• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (87)

:   ११   :

२० ऑगस्टला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गिरींचा विजय आणि रेड्डींचा पराजय यामुळे सिंडिकेटचे नेते अवाक झाले. दुसर्‍या दिवशी काँग्रेसच्या ७० खासदारांनी निजलिंगप्पांची भेट घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करण्यास कारणीभूत ठरलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, जगजीवनराम, फक्रुद्दिनअली अहंमद यांना काँग्रेसमधून निलंबित करावे अशी मागणी केली. कामराज आणि मोरारजीभाईंचे तेच मत पडले. निजलिंगप्पांनाही हेच हवे होते. पंतप्रधानांच्या पाठीराख्यांना ही कुणकुण लागताच दुसर्‍या दिवशी काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. डी. संजीवय्या यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे २४८ खासदार एकत्र जमले आणि त्यांनी इंदिरा गांधीच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आर्थिक व सामाजिक कार्यक्रमाच्याद्वारे पंतप्रधानांनी काँग्रेसला जनतेच्या जवळ आणून पक्षाला शक्ती प्राप्‍त करून दिली असा ठरावही संमत केला. दोन्ही गट अटी-तटीला लागले. संघर्ष अटळ होऊन बसला. काँग्रेसमध्ये ऐक्य राखावे यापेक्षा शिस्तभंग इलाजाबाबत 'सिंडिकेट'वाले आग्रह धरू लागले. निजलिंगप्पांनी २५ ऑगस्टला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलाविली. बरेच खासदार यशवंतराव चव्हाणांकडे गेले आणि दोन्ही गटांत समझोता घडवून आणण्याबाबत त्यांना विनंती केली. चव्हाणांनी त्यांना सांगितले की काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र बसून मतभेद मिटविण्याचे प्रयत्‍न करायला हवेत. यशवंतरावांनी त्यादृष्टीने प्रयत्‍न सुरू केले. तरुण तुर्कांपैकी काही जणांशी ते बोलले. चव्हाणांची भूमिका त्यांना पटली. रात्री तरुण तुर्कांची बैठक भरून संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्‍न करण्याचे ठरले. सर्वसामान्य काँग्रेसजनाचेही मत पडले की पक्ष फुटून न देता तडजोड केली जावी. तथापि पक्षश्रेष्ठी आणि पंतप्रधान इंदिराजी एकत्र बसून पेचप्रसंग मिटविण्याच्या मनःस्थितीत नव्हते. संशयाच्या वातावरणामुळे दोन्हीही बाजू एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या तयारीत दिसू लागल्या. इंदिराजींचे म्हणणे पडले की त्यांचा अधिकार आणि श्रेष्ठत्व काँग्रेसश्रेष्ठींनी मान्य केले पाहिजे आणि श्रेष्ठींचे म्हणणे पडले की पंतप्रधानांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार वागावे. कामराज यांनी चव्हाणांची भेट घेऊन त्यांना सिंडिकेटच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्‍न केला. आर्थिक-सामाजिक कार्यक्रमाबाबतची आपली भूमिका बदलणार नाही असे चव्हाणांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. सिंडिकेटवर याबाबत आपला विश्वास नसल्याचेही बोलून दाखविले. यशवंतरावांनी निजलिंगप्पांना फोन करून सांगितले की कृपया संघर्षाची भूमिका सोडून द्या, काँग्रेस पक्षाची हानी टाळा. यशवंतरावांनी इंदिराजींचीही भेट घेतली. निजलिंगप्पांशी आणि इतर काँग्रेस श्रेष्ठींशी एकदा बोलणी करावीत असे त्यांनी सुचविले. निजलिंगप्पांना हटविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन बोलावू नये अशीही विनंती केली. पंतप्रधानांनी यशवंतरावांना अनुकूल प्रतिसाद दिला. निजलिंगप्पांच्या कानावर या घडामोडी घातल्या असता त्यांची भूमिका ताठर दिसून आली.

निजलिंगप्पांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक २५ ऑगस्टला बोलावली. ही बैठक खळबळजनक ठरली. निजलिंगप्पांच्या प्रास्ताविक भाषणानंतर यशवंतराव चव्हाण त्वरित उठले आणि त्यांनी पेचप्रसंगातून मार्ग काढण्याचे आणि एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यावर कांही सभासदांनी 'हे कसे काय शक्य आहे' असे विचारताच यशवंतरावांनी स्वतः तयार केलेला ठरावाचा मसुदा वाचून दाखविला. त्यावर स. का. पाटील म्हणाले, ''मसुदा ठीक आहे, तथापि जनसंघ आणि स्वतंत्र पक्षाबरोबर काँग्रेस अध्यक्षांनी जी बोलणी केली त्यासंबंधीचे जे आरोप केले गेले आहेत त्यावर चर्चा व्हावी.''  अध्यक्षांच्या हेतुबाबत शंका व्यक्त केली जाऊ नये असे ठरल्यावर यशवंतरावांचा ठराव एखादा दुसरा शब्द बदलून एकमतदाने मंजूर करण्यात आला. यशवंतरावांना वाटले की मोठा पेंच टळला. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.