• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-कौटुंबिक जीवन आणि शेवटचा प्रवास- ch ३४

३४. एकरूप दांपत्य (राम खांडेकर)

पती आणि पत्‍नी संसाराच्या रथाची दोन चाके आहेत.  या दोघांच्या विचारांची गती आणि आचारांचा आकार सारखा असेल तर संसाराचा रथ जीवनाच्या खाचखळग्यातून यशस्वी रीतीने जाऊ शकतो.  याचबरोबर दोघांमध्ये जास्तीत जास्त सामंजस्य असेल तर जीवनातील सुखाचे क्षण अधिक टिपता येतील.  श्री. यशवंतराव व सौ. वेणूताई यांच्याबद्दल असाच अनुभव आला आणि म्हणूनच या दोघांचे वैवाहिक जीवन सुखा-समाधानात गेले.

सौ. वेणूताई खाऊनपिऊन सुखी कुटुंबातून चव्हाणांच्या घराच्या उंबरठ्यावरील माप ओलांडून २ जून १९४२ रोजी यशवंतरावांच्या जीवनात आल्या.  लग्नाचे वय झाल्याबरोबर त्यांनी आपल्या मनाशी देशभक्ताशी लग्न करून त्याचा संसार करण्याचे ध्येय बाळगले होते.  ते दिवसही स्वातंत्र्य संग्रामाचे होते.  देशभक्ताचा संसार निखार्‍यावरील पाऊलवाट आहे याची त्यांना त्या वेळी कल्पना नव्हती.  याचा अनुभव अंगाची हळद निघालेलीही नव्हती अशा वेळी पोलिसांनी त्यांना यशवंतरावांचा पत्ता मागण्यासाठी केलेल्या छळामुळे आला.  त्या कोवळ्या वयात सौ. वेणूताईंनी कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड दिले.  यामुळे त्या टी.बी.ने आजारी पडल्या.  परिणाम-स्वरूप एका अल्प दिवसाच्या संततिप्राप्‍तीनंतर सर्व आयुष्य संततिसुखाशिवाय काढावे लागले.  यात खरी कसोटी सौ. वेणूताईंपेक्षा यशवंतरावांची होती. पत्‍नीविषयी असलेल्या निष्ठेची सत्त्वपरीक्षा होती.  यशवंतराव यात पूर्ण उतरले.  तरुण वय, सत्ता व अधिकार -अशा व्यक्तीने संततीसाठी दुसरा विवाह केला असता तरी लोकांनी नाके मुरडली नसती.  सर्वांनी ते योग्यच मानले असते.  पण यशवंतरावांना वेणूताईंनी दिलेली साथीची जाण होती आणि म्हणूनच वेणूताईंचे सुख एवढेच त्यांना माहीत होते.  दुसर्‍या विवाहाची कल्पना त्यांना कधीच शिवली नाही.

यशवंतरावांच्या सुखी कौटुंबिक जीवनाचे श्रेय दोन व्यक्तींना द्यावे लागेल.  पहिली व्यक्ती म्हणजे सौ. वेणूताई आणि दुसरी व्यक्ती म्हणजे यशवंतरावांचे निजी सचिव श्री. श्रीपाद डोंगरे.  या दोघांनी यशवंतरावांसाठी केलेल्या त्यागाला तोड नाही.  आजारपणातून बर्‍या झाल्यानंतर वेणूताईंवर यशवंतराव व त्यांचे दोन बंधू यांच्या संसाराची जबाबदारी येऊन पडली.  पुतणे लहान होते.  माहेरी भावंडे लहान होती.  सासर माहेर सांभाळणे कठीण बाब.  त्यात लहान मुलांचा भार.  त्यांच्या आवडी-निवडी.  दोन्हीकडील मुलांना समान वागणूक द्यायची.  त्यांचे राग-लोभ सांभाळायचे ही तारेवरची कसरत होती.  यात अनवधानाने झालेली चूक यशवंतरावांचे मन कष्टी करणारी होती.  काही वेळा ही जबाबदारी पेलताना वेणूताईंची परिस्थिती केविलवाणी व्हायची.  प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले जात होते आणि म्हणूनच यशवंतरावांना संसाराच्या सुखदुःखाची जाणवी कधी झाली नाही.  तसेच वेणूताई यशवंतरावांच्या जीवनात सखीच्या भूमिकेतही वावरत होत्या.  घरात त्या यशवंतरावांची छाया होत्या.  सकाळी ५ वाजता उठल्यापासून रात्री १० वाजता झोपेपर्यंत त्या यशवंतरावांचया बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्यायच्या.  सकाळचा चहा, नाश्ता, यशवंतरावांनी ऑफिसमध्ये घालून जायचे कपडे, स्वयंपाकात आवडी-निवडीचे पदार्थ, औषध-पाणी, डॉक्टर वगैरे गोष्टी वेणूताईच पाहावयाच्या.  यशवंतरावांच्या कपड्यांची, जोड्यांची निवडही वेणूताईच करीत असत.  एवढेच नव्हे तर सासर-माहेर कडील नातेवाइकांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, देणे-घेणे याकडे वेणूताईच लक्ष पुरवावयाच्या.  यशवंतरावांचे काम फक्त वेणूताईंनी आणलेल्या वस्तू पसंत आहेत एवढेच सांगण्याचे होते.  एकूण संसारात असूनही यशवंतराव सांसारिक नव्हते, आणि म्हणूनच यशवंतराव आपल्या कामात, राजकारणात चोवीस तास रमू शकले.  कौटुंबिक जीवनाची महत्त्वाची बाजू वेणूताईंनी चोखपणे सांभाळली.