• 001_Krishnakath.jpg
  • 002_Vividhangi-Vyaktimatva-1.jpg
  • 003_Shabdhanche.jpg
  • 004_Mazya-Rajkiya-Athwani.jpg
  • 005_Saheb_14.jpg
  • 006_Yashodhan_76.jpg
  • 007_Yashodharshan.jpg
  • 008_Yashwant-Chintanik.jpg
  • 009_Kartrutva.jpg
  • 010_Maulik-Vichar.jpg
  • 011_YCHAVAN-N-D-MAHANOR.jpg
  • 012_Sahyadricheware.jpg
  • 013_Runanubandh.jpg
  • 014_Bhumika.jpg
  • 016_YCHAVAN-SAHITYA-SUCHI.jpg
  • 017_Maharashtratil-Dushkal.jpg
  • Debacle-to-Revival-1.jpg
  • INDIA's-FOREIGN-POLICY.jpg
  • ORAL-HISTORY-TRANSCRIPT.jpg
  • sing_3.jpg

यशवंतराव चव्हाण (86)

त्यावेळी काँग्रेस संसदीय मंडळाचे सदस्यही उपस्थित होते. त्यांनी गोपाळस्वरूप पाठक यांची उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवार म्हणून निवड केलेली होती. यानंतर निजलिंगप्पा यांनी संसदीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीला उपस्थित रहावे आणि काँग्रेसचे अध्यक्ष व पंतप्रधान या दोघांनी खासदारांपुढे बोलावे असे ठरले. यशवंतरावांना वाटले की वातावरण निवळत आहे. तथापि आंतून ते खदखदत होते. पक्षश्रेष्ठींना धडा शिकविण्याकरिता इंदिराजी आंतून वेगळीच व्यूहरचना करीत होत्या. संसदीय काँग्रेस पक्षाच्या बैठकीत खासदार तारकेश्वरी सिन्हा यांनी लिहिलेल्या एका लेखाबद्दल कांही खासदारांनी निजलिंगप्पांना प्रश्न विचारला. ''कुणाची लेखी तक्रार आली तर आपण त्यात लक्ष घालू.''  या निजलिंगप्पांचे उत्तरामुळे गोंधळ झाला. आपल्याविरुद्ध कोंडाळे केले जात असल्याची पंतप्रधानांची समजूत झाली. रेड्डींना द्यावयाच्या पाठिंब्याचा प्रश्न बाजूला पडला. काँग्रेसमधील संघर्ष उघड्यावर हाला. दुसर्‍या दिवशी इंदिराजींनी जाहीर करून टाकले की आपण संजीव रेड्डींना विरोध करणार आहोत.

खासदारांच्या बैठकीनंतर सिंडिकेटच्या लक्षात आले की सर्व खासदारांचा संजीव रेड्डींना पाठिंबा मिळणार नाही. पंतप्रधानांनी पाठिंब्यासाठी पत्रक काढावे या सूचनेला इंदिराजींना नकार दर्शविला. काँग्रेसश्रेष्ठींना समजून चुकले की इंदिराजींनी विरोधी पवित्रा उचलला आहे. मग त्यांनी जनसंघ, स्वतंत्र पक्ष आदि पक्षनेत्यांशी बोलणी सुरू केली. निजलिंगप्पा हे बाजपेयी, प्रो. एन. जी. रंगा, मिनू मसानी, एन. दांडेकर, प्रकाशवीर शास्त्री, बलराज मधोक यांना भेटले. चर्चेत त्यांची अनुकूलता दिसून आली. कम्युनिस्ट पक्षाच्या उजवे आणि डावे या दोघांनीही इंदिरा गांधींच्या बाजूने मतदान करण्याचा कल प्रदर्शित केला. काँग्रेस खासदारांत चलबिचल दिसून येऊ लागली. 'तरुण तुर्क' गटातील अर्जुन अरोरा यांनी जाहीर केले की आपला श्री. व्ही. व्ही. गिरी यांना पाठिंबा असून आपण त्यांना मतदान करणार. निजलिंगप्पांनी जनसंघ आणि स्वतंत्र पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली या कारणावरून इतर कांही खासदारांनी जाहीर केले की प्रतिगाम्यांशी हातमिळवणी करणार्‍या अध्यक्षांचे आपण ऐकणार नाही. काँग्रेस पक्ष फुटणार हे निश्चित झाले. पक्ष वाचविण्यासाठी यशवंतरावांनी प्रयत्‍न सुरू केले. पंतप्रधानांना भेटून त्यांनी एकूण हालचालींची कल्पना दिली. त्यावर पंतप्रधान म्हणाल्या, ''रेड्डी निवडून आल्यावर पंतप्रधानपदावरून मला हांकलून लावण्याचा कट करण्यात आल्यामुळे मी माझी शक्ती पणाला लावण्याचे ठरविले आहे.''  जगजीवनराम, फक्रुद्दिनअली, अहंमद, सिद्धार्थ शंकर रे आदींनी श्रीमती गांधी यांच्यासाठी रेड्डींना पाडण्याचे प्रयत्‍न सुरू केले. कांही राज्याचे मुख्यमंत्री व आमदार इंदिराजींना पाठिंबा दर्शवू लागले. निजलिंगप्पांची स्थिती केविलवाणी झाली. इंदिराजींच्या आव्हानाला तोंड देणे त्यांना मुष्कील होऊ लागले. संसदीय काँग्रेस पक्षाची बैठक १४ ऑगस्टला भरली असता कित्येक काँग्रेस खासदारांनी पंतप्रधानांना विनंती केली की पक्षाला फुटीपासून वाचवा. तारकेश्वरींनीही हात जोडून विनंती केली की आपल्याला कोणतीही शिक्षा करावी पण पक्ष वांचवावा. त्यावर इंदिराजींनी उत्तर दिले, ''आता फार उशीर झालाय. माझ्या मार्गाने मी पुढे निघालेली आहे.''  यातून असा अर्थ काढण्यात आला की गिरी यांचे यशासाठी इंदिराजी शिकस्तीचे प्रयत्‍न करणार. म्हणजे काँग्रेसचे उमेदवार संजीव रेड्डी पराभूत होणार. आपल्या इच्छेप्रमाणे मत देण्याबाबत मोकळीक द्यावी अशी मागणी सुरू करण्यात आली. ऑगस्ट १६ ला राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. दिल्लीत आणि सतरा राज्यांचे राजधानीत सदर मतदान झाले. सिंडिकेटने खात्री व्यक्त केली की रेड्डीच निवडून येणार. जगजीवनराम-फक्रुद्दिनअली यांचेवर शिस्तभंग इलाज काय करायचा ते ठरले. तथापि मतदानात वेगळेच घडले आहे, याची श्रेष्ठींना कल्पना आलेली नव्हती.