त्याच दिवशी पहाटे चारचा सुमार होता. त्या हॉलमध्ये मिळेल त्या जागी - मिळेल तशा स्थितीत - नातेवाईक आणि मित्रमंडळी झोपली होती. डोंगरे श्रांत होऊन तक्क्यावर डोके ठेवून होते. ''काय विचार करताय ?'' मी विचारले. ''यशवंतरावांची शान वाढवावी म्हणून अपरंपार कष्ट केले - पण शेवटी थोडक्यात हुकले'' - असे म्हणाले आणि त्यांना सावरण्यासाठी पुढे केलेल्या हातावर त्यांच्या डोळ्यांतले अश्रू पडले. डोंगर्यांचे एक स्वप्न अधुरेपणी भंगले होते. ते पुरे होते आणि असा प्रसंग येता तर ते सुखाचे अश्रू झाले असते.
त्यानंतर पाच-सहा वर्षे मी दिल्लीत गेलो की साहेबांच्या घरी त्यांचा पाहुणा म्हणून राहू लागलो. त्यांनीच मला पुण्यात फोन करून सांगितले होते की, आता आमच्याच घरी उतरायचे. मी येणार असलो की घरी स्वयंपाकघरात कांदा लसूण वर्ज्य असल्याचे सांगितले जाई. मी गेलो की मला गडी-गाडी नेण्या-आणण्यास येई. जाऊन पोहोचलो की साहेब आणि बाईसाहेब दोघेही खोलीत येऊन चौकशी करीत. आईंची प्रकृती-मुलांच्या अभ्यासाची चौकशी-डोंगर्यांच्या धनंजय-ज्योत्स्ना-वहिनींची चौकशी. काम संपल्यावर एक दोन दिवस राहा, जरा गप्पा मारू असे म्हणायचे. धर्मशास्त्र, काव्य, वाङ्मय, लेखक-कवी-राजकारण-समाजकारण सर्व काही निघे आणि तासनतास गप्पा होत.
मी साहेबांपेक्षा कितीतरी लहान आणि नवखा. पण त्यांची साध्या भाषेतील पत्रे मनाला भिडायची. जुलै ८३ मध्ये त्यांनी मला लिहिले,
''प्रिय श्री. जोगळेकर यांसी
स.न.वि.वि.
येथे आल्यापासून तुम्हाला पत्र लिहावे असे सारखे वाटत होते. तरुण भारतामधील कै. सौ. वेणूताईंवरील तुमचा लेख वाचला. तुम्ही तिला चांगले समजून घेतले होते असा त्याचा अर्थ आहे. आभारी आहे. हे औपचारिक नव्हे.
तुम्हास येण्यास कोणता महिना सोयीचा, ते कळविले म्हणजे मी माझे येथील ओळीने हजर असणारे दिवस तुम्हाला कळवीन. कमिशनचे दौरे सुरू झले आहेत. या कामात काही वेळ जातो म्हणून बरे. एकटा असलो की आठवणींनी माझे सगळे जागेपणचे जग भरून जाते. तुम्ही चार-दोन दिवस आलात म्हणजे तेवढेच माझे दिवस बरे जातील. नेहमीच्या कामाखेरीज दुसरे अनेक खाजगी प्रश्न तुमच्याशी बोलावयाचे आहेत.''
साहेबांचा सगळ्यांत आवडता पुतण्या म्हणजे राजा. डॉक्टर विक्रम चव्हाण. सातार्याहून आरोग्य शिबिर संपवून येताना त्याची ऍम्ब्युलन्स पुलावरून खाली कोसळली आणि मृत्यूने तत्काळ त्या मुलाचा घासच घेतला. साहेब आणि बाईसाहेब या आघाताने घायाळ झाले. साहेब एकदा सांगत होते, ''डोंगरे गेले आणि दुसर्या दिवशी उठल्यावर दिवस कसा सुरू करायचा हेच मला समजेना. राजा गेला आणि दिल्ली सोडून पुण्याकडे नको आता कधी जायला असे वाटू लागले.'' अशा हळव्या मनःस्थितीत असतानाच त्या भावनाशील हळव्या मनावर शेवटचा जबरदस्त घाव पडला. ध्यानीमनी नसताना सौ. वेणूताई गेल्या आणि साहेबांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. ''तुम्ही असा धीर सोडू नका, तुमची देशास जरुरी आहे'' असे म्हणताना म्हणाले, ''धीर सोडला नाही पण काय करू, दुःखच फार मोठे आहे.''
या आघातानंतर साहेब अधीरपणे आवराआवर करू लागले. त्यांनी आपल्या वुईलमध्ये लिहिले आहे, ''माझी पत्नी सौ. वेणूताई हिचे स्मरणार्थ मी एक सार्वजनिक न्यास करणार आहे. तिने मला खाजगी व सार्वजनिक जीवनात अमोल साथ दिली आहे. त्यासाठी तिची आठवण जागती ठेवणे हा माझ्या जीवनातील उरलेला एकच आनंद आहे.''
वेणूबाई स्मारकासाठी सार्या पुस्तकांची, वस्तूंची मोजदाद झाली. त्यावर लेबले लागली. सप्टेंबर ८४ च्या दुसर्या आठवड्यात मी आठ दिवसांसाठी दिल्लीत त्यांच्याकडे गेलो. एकदा सायंकाळी परत आलो तो हॉलमधील सोफ्यावर साहेब एकटेच बसलेले. मन गलबलले पण तोंडावर उसने हसू आणत शेजारी जाऊन बसलो. ''काय विशेष ?'' असे म्हणताना हॉलमधल्या सर्व वस्तूंकडे पाहू लागले. ''तुम्हाला काय वाटतंय ? कर्हाडला असाच हॉल उभारण्यात आलेला आहे. अशाच वस्तू जिथल्या तिथे मांडल्या आहेत. वेणूताई चव्हाण स्मारक मंदिराच्या त्या वास्तूत आपण निवांत बसलो आहोत. आणि त्यातील एक वस्तू, वेणूताई, वेणूताई असे म्हणत आहे - असेच ना ?'' ''तसंच'' माझ्याकडे अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी पाहात साहेब कसेबसे उद्गारले.