यशवंतराव चव्हाण (80)

:   १०   :

१९६७ च्या निवडणुकीत कामराज, स. का. पाटील, अतुल्य घोष आणि ज्येष्ठ नेत्यांचा पराभव झाल्यावर 'सिंडिकेट' म्हणून संबोधले जाणार्‍या काँग्रेसश्रेष्ठींचे बळ कमी झाले. त्याचबरोबर काँग्रेसच्या अध्यक्षांचेही महत्त्व कमी झाले. इंदिरा गांधींची शक्ती दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून कामराज यांनी अध्यक्षपद स्वतःकडे कसे राहील यादृष्टीने हालचाली सुरू केल्या. इंदिराजींनी त्यांचा डाव ओळखून एस. निजलिंगप्पा यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याचा मनाशी निर्णय घेतला. इंदिराजींच्या पाठिंब्याने निजलिंगप्पा अध्यक्ष झाले. तथापि त्यांच्यात आणि इंदिराजींच्यात मतभेदाला सुरुवात झाली. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे काँग्रेस कार्यकारिणीला जबाबदार असल्याची भूमिका निजलिंगप्पांनी घेतली. इंदिराजींना ते मान्य नव्हते. दोघांतील बेबनाव दिवसेंदिवस वाढत जाऊन त्याचा स्फोट १९६९ च्या बंगलोर अधिवेशनात झाला. जुलै १९६९ मध्ये भरलेल्या या अधिवेशनात निजलिंगप्पा आणि सिंडिकेट अल्पमतात गेले. काँग्रेस पक्ष दोन गटात दुभंगला. इंदिराजी सिंडिकेटला भारी पडल्या. संसदीय काँग्रेस पक्षातही त्यांनी आपले बहुमत प्रस्थापित केले. बंगलोर अधिवेशनानंतर काँग्रेसचे अध्यक्षपद इंदिराजींनी आपल्याकडे घ्यावे असा आग्रह फक्रुद्दीन अली अहंमद आणि जगजीवनराम यांनी धरला. पंतप्रधानपद आणि काँग्रेसचे अध्यक्षपद एकाच व्यक्तीकडे असावे या कल्पनेला यशवंतरावांनी दुजोरा दिला नाही. इंदिरा गांधींना त्यांनी आपले मत स्पष्टपणे सांगितले. जगजीवनराम यांचेकडे अध्यक्षपद द्यावे, असे सुचविले. जगजीवनराम यांनी चव्हाणांची सूचना स्वीकारली, तथापि एक अट घालून. आपल्याकडील मंत्रिपद काढून घेऊ नये अशी ती अट होती. काँग्रेसला उजव्या विचारसरणीकडे नेणारा एक गट आणि डाव्या विचारसरणीकडे नेणारा दुसरा गट असे दोन गट पडल्यानंतर काँग्रेस संघटनेत रस्सीखेच सुरू झाली. काँग्रेस अभंग राहावी, तुटू नये म्हणून यशवंतरावांनी प्रयत्‍नांची पराकाष्ठा केली. त्यांनी दोन्ही गटांशी सख्य ठेऊन फरिदाबाद आणि बंगलोर या दोन्ही अधिवेशनात एकीकरणाचे कसोशीने प्रयत्‍न केले. उजव्या गटाने इंदिराजींना पक्षातून घालवून देण्याचा घाट घातल्यावर दुफळीपासून पक्ष वाचविण्यासाठी यशवंतरावांनी खूप धावपळ केली. तथापि निजलिंगप्पा गटाने आपला हेका सोडला नाही आणि काँग्रेस पक्ष दुभंगला.

राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांचे मे मध्ये निधन झाले. श्री. व्ही. व्ही. गिरी उपराष्ट्रपतिपदावर होते. त्यामुळे त्यांचा हंगामी राष्ट्रपती म्हणून शपथविधी पार पडला. राष्ट्रपतींच्या निधनानंतर उपराष्ट्रपतींना संधी देऊन राष्ट्रपतिपदी बसविले जाते अशी प्रथा पडलेली होती. डॉ. राजेंद्रप्रसाद, डॉ. राधाकृष्णन, डॉ. झाकीर हुसेन ही उदाहरणे होती. त्यामुळे गिरींना वाटले की आपली राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात येईल. काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना व्ही. व्ही. गिरी यांची निजलिंगप्पांनी भेट घेऊन आपला पाठिंबा त्यांना दर्शविला होता. इंदिराजींनी यशवंतरावांना त्यांचे मत विचारले. यशवंतरावांनी या प्रश्नावर विचारच केलेला नव्हता. पूर्वीच्या प्रथेचा उल्लेख त्यांनी केला. इंदिराजींच्याबरोबरील चर्चेत चव्हाणांना असा कल दिसून आला की गिरी यांचेबाबत इंदिराजी तेवढ्या उत्सुक नाहीत.