेल्या थोरा-मोठ्यांच्या बायकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.  सौ. वेणूताईंनी बंगल्यात राहणार्‍या नोकरांच्या कुटुंबाला आपले कुटुंब मानले.  त्यांच्या मुलांना ममता दिली.  बायकांना संसार कसा नीट लावावयाचा हे शिकवले, शिवणकाम, विणकाम शिकवले, कपडे व्यवस्थित व स्वच्छ ठेवल्यामुळे आरोग्याची निगा कशी राखली जाते हे सांगितले.  एवढेच नव्हे तर वेणूताईंनी कधी दिल्लीतील थोरा-मोठ्यांच्या बायकांना हळदी-कुंकू वगैरे सारख्या कार्यक्रमास बोलावून आपल्या मोठेपणाचा गाजावाजा केला नाही.  आपल्याच बंगल्यातील नोकरांच्या व पर्सनल स्टाफमधील नित्याचा संबंध येणार्‍यांच्या बायकांना बोलावून त्या हा समारंभ साजरा करीत.  दुसरे पथ्य वेणूताईंनी पाळले ते हे की, त्यांनी कधीही साहेबांच्या पुढे पुढे केले नाही.  साहेब असताना त्या कधीही साहेबांनी बोलाविल्याशिवाय किंवा भेटायला आलेल्या व्यक्तींनी इच्छा व्यक्त केल्याशिवाय त्या बेडरूमच्या बाहेर आल्या नाहीत.  पुष्कळदा भेटणार्‍यांच्या यादीत त्यांच्या अतिशय ओळखीचे लोक असायचे.  पण वेणूताईंनी हे पथ्य सोडले नाही.

यशवंतराव दौर्‍यावर जायचे असले की वेणूताई त्यांना दिवाणखान्याच्या दरवाज्यापर्यंत पोहोचविण्यास यायच्या.  हा उंबरठा त्यांनी कधी ओलांडला नाही.  यशवंतराव बाहेरदेशी जायचे असले तर मात्र वेणूताई कोणत्याही परिस्थितीत व कोणत्याही वेळी त्यांना विमानतळावर सोडण्यास जात व आणावयास जात.  बेडरूमच्या बाहेर आलेल्या वेणूताईंचा पदर डोक्यावरून कधी ढळला नाही आणि म्हणूनच यशवंतरावांच्या कौटुंबिक जीवनातील यशात सौ. वेणूताईंचा सिंहाचा वाटा होता.  

सौ. वेणूताई सखी म्हणूनच वावरत नव्हत्या तर कधी कधी त्या निजी सहायकाचे कामही करीत.  अर्थात हे काम ते केवळ सहायक म्हणून करीत.  यशवंतरावांची खाजगी कागदपत्रे वेणूताईंकडेच असत.  दौर्‍यावर जाताना त्यांच्या बॅगमध्ये ठेवावयाची खाजगी पत्रेही त्या व्यवस्थित ठेवत.  रोज घ्यावयाची औषधे वेळेप्रमाणे पुड्या करून देत.  सांगून खरे वाटणार नाही, पण यशवंतरावांना टेलिफोनच्या डायलवर एक ते शून्यपर्यंत नंबर असतात हेही कदाचित माहीत नसेल.  त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत कधीही कोणालाही आपणहून टेलिफोन नंबर फिरवून टेलिफोन केला नाही.  हे काम सौ. वेणूताईच करत.  त्या गेल्यानंतर नोकर करीत.

सांसारिक जीवनात साधारणतः लहान मोठ्या बाबीवरून खटके उडतात ते टाळण्याचे काम वेणूताईंनी नेहमीच केले.  स्वप्नातही अशी गोष्ट घडू नये, जेणेकरून साहेब रागावतील याची त्या डोळ्यांत तेल घालून काळजी घेत.  काही वेळा ही काळजी दुसर्‍याच्या दृष्टीकोणातून अवास्तव असे.  साहेबांच्या शब्दाला फार आदर असे, नव्हे प्रत्येक शब्द हुकुमासारखा मानला जात असे.  यशवंतरावांचा आपल्या इथे आलेल्या माणसाचे स्वागत बरोबर झाले पाहिजे असा अट्टाहास असे.  यासाठी वेणूताईंना फार धावपळ करावी लागे.  आदरातिथ्य हा चव्हाण कुटुंबाचा एक मोठा गुण होता.  आलेल्या माणसाची नीट विचारपूस झाली नाही असे कधीच होत नव्हते.  यशवंतरावांकडे पाहुणा राहण्यास येणार असला की त्याची खोली, दाढीची ब्लेड, कुंकूसारख्या लहान गोष्टीपासून सज्ज केली जायची.  प्रत्येकाला वेळेवर चहापाणी, नाश्ता, जेवण व्यवस्थित दिले गेलेच पाहिजे.  चव्हाण कुटुंबाचा आदरातिथ्याचा गुण सांगताना सौ. वेणूताईंची एक मजेदार गोष्ट सांगितल्याचे आजही स्मरते.  यशवंतरावांच्या आई मुंबईत आजारी होत्या.  अगदी अंथरुणाला खिळल्या होत्या.  फॅमिली डॉक्टर साधारणतः रोज एकदा तरी त्यांची प्रकृती तपासण्यास येऊन जायचे.  आईला वयोमानाप्रमाणे कमी दिसायचे.  डॉक्टर आल्यानंतर किंवा जाताना चहा, नाश्ता करून जायचे.  प्रकृती तपासल्यानंतर आईला नोकराची किंवा घरातील व्यक्तीची चाहूल लागली नाही तर त्या डॉक्टरच्या हातावर डोक्याखाली ठेवलेल्या चिल्लर पैशातून दोन आणे, किंवा चार आण्याचे नाणे ठेवावयाच्या आणि म्हणावयाच्या, बाबारे, तुला इथे कोणी चहा विचारणार नाही.  सर्वजण आपल्या कामात गर्क दिसतात.  बाहेर हॉटेलात जाऊन चहा पिऊन घे.  डॉक्टरही विनोदी स्वभावाचे असल्यामुळे ते, ते पैसे घेत व दुसर्‍या दिवशी हॉटेलमध्ये न प्यायलेल्या चहाचे मिठ्ठास वर्णन करावयाचे.  सत्तेवर आल्यानंतर यशवंतरावांनी सुखी जीवनाचा पहिला मूलमंत्र सांगितला.  तो म्हणजे आपल्या इथे काम करणार्‍यांना खायला-प्यायला द्यावयाचे असेल तर आपल्यासाठी जे होईल त्यातलेच द्यावयाचे.  वेणूताईंनी हा मूलमंत्र शेवटपर्यंत पाळला.