• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३४-२

नोकरांपासून साहेबांपर्यंत एकच स्वयंपाक व्हायचा.  फक्त त्याला अपवाद ठरला तो एकदाच.  त्या वेळी साखर काळ्याबाजारात बरीच महाग होती.  वेणूताईंनी नोकरांना सांगितले की सकाळचा चहा मी साखरेचा देईन.  नंतर मात्र कोणाला चहा लागला तर गुळाचा प्यावा लागले.  महागाईची साखर आणून पुरविणे कठीण आहे.  

यशवंतरावांना मोठेपणा मिरविणे आवडत नसे.  वेणूताईंमध्येही हा गुण होता.  यशवंतराव अधूनमधून वेणूताईंसह लग्नसोहळ्यात जात असत.  पण जाताना कधीही कोणतीही भेटवस्तू त्या बरोबर घेऊन गेल्याचे आठवत नाही.  कार्याच्या आदल्या दिवशी किंवा निमंत्रण द्यायला येतील त्याच वेळी वेणूताई जे शक्य आहे ते देऊन मोकळ्या होत.  त्यांना आलेल्या भेटवस्तूंपैकी कोणतीही वस्तू त्या देत नसत.  प्रत्येकाला बाजारातून आणून नवीन वस्तू देण्यात येत असे.

बंगल्यातील नोकर-चाकरांबरोबर यशवंतरावांकडे असलेल्या वैयक्तिक सरकारी कर्मचारी (पर्सनल स्टाफ) हा त्यांच्या कुटुंबाचाच भाग होता.  चव्हाण दांपत्याचं प्रेम व जिव्हाळा त्यांना सदैव मिळत होता.  त्यांची सुख-दुःखं यशवंतराव-वेणूताई आपली मानत.  त्यात सहभागी होत.  कोणाचेही नख दुखले तरी वेणूताई तन-मन-धनाने धावून जात.  एकदा माझ्या पोटातील पेप्टिक अल्सर फुटला.  तो ताबडतोब न कळल्यामुळे रक्तात विष झाले.  डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे दवाखान्यात भरती करण्यात आले.  रोगाचे गांभीर्य डॉक्टरांच्या लक्षात आले.  सरकारी डॉक्टर असूनही ते कौटुंबिक डॉक्टर असल्यामुळे त्यांनी ग्लुकोज, रक्त आदीची व्यवस्था करून यशवंतरावांना फोन करून परिस्थितीची कल्पना दिली.  यशवंतराव तास, दोन तासांपूर्वीच अमेरिकेहून दिल्लीस येऊन पोहोचले होते व विश्रांती घेण्याच्या तयारीत होते.  ते वेणूताईसह तातडीने दवाखान्यात आले.  डॉक्टरांनी त्या उभयतांना बाजूला घेऊन परिस्थिती सांगितली व काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.  पोटातील जखमेतून रक्त वाहणे जर बंद झाले नाही तर केव्हाही ऑपरेशन टेबलावर न्यावे लागेल अशी तयारीही ठेवली.  परंतु या गोष्टीची कल्पना सौ. खांडेकरांना होऊ दिली नाही.  वेणूताईंनी त्यांना बाजूला नेऊन सांगितले की, तुम्हांला सतत दवाखान्यात राहावे लागेल.  तरी घरच्या लोकांना बोलावून घ्या.  सौ. खांडेकरांचे न ऐकता त्यांनी तशी व्यवस्थाही केली.  त्यानंतर त्यांनी ६-७ दिवस सौ. खांडेकरांची घेतलेली काळजी त्यांच्याबद्दल असलेल्या आदरात भर टाकणारी आहे.  सकाळी त्या सौ. खांडेकर यांच्याकरिता थर्मासमधून चहा पाठवावयाच्या.  ९ च्या सुमारास मोटार पाठवून बंगल्यावर न्यायच्या.  त्यांच्या आंघोळीची व्यवस्था करावयाच्या.  ११ च्या सुमारास स्वतः ताट पाणी करून स्वतःच्या हातांनी वाढून जेवायला घालायच्या.  नंतर दवाखान्यात पोहोचवून ४ वाजता परत चहा.  नंतर रात्री ८ ला परत बंगल्यावर बोलावून स्वतःजवळ बसवून जेवावयाला वाढावयाच्या.  सौ. खांडेकरांनी हे पाहून डबा दवाखान्यात पाठवायला सांगितले.  परंतु दवाखान्यात जेवण जाणे शक्य नाही या सबबीवर त्याला त्यांनी मान्यता दिली नाही.  तसेच ते श्रावणाचे दिवस असल्यामुळे घरी आलेल्या नातेवाईकांची उपवासाच्या पदार्थापासून सोय केली.  कोणाचीही अडचण असो, वेणूताईंना कळताच त्या धावून गेल्या नाहीत असे कधीच झाले नाही.  एकदा त्यांच्याकडे नुकत्याच आलेल्या वैयक्तिक सहाय्यकाकडे बारसे होते.  त्यांच्याकडे पाळणा विकत घेण्याची पद्धत नव्हती.  पाळण्याचा शोध घेऊनही पाळणा मिळेना.  वेणूताईंना हे कळताच त्या सरळ बाजारात गेल्या.  पाळणा आणला व तो त्याच्याकडे पोहोचवून दिला.  हा मोठेपणा पाहून त्याच्याकडील वडीलधारी मंडळीही आश्चर्यचकित झाली.  दिल्लीत महाराष्ट्रासारखे गोल वरवंटे मिळत नाहीत; म्हणून वेणूताईंनी आपल्या लोकांकरिता मुंबई-पुण्याहून पाटे वरवंटे आणून दिले.  त्यांचे हे वागणे मंत्रिणीबाईला शोभेसे नव्हते.  पण मानवतावादी दृष्टिकोण असलेल्या स्त्रीच्या कीर्तीत भर घालणारे होते.  म्हणूनच त्यांच्या सान्निध्यात कधी न कधी थोड्या वेळाकरिता आलेली व्यक्ती चव्हाण दांपत्याचे आजही गुण गाते.  

चव्हाणांच्या कौटुंबिक जीवनातील तिसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्यांचे निजी सचिव श्री. श्रीपाद डोंगरे.  वेणूताई बंगल्यात यशवंतरावांची सावली होत्या तर डोंगरे बाहेरच्या वातावरणात.  बारशापासून बाराव्यापर्यंत यशवंतराव कुठेही जावोत,  डोंगरे त्यांच्याबरोबर नाहीत असे कधीच झाले नाही.  यशवंतरावांच्या व वेणूताईंच्या-दोन्हीकडच्या नातलगांना सांभाळण्याचे फार कठीण काम डोंगरे यांनी यशस्वीरीत्या केले आणि यशवंतरावांना त्याची झळ कधीही लागू दिली नाही.  डोंगरे यांना सर्वजण काका म्हणत.  डोंगरे यांनी काकाचे प्रेम सर्वांना दिले.  त्यांचे प्रश्न सोडविले.  यशवंतरावांना राजकारणात अप्रत्यक्षरीत्या डोंगरे यांचे फार साहाय्य झाले.  हिंदुस्थानच्या राजकारणात कुठे काय घडत आहे, घडण्याची शक्यता आहे याची माहिती ते यशवंतरावांना पूर्ण खात्री करून देत असत.  कधी कधी यशवंतराव ती गोष्ट उडवून लावावयाचे पण डोंगरे यांनी त्याचे दुःख कधी मानले नाही.  यशवंतरावांसाठी त्यांनी केलेल्या त्यागाला मोल नाही.  डोंगरे यांना सुपारीचेदेखील व्यसन नव्हते.  ऐपत असून ते पंचतारांकित हॉटेलमध्ये कधी गेले नाहीत की नाटक-सिनेमास जाऊन बसले नाहीत.  यशवंतराव तिथेच डोंगरे व डोंगरे तिथेच यशवंतराव हे समीकरण झाले होते.  अर्थात याचा परिणाम सांसारिक असूनही त्यांना वैराग्याचे जीवन जगावे लागले.  ते कधीही सौ. डोंगरे यांना घेऊन सुट्टीवर गेले असे झाले नाही.  डोंगरे देशाच्या-परदेशाच्या कानाकोपर्‍यात हिंडले परंतु सौ. डोंगरे महाराष्ट्राबाहेर कितपत पडल्या असतील याबद्दल शंकाच आहे.  यशवंतरावांना आपल्यामुळे कधीही खाली पाहावे लागणार नाही याची ते काळजी घेत.  म्हणून सतत ८ वर्षे वायुदलाची विमाने यशवंतरावांसाठी असतानाही त्या विमानातून सौ. डोंगरे यांनी क्वचितच प्रवास केला असेल आणि केला असेल तर मुंबई-दिल्लीपुरताच.  एवढे असूनही डोंगरे यांचा चेहरा हसतमुख.  त्यांच्या कपाळावर आठ्या किंवा राग कोणीही पाहिला नसेल.  डोंगरे यांच्याबद्दल यशवंतरावांनाही आदर होता.  त्यांच्या त्यागाची त्यांना कल्पना होती.  म्हणूनच विरोधी पक्षाचे नेतृत्व मिळाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला त्या वेळी त्यांच्याकडे असलेली निजी सचिवाची जागा डोंगरे प्रकृति-अस्वास्थामुळे कामावर रुजू होऊ शकत नसतानाही डोंगरे हयात असेपर्यंत कोणाला दिली नाही.  त्यांच्या निधनाचा धक्का यशवंतरावांना त्यांचा सख्खा भाऊ गेल्यानंतर होणार्‍या धक्क्याइतकाच तीव्र होता.