यशवंतराव चव्हाण (81)

दरम्यान मध्यप्रदेशचे नेते सेठ गोविंददास यांनी बाबू जगजीवनराम यांच्या नांवाची राष्ट्रपतिपदासाठी सूचना केली. बाबूजी हरिजन नेते होते, ज्येष्ठ काँग्रेस नेते होते. अन्न-शेती खात्याच्या मंत्रिपदावर होते. यशवंतरावांना हे नांव पसंत पडले. त्यांनी आपल्या जवळच्या सहकार्‍यांजवळ आपली पसंती बोलून दाखविली. कामराज यांनी इंदिरा गांधी यांची भेट घेऊन एन. संजीव रेड्डी यांचे नांव राष्ट्रपतिपदासाठी सुचविले. स्वतः संजीव रेड्डी हे पंतप्रधान श्रीमती गांधी यांना भेटले व आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली. नंतर यशवंतरावांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांचेशी रेड्डींनी संपर्क साधला. दोघांची भेट झाली. भेटीत रेड्डींनी यशवंतरावांना सांगितले की, निवडणुकीसाठी आपण उत्सुक असल्यास निवडणूक जरूर लढवावी असे इंदिराजींचे म्हणणे पडले. इंदिराजी, निजलिंगप्पा तसेच काही मंत्री परदेशच्या दौर्‍यावर जाणार असल्याने इंदिराजींनी मोरारजीभाई, कामराज, यशवंतराव, जगजीवनराम आदि काँग्रेसच्या नेत्यांशी याबाबत चर्चा केली. तथापि निर्णय होऊ शकला नाही. जूनच्या मध्यापर्यंत उमेदवाराची निश्चिती करावी असे ठरले. निजलिंगप्पा परदेशच्या दौर्‍यावर रवाना झाले. युरोपच्या दौर्‍यावरून परतल्यावर त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिनांक १९ जून रोजी बोलाविली. राष्ट्रपतिपदासाठी सिंडिकेटच्या उमेदवाराला पाठिंबा मिळविण्यासाठी स. का. पाटील, कामराज यांनी वातावरण निर्मितीचा प्रयत्‍न केला होता. कामराज यांनी या संदर्भात यशवंतरावांचीही भेट घेतली होती. गिरी नकोत हे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर श्री. रेड्डी योग्य आहेत हे पण सांगितले. तथापि निश्चित स्वरूपाचा निर्णय अद्याप झालेला नाही हेही सांगून टाकले. गिरी यांनी इंदिराजींची भेट घेऊन आपली इच्छा सांगितली आणि निजलिंगप्पांच्या शब्दाचा हवाला दिला. नंतर इंदिराजींनी सिंडिकेटमधील नेत्यांशी, मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. जूनअखेर त्या जपानला गेल्या आणि ३ जुलै रोजी मायदेशी परतल्या.

राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबद्दल सिंडिकेटमधील नेत्यांमध्ये एकमत दिसून येऊ लागण्याऐवजी मतभेद दिसून येऊ लागले. संजीव रेड्डी यांच्यापेक्षा आपण काय कमी आहोत असे मोरारजी देसाई, कामराज, निजलिंगप्पा यांना वाटू लागले. निजलिंगप्पांचे विशिष्ट नांवाबद्दल ठाम मत होत नव्हते आणि पंतप्रधान इंदिरा गांधी याही आपल्या मनात नेमके काय आहे ठामपणे सांगत नव्हत्या. काँग्रेसश्रेष्ठींत संशयाचे वातावरण निर्माण होऊन वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या. त्यात निजलिंगप्पा यांनी १६ जूनला जाहीर करून टाकले की उमेदवाराचे नांव निश्चित करण्यासाठी काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डाची बैठक एक आठवड्यात बोलाविण्यात येईल. कामराज यांनी सहमतीचे (कन्सेन्सस) चे तुणतुणे सुरू करून गांठीभेटींना सुरुवात केली. चव्हाणसाहेबांना यांनी पुन्हा एकदा सांगितले की, गिरी नकोत, रेड्डींना उमेदवारी दिली जावी. यानंतर निजलिंगप्पा यांना बरोबर घेऊन ते इंदिरा गांधींना भेटले. त्यानंतर इंदिराजी हंगामी राष्ट्रपती गिरींना भेटल्या. गिरींनी आपली इच्छा त्यांचेजवळ बोलून दाखविली. इंदिराजींनी त्यांना कसलेही आश्वासन न देता सांगितले की, इतर पक्षांशी बोलून उमेदवार ठरविणे उपयुक्त ठरेल. इंदिराजींनी नंतर यशवंतरावांना बोलावून घेऊन त्यांचेशी चर्चा केली. पंतप्रधानांचे गैरहजेरीत कोणी कोणी काय काय हालचाली केल्या याची माहिती चव्हाणांनी दिली. सिंडिकेट जोरात असल्याचेही सांगितले. एवढेच नव्हे तर इंदिराजींना पंतप्रधानपदावरून हटविण्याच्या हालचाली हसुरू केल्या गेल्या आहेत याची कल्पना पण दिली.