यशवंतराव चव्हाण (89)

निजलिंगप्पांनी कार्यकारिणीची बैठक ऑक्टोबरमध्ये बोलावण्याचे मान्य केले. तथापि ही तारीख दोनदा पुढे ढकलली. सी. सुब्रह्मण्यम यांचे कार्यकारिणीचे सदस्यत्व रद्द करण्याचा डाव सिंडिकेटने रचला. कारण काय तर त्यांनी तामिळनाडू काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याने ते भारतीय काँग्रेसचे आणि कार्यकारिणीचे सदस्य राहू शकत नाहीत. इंदिराजींच्या आंतल्या गोटाची बैठक भरून सिंडिकेटशी या मुद्यावर लढा करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, जगजीवनराम, फक्रुद्दिनअली अहंमद, स्वर्णसिंग यांच्या सहीने निजलिंगप्पांना एक पत्र पाठविण्यात आले. त्यात कार्यकारिणीवरून सुब्रह्मण्यम यांची हकालपट्टी करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला होता. त्याचबरोबर परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून १५ ऑक्टोबरला कार्यकारिणीची बैठक बोलवावी आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन १५ नोव्हेंबरपूर्वी बोलवावे अशीही मागणी करण्यात आली होती. निजलिंगप्पांनी या पत्राला उत्तर पाठविले. त्यात त्यांनी म्हटले होते की, सुब्रह्मण्यम यांना आपण पत्र पाठविलेले नाही. एकाधिकाराने निर्णय घेण्याचा आपला स्वभाव नाही, अध्यक्षांवर असे आरोप करणे शोभा देणारे नाही. कार्यकारिणीच्या बैठकीची गरज वाटत नाही. या उत्तरानंतर पंतप्रधानांच्या गोटातून सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. नवा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठकीची मागणी करण्यात आली होती. विनंती पत्रावर सर्वश्री फक्रुद्दिनअली अहंमद, जगजीवनराम, चव्हाण आणि उमाशंकर दीक्षित यांच्या सह्या होत्या आणि त्यांनी सह्यांचे मोहिमेवर जोर दिला होता. अखिल भारतीय काँग्रेसच्या एकूण ७०५ प्रतिनिधींपैकी ४०५ प्रतिनिधींच्या सह्या त्यांनी मिळविल्या. निजलिंगप्पा आणि इतर काँग्रेसश्रेष्ठी हादरून गेले. १ नोव्हेंबर १९६९ ला कार्यकारिणीची बैठक बोलाविण्यात आली. दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका ठरवून टाकल्या.

ज्या राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यापैकी म्हैसूरचे वीरेंद्र पाटील, गुजरातचे हितेंद्र देसाई यांनी काँग्रेस पक्ष फुटीपासून वाचविण्याकरिता पुढाकार घेतला. हे दोघे पंतप्रधानांना भेटले आणि सिंडिकेटच्या नेत्यांना पण भेटले. त्यांना दोन्ही बाजूंकडून कडवट प्रतिक्रिया आणि एकमेकांवर आरोप ऐकावयास मिळाले. निजलिंगप्पा प्रतिगामी असून सिंडिकेटमधील सत्ताकांक्षी नेत्यांच्या हातातील बाहुले आहेत असा आरोप इंदिराजींनी केला. तर इंदिराजी या हुकूमशाही प्रवृत्तीच्या असून त्यांना आपल्या सहकार्‍यांपेक्षा कम्युनिस्टांचे प्रेम अधिक आहे असा आरोप सिंडिकेटवाल्यांनी केला. १ नोव्हेंबरच्या कार्यकारिणीच्या बैठकीत कुणाकुणाला पक्षातून काढून टाकायचे याबद्दलची व्यूहरचना करण्यात आली. सुब्रह्मण्यम यांचे सभासदत्व संपवावे आणि इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, जगजीवनराम, फक्रुद्दिनअली अहंमद यांना निलंबित करावे अशी कामराज यांनी मागणी केली. ऑक्टोबर २८ ला निजलिंगप्पांनी पंतप्रधान इंदिराजींना सहा पानी पत्र पाठवून पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल आणि पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्‍न केल्याबद्दल जाब विचारला. लगोलग सुब्रह्मण्यम, फक्रुद्दिनअली अहंमद आणि शंकर दयाळ शर्मा यांना निलंबित करण्यात आल्याचे निजलिंगप्पा यांनी जाहीर केले.