यशवंतराव चव्हाण (4)

सातारा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात यशवंतरावांचे जे स्नेही व सहकारी होते, मंत्रिमंडळात जे मंत्री होते त्यांचेशी माझा परिचय असल्याने, तसेच १९४६ च्या निवडणुकीनंतर ज्या ज्या घटना घडल्या, जे जे प्रसंग घडले त्यांचा मी साथीदार असल्यामुळे चरित्र लिहिताना त्या त्या व्यक्ती, ते ते प्रसंग माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले.  थोडा भावनावश होऊन मी ते प्रसंग चितारले आहेत.  राघुअण्णांच्या बरोबर मी तुरुंगात होतो.  के. डी. पाटील, गौरीहर सिंहासने, व्यंकटराव पवार आदींचा सहवास असेंब्ली अधिवेधनाच्या वेळी लाभलेला होता.  आत्मारामबापू पाटील पुण्यात माझ्या शेजारीच रहायला होते.  मोरारजी, इंदिराजी आदींच्या बरोबर मी लोकसभेत काम केलेले आणि दिल्लीत दहा वर्षे यमुनेचे पाणी चाखलेले.  त्या पाण्याचे गुणधर्म व राजकारणावरील त्याचा परिणाम अनुभवलेला, त्यामुळे लेखनातून शब्द साकार झाले.  ज्यांनी ज्यांनी आतांपर्यंत यशवंतरावांच्या चरित्र लेखनाची कामगिरी पार पाडली ते सर्वस्वी बाबूराव काळे, रामभाऊ जोशी, विठ्ठल पाटील, कुन्ही कृष्णन, राम प्रधान यांचा माझा दृढ परिचय.  त्यामुळे लिहिताना मला अवघडल्यासारखे वाटले नाही, मदतच झाली.  यशवंतरावांच्या जीवनांतील कांही मर्यादित काळापुरती ही चरित्रे असल्याने शेवटपर्यंत काय काय घडले, कसे कसे घडले याचे रेखाटन करून मी हे चरित्र पूर्ण केले आहे.  यात त्रुटी नाहीत असा माझा दावा नाही.  तथापि वाचकांना ते आवडेल-भावेल अशी माझी खात्री आहे.

यशवंतराव चव्हाण समजावून घ्यावेत, त्यांचे विचार समजावून घ्यावेत, त्यांची निर्णयाची आणि कृतीची पद्धत समजावून घ्यावी असे नव्या पिढीतील तरुण कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे.  त्यांच्यासाठी आणि चव्हाणप्रेमी जनतेसाठी हे पुस्तक लिहून सादर केले आहे.  यात कृष्णाकांठी, सागर किनारी आणि यमुनातीरी ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या, जे निर्णय घेतले गेले त्यांचा थोडक्यात समावेश केला आहे.  वाचकांना तो उद्‍बोधक वाटेल अशी आशा आहे.  या पाठोपाठ यशवंतरावजींचे विस्तृत चरित्र लिहिण्याचा मानस आहे.  चव्हाणसाहेबांचे माझ्यावर प्रेमाचे, मायेचे, लोभाचे मोठे ॠण आहे.  त्या ॠणातून मुक्त होण्याची संधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी चरित्र लेखनाच्या रूपाने दिलीं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.  माझे स्नेही श्री. ज्ञानेश्वर ऊर्फ बापूसाहेब खैरे यांनी या कामी मला प्रोत्साहन दिले, दादासाहेब रुपवते यांनी लेखनाबद्दल आग्रही भूमिका घेतली, मोहन धारिया यांनी व्यवहार्य सूचना केली आणि मा. शरद पवार यांनी लेखनास प्रारंभ करून दिला त्याबद्दल चौघांनाही धन्यवाद.

महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाने सुबक आणि वक्तशीर छपाई करून उत्तम सहकार्य दिले, त्याबद्दल संस्थेचे चेअरमन श्री. नरूभाऊ लिमये, सहाय्यक व्यवस्थापक श्री. सातपुते यांचेही आभार मानणे जरुर आहे.  मराठी वाचकांना हे चरित्र आवडेल, मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझे मनोगत पूर्ण करतो.

अनंतराव पाटील